Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

४ प्रकरण दुसरें व तिसरं हीं मूलत: शक १३७० त रचिलीं गेल्या मुळें, त्यांची भाषा मुळांत चोंभा कवीच्या भाषे हून किंचित् अर्वाचीन असणार हें उघड आहे. प्रकरण पांचवें व साहावें हीं अनुक्रमें शक १४६० व शक १४०० तील असल्या मुळें त्यांची भाषा मूळांत बहिरा जातवेदाच्या भाषे सारखी असली पाहिजे. आणि प्रकरण पहिलें व प्रकरण चौथें हीं दोन प्रकरणें शक १५०० च्या सुमारचीं असल्या कारणानें, त्यांची भाषा मूलतः एकनाथी भाषे सारखी असेल, हें सांगणें नलगे. प्रस्तुत छापील ग्रंथाची भाषा पहातां ती शके १३७० तील किंवा शक १४०० तील किंवा शक १५४० तील हि असलेली दिसत नाहीं. प्रत्यय, विभक्तिरूपें व क्रियापदरूपें बहूतेक बरीं च अर्वाचीनलेली सर्वत्र दिसतात. हा फरक नकलकारांनीं केला, हें जुन्या मराठी लेखाच्या अभ्यासकांना सांगण्याचे कारण नाहीं. नकलकाराचा धंदा करणारे प्रायः भाषेचे शास्त्रीय अभ्यासक नसतात. तेव्हां, जुनी भाषा जशी ची तशी राखण्या कडे त्यांचे लक्ष्य नसते. त्यांचें एक च एक लक्ष्य फक्त मजकुरा कडे असतें. मजकुराची जुनी भाषा डोळ्यांनीं पहावयाची व तिचा उच्चार स्वकालीन भाषे प्रमाणें तोंडातल्या तोंडांत जिभेनें करून ती नकळत झालेली अर्वाचीन भाषा हातानें लिहावयाची, हा परिपाठ महाराष्ट्रांतील नकलकारांचा सर्वत्र दृष्टीस पडतो. जुने लेख अनेक शतकांनीं नकल करतांना नकलकार मूळ भाषेंत नकळत फेरफार करतात, ह्यांत विशेष आश्चर्य नाहीं. स्वकालीन मूळ लेखांत हि फेरफार करणारे नकलकार महाराष्ट्रवाङमयांत आढळतात. उदाहरणार्थ, तुकारामाच्या अभंगांच्या तळेगांवच्या संताजी तेल्यानें केलेल्या नकलांत व कडूसच्या महाजनानें केलेल्या नकलांत, तुकाराम संताजी व पाठक हे तिघे हि समकालीन असून, अंतर आहे. संताजीच्या नकला कुणबाऊ आहेत व पाठकाच्या नकला बामणाऊ आहेत. मूळ तुकारामाचें लिखाण कुणबाऊ होतें कीं तिसरें च कांहीं होतें ही बाब स्वतंत्र च. ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीला हि हा च विकार बाधलेला आहे. मी आज पर्यंत ज्ञानेश्वरीच्या जुन्या नव्या नकला सुमारें अडीचशें पाहिल्या. त्यांत कोणती हि एक नक्कल कोणत्या हि दुस-या नकले सारखी कोणत्याहि दहा सलग ओव्यांत नाहीं. रामदासाच्या दासबोधाची हि ही च दुर्दशा. देवांनीं छापिलेला कल्याणस्वामिलिखित दासबोध पांगारकरांना सांपडलेल्या ग्वालेरच्या दासबोधाहून अनेक स्थलीं भाषादृष्ट्या निराळा ! दोघे हि नकलकार रामदासकालीन, दोघे हि ब्राह्मण, दोघे हि गुरुग्रंथाचीं पूज्यभावें पारायणें करणारे. असें असून, दोघांच्या पाठांत भेद, अशी दुःस्थिति जर महाराष्टांतील प्रतिष्ठावंत ग्रंथकारांच्या ग्रंथांच्या नकलांची, तर कोंकणांत कोनाकोप-यांत लोळत पडलेल्या प्रस्तुत बखरींच्या निरनिराळ्या प्रकरणांच्या नकलांचा सांवळा गोंधळ काय विचारावा ! प्रस्तुत बखरीची शेवटली नक्कल शक १७४१ त झाली. मूळ सबंध बखर छापिली आहे त्या स्वरूपाला शक १६०० च्या सुमारास आली. शक १६०० पासून शक १७४१ पर्यंतच्या १४१ वर्षांत अनेक नकलांच्या कोशांतून नवे नवे जन्म घेऊन शक १७४१ त प्रस्तुत बखरीनें शेवटला हस्तलिखित जन्म घेतला. परंतु तेवढ्यानें च तिचें जन्मांतर संपलें असें समजूं नये. बखरीनें प्रस्तुत जो छापील जन्म घेतला आहे त्यांत कान्हे, मात्रा, इकार, उकार, अक्षरें इत्यादि अवयवांची किती छाटाछाट झाली आहे तें माझा मींच जाणें असें म्हणावयाला नको; प्रत्येक वाचक माझ्याप्रमाणें च बखरीचे हातपाय कापले गेल्या बद्दल, बखरीचा पुनर्जन्म सर्वावयसंपन्न होई पर्यंत, अखंड दुःख करीत राहील !