Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
असें दिसतें कीं मूलतः शक १३७० त ऊर्फ संवत् १५०५ त महिकावतीची बखर ऊर्फ प्रकरण दुसरें रचिलें गेलें. नंतर प्रकरण तिसरें हें ज्यादा मजकूर म्हणून कालान्तरानें दुस-या प्रकरणाला परिशिष्टरूपानें जोडलें गेलें. “ह्या (म्हणजे दुस-या प्रकरणा) वर ते (म्हणजे तिसरें प्रकरण) हि प्रत चढेल " म्हणून दुसरें प्रकरण ऊर्फ महिकावतीची बखर लिहिणारा गृहस्थ जो केशवाचार्य तो स्वत: च म्हणतो (पृष्ठ ६२, ओळ ३). ह्या दोन्हीं प्रकरणांचा कर्ता जो केशवाचार्य त्याला शक १३७० त मालाडचा तत्कालीन देसला नायकोराव यानें सन्मानपूर्वक बोलावून हें वंशपद्धतीचें कर्म ऊर्फ महिकावतीची बखर त्याज करवीं लिहविली (पृष्टें ५२ व ५३), वंशपद्धती लिहविण्याचें कारण केशवाचार्य जें सांगतों तें फार हृदयद्रावक आहे. पहिल्या बिंबराजापासून म्हणजे शक १०६० पासून शक १३७० पर्यंत म्हणजे ही बखर ऊर्फ वंशपद्धति लिहिली गेली तावत्कालपर्यंत तीन शें वर्षें लोटून गेलीं होतीं (पृष्ट ५३ ओळ १६). सर्व कोंकणप्रांत म्लेच्छांनीं आक्रमण करून, येथून तेथून चोहीं कडे सर्वत्र म्लेछार्णवा खालीं सर्व पृथ्वी बुडून गेली. वर्णावर्ण वोळख नाहीशी झाली. स्वकुळाची वास्तपुस्त कोणाच्या गावीं हि राहिली नाहीं. क्षत्रियांनीं राज्याभिमान सांडिला, शस्त्रें सोडिलीं व केवळ कृषिकर्म स्वीकारून कित्येक निव्वळ कुणबी बनले, कित्येकांनीं कारकूनवृत्ति आदरिली, कांहीक सेवावृत्ति अंगिकारून निभ्रांत शूद्र ठरले, शाणि कित्येक नष्ट होऊन नामशेष हि राहिले नाहींत. बहुत आचारहीन झाले. गोत्र, प्रवर. कुळस्वामी व कुळगुरू ह्यांची बहुतेकांस आठवण हि राहिली नाहीं. अशी ह्या तीन शें वर्षात भ्रष्टता माजली व महाराष्ट्रधर्म अज्जी बुडाला. अश्या संकटसमयीं श्रीदेवी कुळस्वामिणी, मालाडचा देसला जो नायकोराव त्याच्या स्वप्नांत येऊन, सांगती झाली कीं, नायकोरावा, ऊठ, महाराष्ट्रधर्म रक्षिण्या करितां अठरा पगड जातीचा मेळावा कर आणि केळव्या पासून मुंबई पर्यंतच्या सर्व गांवचे, सर्व जातींचे व सर्व गोत्रांचे खलक जमवून त्यांस केशवाचार्याच्या मुखें महाराष्ट्रधर्म सांगीव (पृष्ट ५३). देवीची ही आज्ञा शिरसा वंदन करून नायकोरावानें केशवाचार्याच्या संमतीनें मालाड ऊर्फ म्हालजापुर येथील जोगेश्वरीच्या देवळा पुढें विस्तीर्ण मंडप रचून तीन हजार साहा शें पंचावन्न लोक जमा केले. त्यांत नायक, देसाई, पुरोहित, कुळगुरू, आचार्य, उपाध्ये, जोशी व इतर मुख्य मुख्य वृत्तिवंत पांचशे एकवीस होते. असा हा भव्य समुदाय मालाडास एकवीस दिवस राहिला. ब्राह्मणांनीं लक्ष्मीसूक्तांनीं भगवती दुर्गादेवीचें स्तवन केलें व श्रीदेवी आद्यशक्ति जगदंबिका महाराष्ट्रधर्मरक्षिका जी जगन्माता दुर्गादेवी ती तुम्हां सर्वां वर सुप्रसन्न असो असा आशिर्वाद दिला. नंतर केशवाचार्यानें सर्व शिष्टांची संमती घेऊन जमलेल्या सर्व लोकांस प्रस्तुत छापिली जाणारी वंशपद्धति राजा बिंबा पासून अद्ययावत् कथन केली व महाराष्ट्रधर्माचें निरूपण केलें. त्या वंशपद्धतीच्या व महाराष्ट्रधर्मकथनाच्या सासष्ट नकला करून साक्षशिक्या निशी त्या नकला त्या त्या कुळांस, वंशास व जातींस प्रमाणपूर्वक दिल्या. कुळांनी, वंशांनीं व जातींनीं शिरीं वंदन करून त्या नकला जतन करून ठेविल्या. पैकीं एक नक्कल कल्याण येथील सदाशिव महादेव दिवेकर ह्या खटपटी गृहस्थांच्या द्वारा प्रस्तुत संपादकाच्या हातीं येऊन मुद्रणसंस्कारार्हतेस प्राप्त झाली, असा ह्या बखरीच्या रचनेचा वृत्तान्त आहे. आजपर्यंत सांपडलेल्या सर्व बखरींत शक १३७० तील ही महिकावतीची बखर अत्यन्त जुनाट आहे.
शक १३७० तील ह्या दोन प्रकरणां नंतर तीस वर्षांनीं म्हणजे शक १४०० त प्रकरण साहावें रचिलें गेलें. प्रकरण दुसरें व प्रकरण तिसरें यांत महिंकावती प्रांतांतील बहुतेक सर्व कुळांची ऊर्फ खुमांची वंशपद्धती आली असून फक्त कोळंबा व शिळंबा वंशाची हकीकत द्यावयाची राहिली होती. ती ह्या साहाव्या प्रकरणांत दिली आहे.