Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
६१ (८) चुरादि धातू : चुरादि धातूंची रूपे अय् किंवा आपय् हा जोडधातू लागून होत असल्यामुळे चोरय्, ताड्य् इत्यादी अंगे साधी आहेत किंवा नाहीत, या बाबीचा निर्णय करीत बसण्याचे कारण रहात नाही. तत्रापि चुरादिसंबंधक एक बाब नमूद करून ठेवण्यासारखी आहे. ती ही की चोरय्, ताड्य, अर्थय्, कथय्, भावय् ही अंगे अय् धातू लागून तयार होण्यापूर्वी चोर्, ताड्, अर्थ्, कथ्, भौ ही अंगे पूर्ववैदिकभाषांतील यङ् व यङ्लुक् यांचे संक्षेप होऊन आलेली आहेत. चोचोर्, ताताड्, आरर्थ्, चाकथ्, बोभौ यांचे संक्षेप चोर्, ताड्, अर्थ्, कथ् व भाव् ही अंगे आहेत. तात्पर्य, चुरादीचे गणगोत पूर्ववैदिक यङ् व यङ्लुक् यांच्याशी इतर धातूंप्रमाणेच लागलेले आढळते. इतर धातूंत व चुरादि धातूत भेद एवढाच की यङ्लुक् मधून संक्षेप होऊन आल्यावर चुरादि धातूंना अय् धातूचा जोड लागतो व इतर धातूंना कोणताच जोड लागत नाही. चुरादि धातूंना अय् हा जोड लागत असल्यामुळे त्या अय् सहित अंगांना पुन: यङ् किंवा यङ्लुक् होत नाही.