प्रस्तावना

१. मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचे आजपर्यंत दहा खंड होऊन, आतां हा अकरावा खंड प्रसिद्ध होत आहे. पूर्वीचे दहा खंड छापतांना, काहीं किरकोळ लेख छापावयाचे राहिले होते. त्यांचा समावेश ह्या लहानशा संकीर्ण खंडांत केला आहे.

२. आजपर्यंत मासिकपुस्तकद्वारां व स्वतंत्र ग्रंथरूपानें साधनांची प्रसिद्धि केली. प्रस्तुत खंड वर्तमानपत्राद्वारां प्रसिद्ध झाला आहे. ह्यावरून असें अनुमान होतें कीं, दिवसेंदिवस इतिहासाच्या अभ्यासाची गोडी महाराष्ट्रांतील मध्यम स्थितींतील लोकांच्या ठायीं वाढत्याप्रमाणानें वृद्धिंगत होत आहे. निवृत्तिमार्गापासून प्रवृत्तिमार्गाकडे म्हणजे प्रपंचाकडे लोकांची विचारप्रवृत्ति आस्ते आस्ते चालली आहे.

३. ही प्रपंचप्रवृति उसनी नसून, जातिवंत आहे. ह्यांत बिलकुल संशय नाहीं. इतिहासाचीं साधनें प्रसिद्ध करण्याची माझी एकट्याचीच इच्छा असती व इतरांची नसती, तर दहा खंड राहूं द्या परंतु एकही खंड छापला जातांना. तशात, हे दहाही खंड लोकांच्या पैशानें छापिले आहेत, माझ्या पदरचा एक छदामही खर्च झाला नाहीं; इतकेंच नव्हे, तर छापून काढण्याचें प्रथमामंत्रण इतरांनीं मला केलेलें आहे. मी इंतरांच्या गळीं पडलों नाहीं. तात्पर्य, स्वचरित्र जाणून घेण्याची इच्छा मध्यम स्थितींतील महाराष्ट्राला झाली आहे. इतिहास म्हणजे गतचरित्राची स्मृति. ती राष्ट्राला होत चालली आहे. आणि ज्या पक्षीं स्मृतीचा उदय होतो आहे, त्या पक्षी मोहाचा नाशही उदयाच्या प्रमाणानेंच होत असला पाहिजे यांत संदेह नाहीं.

४. परंतु, यद्यपि स्मृतीचा उदय निःसंशय होत आहे, तत्रापि तो व्हावा तितक्या झपाट्यानें होत नाहीं, फारच मंदगतीनें होत आहे. सरासरीनें दरवर्षी लहान मोठा असा एखादा खंड लोक-साह्यानें मी प्रसिद्ध करतों. तीन वर्षांत एक खंड रा. रा. वासुदेवशाखी खरे काढतात, आणि पांच वर्षांत एखादा अर्धा खंड रा. रा. पारसनीस निर्माण करतात. तसेच डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रा. सोसायटीनें गेल्या १५ पंधरा वर्षांत पांच खंड प्रसिद्ध केले. आणि इतर एखादा गृहस्थ जीवबादादा बक्षी यांच्या पत्रव्यवहारा सारखा एखाद दुसरा साधन-ग्रंथ पांच पंचवीस वर्षांत प्रसिद्ध करितो. सारांश, गेल्या १५ पंधरा वर्षांत सरासरी साधनांचे पंचवीस * एक खंड प्रसिद्ध झाले आहेत. साधनांची प्रचंड सामग्री पाहतां, प्रसिद्धीचें काम फार मंद गतीनें चाललें आहे, असें म्हणावें लागतें.