Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

१२) म्, इ, इँ प्रत्यय योजणाऱ्या गेंगाण्या आर्यांच्या भाषेचा स्पर्श जेव्हा इतर आर्यभाषांना झाला तेव्हा नपुसकलिंगाची कल्पना रानटी आर्यभाषेत शिरली आणि नपुंसकलिंग व नपुंसकेतरलिंग अशी दोन लिंगे प्रथम रानटी आर्यभाषेत उत्पन्न झाली. शेवटी नपुंसकेतरलिंगात पुल्लिंग व स्त्रीलिंग असे सहजच दोन भेद झाले आणि पूर्ववैदिक आर्यभाषेत तीन लिंगे दिसू लागली.

१३) सर्वाच्या शेवटी विभक्तीप्रत्यय उदय पावले. वचनांची तीन रूपे रानटी आर्यभाषेत होतीच. पैकी एकवचनाच्या रूपापुढे विभक्तीप्रत्यय लागून निरनिराळ्या विभक्त्यांची एकवचने बनत, द्विवचनाच्या रूपापुढे विभक्तीप्रत्यय लागून निरनिराळ्या विभक्त्यांची द्विवचनाचीं रूपे साधत व त्रिवचनाच्या रूपापुढे विभक्तीप्रत्यय लागून निरनिराळ्या विभक्त्यांची अनेकवचनाची रूपे तयार होत. प्रथमा जिला म्हणतात तीत शब्दापुढे फक्त वचनप्रत्यय लागलेले आहेत, विभक्तीप्रत्यय नाहीत. म्, इ, इ प्रत्ययवाल्यांचा समावेश प्रत्ययी व उपसर्गी समाजाच्या भाषेत विभक्तीप्रत्यय निर्माण झाल्यानंतर झाल्यामुळे व म, इ, इँ वाल्यांच्या भाषेत वचनप्रत्ययापलीकडे मजल गेली नसल्यामुळे त्यांच्या भाषेतील वचन रूपापुढे पुल्लिंगी विभक्तीप्रत्यय लागून निरनिराळ्या विभक्त्यांची रूपे साधत. म, इ, इँ वाल्यांचा समावेश झाल्यानंतर स्त्रीलिंगाचा उद्भव आर्य भाषात झाला, सबब समावेश झाला त्याकाळी स्त्रीलिंग असे निराळे लिंग भाषेत नसल्यामुळे, नपुसकशब्दांच्या प्रथमा व द्वितीया या दोन विभक्त्यांखेरीज बाकीच्या विभक्त्यांची रूपे पुल्लिंगवत् सहजच बनली. त्यामुळे संस्कृतभाषेस बहुत संदिग्धपणा आलेला आहे. कमलेन या तृतीयेच्या रूपावरून हे कमलेन रूप पुल्लिंगी शब्दाचे आहे की नपुंसकलिंगी शब्दाचे आहे हा निर्णय होत नाही. पण असा संदिग्धपणा संस्कृतभाषेत पुष्कळच आहे, इतकेच की इतर प्राचीन किंवा अर्वाचीन भाषापेक्षा बहुत कमी. उदाहारणार्थ, रामाभ्याम् हे रूप पुल्लिंगी आहे की नपुंसकलिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे की तृतीयेचे आहे की चतुर्थीचे आहे की पंचमीचे आहे, याचा बोध केवळ रूपावरून कोणताच होत नाही, बोध होण्यास संदर्भाची मदत लागते. भ्यस् हा प्रत्यय चतुर्थी अनेकवचनी व पंचमी अनेकवचनी एकच आहे. भ्यम् हा प्रत्यय एकवचनी व अनेकवचनी सारखाच लागे. म्हणजे एकच प्रत्यय अनेक विभक्त्यांचे काम करितो.