Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
यादृष्टीने पहाता, ममार व ददौ यातील अ व औ हे प्रत्यय भूतार्थक जितके आहेत तितकेच वर्तमानार्थक व आज्ञार्थक आहेत. म्हणजे हे प्रत्यय कोणताच अर्थ दाखवीत नाहीत. दुसऱ्या शब्दांनी सांगावयाचे म्हणजे हे प्रत्यय काल किंवा अर्थ दाखविणारे नाहीत, हे प्रत्यय फक्त सर्वनामे आहेत. लिट् मधील अ किंवा औ चा जो प्रकार तो च लुङ् व लङ् मधील अम् चा प्रकार. अम कोणताच काल किंवा अर्थ दाखवीत नाही, भूतकालही दाखवीत नाही वर्तमानकालही दाखवीत नाही. अम् हे निव्वळ, साधे, पूर्ववैदिक सर्वनाम आहे. जशी आमि, मि, अ व औ ही पूर्ववैदिक सर्वनामरूपे आहेत, तसेच अम् हेही पूर्ववैदिक सर्वनामरूप आहे. जसे आमि स्वतंत्रपणे धातूच्या पुढे येते. तसेच अम् ही स्वतंत्रपणे आमि चा अपभ्रंश म्हणून नव्हे, धातूच्या पुढे येते. यावर कोणी असा आक्षेप आणील की आमि वर अम् हे प्रत्यय किंवा सर्वनामे जर भूत, वर्तमान, आज्ञा, संकेत इत्यादी अर्थ दाखवीत नाहीत तर हे अर्थ कशाने दाखविले जातात? या आक्षेपाचे निरसन करावयाचे म्हणजे संस्कृतातील धातूंचे वर्गीकरण मुळात काय होते ते सांगावयाचे. ओघासच आले आहे, सबब वर्गीकरण काय होते ते सांगतो. परंतु धातूंच्या वर्गीकरणाच्या व पृथक्करणाच्या दीर्घ उद्योगाला लागण्यापूर्वी म्हणजे पाणिनी जिला तिङन्त प्रक्रिया म्हणतो तिचा उलगडा करण्याचा प्रयत्न आरंभिण्यापूर्वीं, येथपर्यत ज्या सुबंत प्रकरणाचे प्रामुख्येकरून विवेचन केले त्यातील अद्यापपर्यत स्पर्श न केलेल्या एक-दोन बाबींचा उल्लेख करतो व नंतर सगळ्या विवेचनाचा संक्षिप्त कलमवार आढावा घेतो.
४२ वचन, लिंग व विभक्ती यांचे प्रत्यय ज्या शब्दांना लागतात त्या संबंधाने ऊहापोह येथपर्यंत केला. आता वैदिकभाषेत पूर्ववैदिकभाषातून आलेल्या अशा शब्दांचा नामनिर्देश करतो की ज्यांना वचन, लिंग किंवा विभक्ती यांचे प्रत्यय लागत नाहीत आणि म्हणून ज्यांना अव्यय व नियात या संज्ञा मिळालेल्या आहेत. असे अव्यय शब्द किंवा नामे म्हटली म्हणजे भूर्, भुवर्, स्वर्, वदि, सुदि, स्वाहा, स्वधा, संवत, चमस्, नमस्, ओम् इत्यादी होत. जेव्हा वैदिकभाषेच्या पूर्वजभाषात विभक्त्या, लिंग व वचने यांचे प्रत्यय नव्हते तेव्हाचे ते अत्यंत जुनाट प्राथमिक शब्द आहेत. या अव्यय नामांवरून तत्कालीन आर्यपूर्वजांची संस्कृती कळण्यास मार्ग होतो, भूर, भुवर्, स्वर हे देवांचे तीन लोक आर्यपूर्वजांना माहीत होते. शोभनो दिव: सुदि, म्हणजे रात्री आकाशात उजेड ज्या पंधरवाड्यात असतो त्या पंधरवड्याला ते सुदी म्हणत. ज्या पंधरवड्यात उजेड नसतो त्याला (अव दिव: =(अलोप)) वदी म्हणत. चांगले आणि वाईट, शोभन आणि अशोभन दिव: म्हणजे द्यौ: म्हणजे आकाश ज्यात असते त्याला ते संवत् (सं च अव च दिव:) संवद् (म्हणजे संवत्सर) म्हणत. चम् (खाणे) पासून चमस् (अन्न) व नम् पासून नमस्, शब्द निघाला आहे. स्वाहा, स्वधा व ओम् ही नामे प्रसिद्धच आहेत. साऱ्या वचनी, लिंगी व विभक्त्यात हे शब्द अव्यय रहातात. उदाहरणार्थ सुदी शब्द घ्या. त्याचा उपयोग असा करीत :
श्रावणंसुदि चतुर्थी (प्रथमा एकवचन)
श्रावणसुदि चतुर्थी पंचम्यौ ( प्रथमा द्विवचन)
श्रावणसुदि पंचम्यां (सप्तमी एकवचन)
श्रावणसुदि प्रथमरविवासर: (पुल्लिंग)
श्रावणसुदि प्रथमद्वितीयाहीन (नपुंसक द्विवचन)