Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
आर्यांचे हे दासत्व कालान्तराने जाऊन त्यांची भरभराट झाली, तथापि उपसर्गी प्रथमपुरुषसर्वनाम जे भाषेत एकदा शिरले ते कायमचेच शिरले. पुढे प्रत्ययी भाषा बोलणाऱ्याआर्यांची दुसरी एक टोळी या उपसर्गी भाषा बोलणाऱ्या आर्यांच्या टोळीला भेटली व या दोघांचा मिलाफ झाला. तेव्हा पूर्वीची नौ, न: ही प्रत्ययी रूपे पुन: बोलण्यात येऊ लागली, परंतु या जुन्या पूर्व रूपांचा उपयोग प्रमुखपणे न होता गौणत्वाने होऊ लागला. वाक्याच्या प्रारंभी नौ न: ही रूपे योजीत नसत. शिवाय यांचा स्वरही उदात्त नसे अनुदात्त असे. अनुदात्त स्वर म्हणजे नीचै:, ऱ्हस्व व अल्प असा आघात ऊर्फ निघात. नौ, न: ही रूपे अशी नमत्या स्वरांत ज्या अर्थी उच्चारीत त्या अर्थी भाषेत त्यांना प्रधान स्थान नसे हे उघड होते. तात्पर्य, अहं, आवाम्, वयम् ही रूपे वैदिक भाषेत पहलवांच्या भाषेतून आलेली आहेत. प्राचीनतम पहलव लोक वचनदर्शक स् हा शब्द योजीत, परंतु तो उपसर्ग म्हणून योजीत, प्रत्यय म्हणून योजीत नसत. म्हणजे प्राचीनतम पहलव हे आर्यभाषाच बोलत, परंतु शब्दांची रूपे प्रत्यय न लाविता उपसर्ग लावून बनवीत किंवा दुसराही एक अभ्युपगम करता येईल पहलव लोक उपसर्गी भाषा बोलत. ती भाषा आर्यभाषा असेल किंवा अनार्य भाषा असेल. पहलवांनी आर्यपूर्वजांना जिंकल्या वर, जिंकलेल्या आर्यानी पहलवांच्या चालीरीती व बोलण्याची धाटणी उचलली. त्या बरोबरच उपसर्गांनी शब्दांची वचनरूपे करण्याची पहलवांची धाटणीही आर्यपूर्वंजांनी उचलली आणि स् प्रत्ययाचा ते उपसर्गासारखा उपयोग करू लागले की अहम्, आवाम् व वयम् ही उत्तम पुरुषाची रूपे बहुश: कोणत्या तरी उपसर्गी आर्यभाषेतून वैदिकभाषेत आली.