Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

प्रस्तावना


१ कल्याणचे सदाशिव महादेव दिवेकर यांनीं वसईचे हिरा हरि भंडारी शेषवंशी यांज कडून मिळवून ही बखर प्रकाशनार्थ माझ्या हवालीं केली. सुटी किंवा पोथीवजा नसून, बखर बांधीव पुस्तकवजा आहे. एकंदर पत्रें किंवा पानें ६९ वे पृष्टें १३८. पानाची लांबी १२ इंच व रुंदी ८ इंच. पृष्टास ओळी २५ पासून २७. अक्षर बाळबोध, टपोरें, लहान चिंचोक्या एवढें. ओळीस अक्षरें २५ पासून ३०. कागद फुलस्केप असून, त्याच्या गर्भात MAGNANI ही रोमन अक्षरें स्पष्ट दिसतात. पानें, पृष्ठें, ओळी व अक्षरें सर्व येथून तेथून शाबूत आहेत. अक्षराचा संदिग्धपणा प्रायः कोठे हि नाहीं. बखर लिहून झाल्या वर, ती पुस्तकबांध्या कडे बांधण्यास गेली. पुस्तकबांध्याने समास कांपतांना मथळ्या वरील पानाचें आंकडे कोठेंकोठें छाटले आहेत, त्या वरून दिसतें कीं मूळ पानाची लांबी १२ इंचा हून व रुंदी ८ इंचा हून अर्धा पाव इंच जास्त असावी. मूळ नकलकारानें चोहो बाजूंनीं समासाची माया सडकून ठेविल्या मुळें, पुस्तकबांध्याच्या अडाणी हाता करवीं बखरीला इजा बहुतेक बिलकुल पोहोंचली नाहीं.


बखरीची समाप्ति अशी:- "शके १७४१ प्रमाथिनामसंवत्सरे माहे वैशाखशुद्धप्रतिपदा रविवासरे ते दिवसी वंषावळिलेख समाप्तः ॥ हस्ताक्षर वालजी पाटिल सिंधे शेषवंशि वस्ती वसइं बाहादरपुरा हे वंषावळिची पोथी राजश्री हीराजी रामजी राउत सिंधे शेषवंशी वस्ती वसइ बहादरपुरा यांची असे ॥ पत्रे सुमार ॥ ६९ ॥ ” शक १७४१ च्या वैशाखशुद्धप्रतिपदेस रविवार येतो. मित्ती बराबर आहे. अर्थात्, शक १८४६ च्या वैशाखशुद्धप्रतिपदेस ही बखर नक्कल करून बरोबर १०५ वर्षे झाली. वसईचे हीराजी रामजी राउत सिंधे शेषवंशी यांच्या करितां वालजी पाटिल शिंदे शेषवंशी यानें ही नक्कल केली. वालजी पाटिलाचें अक्षर इतकें सुवाच्य व वळणदार आहे कीं नकलकार ब्राह्मणेतर असेल असा संशय सुद्धां, त्यानें आपले नांव, गांव व आडनांव नमूद केलें नसतें तर, आला नसता. शक १७४१ त महाराष्ट्रांतील पाटिल लोकांना अक्षरओळख सुद्धां फारशी असण्याचा संभव नव्हता. असें असतां, वसईच्या ह्या वालजी पाटलानें इतकें सुवाच्य व वळणदार अक्षर लिहावें हें सकृद्दर्शनीं आश्चर्य वाटण्यासारखें आहे. परंतु, मुंबईच्या इंग्रजांच्या अमला खालीं वसई प्रांत येऊन शक १७४१ त सुमार पन्नास वर्षे झाली होतीं ही बाब लक्ष्यांत घेतली असतां, वालजी पाटील इतका अक्षरचंचू कसा झाला ह्या बाबीचा उलगडा होतो. शक १७४१ च्या पूर्वी मुंबई बेटांत इंग्रज सरकारानें व मिशन-यांनीं कांहीं मराठीं व इंग्रजी शाळा काढल्या होत्या आणि त्या शाळांतून ब्राह्मण, प्रभू व इतर वरिष्ठ जातीचीं कांही मुलें शिकून सरकारी व व्यापारी नोक-या मिळवीत. ह्या मुलांत वसईच्या पाटलांचीं व राउतांचीं कांहीं मुलें असण्याचा संभव आहे. अगदीं प्रथम मुंबईच्या ज्या घराण्यांस अक्षरविद्येची ओळख झाली ह्या घराण्यांत राउतांचें घराणें प्रसिद्ध आहे.