Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

३ ह्या नकलेला १०५ वर्षे झालीं, तेव्हां मूळ ग्रंथ नकले हुन जुना असणार हें सांगावयाला नको च. किती जुना, एवढा च काय तो प्रश्न. अन्त:प्रमाणां वरून व बहिप्रमाणां वरून ग्रंथाचा काळ ठरविण्याचा जो सर्वमान्य संप्रदाय तो ह्या ग्रंथास लावूं पाहतां प्रथमदर्शनीं च एक बाब वाचकाच्या लक्ष्यांत येते. ती ही कीं, ही बखर एक ग्रंथ नाहीं, अनेक गद्यपद्य प्रकरणांचा समाहार आहे. आजपर्यंत ज्या पांचपन्नास बखरी प्रसिद्ध झाल्या आहेत त्यां पैकीं कांहींत श्लोकादि पद्य मजकूर असलेला सर्वांच्या माहितीचा आहे. तेव्हां ह्या हि बखरींत ओव्यादि पद्य मजकूर आढळल्यास अपूर्व असें कांहीं च नाहीं. आज पर्यंत प्रसिद्ध झालेल्या बखरींत निवाडे, महजर, राजकीय पत्रें इत्यादींचा सारांशरूपाने किंवा दस्तऐवजी दाखला दिलेला जसा आढळतो तसा ह्या हि बखरींत निवाडे, महजर, इत्यादींचे दाखले आढळल्यास त्यांत हि अदृष्टपूर्व असें कांहीं च नाहीं, ह्या बखरींत गद्य आहे, पद्य आहे, निवाडे आहेत, हकीकती आहेत, लढायांचीं वर्णनें आहेत, वंशावळी आहेत, इतकें च नव्हे तर तीं तीं प्रकरणें लिहिल्याचें निरनिराळे अनेक काळ हि आहेत. उघड च झालें कीं ह्या बखरींत दिलेलीं निरनिराळीं प्रकरणें निरानराळ्या काळीं स्वतंत्रपणें निरनिराळीं लिहिलीं गेलीं आणि नंतर निदान दोन वेळां तरी एकत्र गुंफिलीं जाऊन, शेवटीं सध्यां छापिलीं आहेत ह्या स्थितींत अगदीं अलीकडे म्हणजे दीड दोन शें वर्षां पूर्वीं एकवटलीं गेलीं. हा गुंफागुंफीचा खटाटोप कसकसा होत गेला तें स्पष्ट कळण्या करितां, प्रथम बखरींतील निरनिराळ्या प्रकरणांची यादी देतों व प्रत्येक प्रकरणाचा रचनाकाल दर्शवितों.

                                                                    प्रकरण पहिलें
ह्या प्रकरणाचें नांव पूर्वपरंपरा-वंशउत्पत्ती-वर्णावर्ण-व्याख्या. हें सबंद ओवीपद्यांत लिहिलें आहे. ह्याचे दोन अध्याय असून पहिल्यांत ६९ ओव्या व दुस-यांत ३०० ओव्या आहेत. पहिल्या अध्यायांत भविष्योत्तरपुराणान्तर्गत ब्रह्मोत्तरखंडाच्या व सह्याद्रिखंडाच्या आधारें वंशोत्पत्तिवर्णन केलें आहे. दुस-या अध्यायांत त्या च आधारा वरून वंशावळ व वंशधर्मनिरूपण दिलें आहे. सह्याद्रिखंडनामक ग्रंथाचा आधार ज्या अर्थी त्या प्रकरणाला घेतला आहे त्या अर्थी हें प्रकरण शक १५०० च्या सुमारास केव्हां तरी रचिलें गेलें असलें पाहिजे हें उघड आहे. तसें च"मछा पासुनि चारि ते नरहरी पर्यंत जाले कृती '' इत्यादि श्लोक ज्या अर्थी या प्रकरणांत आला आहे त्या अर्थी ह्या प्रकरणांत शक १६०० नंतर केव्हां तरी हा श्लोक घुसडला गेला असला पाहिजे. ह्या प्रकरणानें प्रस्तुत छापील बखरीचीं १ पासून ३१ पृष्टें व्यापिली आहेत. प्रकरणाचा कर्ता भगवान् दत्त म्हणून प्रकरणसमाप्तीस सांगितलें आहे.

                                                                   प्रकरण दुसरें
ह्या प्रकरणाचें नांव राजवंशावळी. ह्यानें प्रस्तुत छापील बखरीची ३२ पासून ६२ पर्यंतचीं पृष्टें भरलीं आहेत. हें येथूनतेथून गद्य आहे. ह्याचा कर्ता केशवाचार्य. हें प्रकरण शक १३७० च्या फाल्गुनांत लिहिल्याचें केशवाचार्य सांगतो.

                                                                   प्रकरण तिसरें
ह्या प्रकरणाला निवाडे व हकीकती असें मी नांव देतों. ह्यांत एकंदर दहा लहानमोठे निवाडे व हकीकती आहेत. एक निवाडा संवत् १४५९ तला म्हणजे शक १३२४ तला आहे. तिस-या प्रकरणाला प्रस्तुत ग्रंथाची ६२ पासून ७२ पर्यंतचीं दहा पानें खर्ची पडली आहेत. प्रकरण सर्व गद्य आहे.