Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

                                                                     प्रकरण चौथे
ह्या प्रकरणाचें नांव श्रीचिंतामणिकौस्तुभपुराण. सर्व प्रकरण ओवीपद्य आहे. एकंदर अध्याय चार, प्रस्तुत ग्रंथाचीं ७२ पासून ८८ पर्यंतचीं १७ पृष्टें हें प्रकरण आहे. या प्रकरणाचा काळ कर्त्यानें दिला नाहीं. तत्रापि हें चिंतामणिकौस्तुभपुराण अथवा कौस्तुभचिंतामणिपुराण शक १५१६ च्या अगोदर केव्हां तरी लिहिले गेले असावें असे म्हणण्यास प्रमाण आहे. गर्सन ड कुन्हा याच्या The origin of Bombay ह्या पुस्तकाच्या ११९ व्या पृष्टा वर खालील वृत्त आहे:- One of the resultsa of the conversion of the (पाठारा) Prabhus by the Portu. guese was the production of a local native historian, who, when converted, became Caetano de Souza, and wrote a work in Portuguese entitled A Historia de Mahim, in I594 A. D. He is said to have based his history on the Kaostubha-Chintamani for his account of the Prabhus. डसूझानें इसवीसन १५९४ त कौस्तुभचिंतामणि नांवाच्या ग्रंथाच्या आधारें माहीमचा इतिहास पोर्तुगीज भाषेंत लिहिला, म्हणून वरील वाक्यांत सांगितलें आहे. डसूझा हा मूळचा पाताण्या प्रभू होता व त्यानें कौस्तुभचिंतामणि हा ग्रंथ आधारास घेऊन १५९४ इसवींत माहीमचा इतिहास ज्या अर्थी लिहिला त्या अर्थी कौस्तुभचिंतामणि हा ग्रंथ १५९४ इसवीच्या म्हणजे शक १५१६ च्या अगोदर केव्हां तरी लिहिला गेला, हें निश्चित. हे प्रकरण पांचव्या प्रकरणाच्या नंतर म्हणजे शक १५०० च्या सुमारास लिहिलें गेलें असावें. प्रकरणाचा कर्ता भगवान् दत्त म्हणून प्रकरणसमाप्तीस सांगितलें आहे. भगवान् नंद दत्त असें नांव प्रकरणप्रारंभीं दिलें आहे.

                                                                     प्रकरण पांचवें
पाठाराज्ञतिवंशावळि हें नांव ह्या प्रकरणास बरेंच साजेल. हें सर्व गद्य आहे. ह्यानें प्रस्तुत छापील ग्रंथाचीं ८८ पासून १०५ पर्यंतची १७ पृष्टे व्यापिलीं आहेत. हें प्रकरण शक १४६० च्या सुमारास लिहिलें गेलें असावें, असें अंतर्गत मजकुरा वरून दिसतें.

                                                                     प्रकरण सहावें
ह्या प्रकरणाचें नांव वंशावळी. सर्व गद्य, संवत् १५३५ म्हणजे शक १४०० त ही वंशावळी लिहिली, असे प्रकरणकार प्रकरणसमाप्तीस स्वत:च म्हणतो.
कालदृष्ट्या प्रकरणरचनेचा क्रम येणेंप्रमाणें बसतो.
शक १३७०----------------------------------------------------- प्रकरण दुसरें
शक १३७० च्यानंतर कांहीं थोड्या दिवसांनी---------------------प्रकरण तिसरें
शक १४००----------------------------------------------------- प्रकरण साहावें
शक १४६०------------------------------------------------------प्रकरण पांचवें
शक १५०० सुमार ---------------------------------------------- प्रकरण चौथें व प्रकरण पहिलें.