Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

६) अ मध्ये महाप्राण घातला म्हणजे ह होई व ह मधून महाप्राण काढला म्हणजे अ उच्चार होई.
७) आर्यपूर्वजभाषात कालांतराने प्रत्यय उत्पन्न झाले व प्रथम प्रत्यय वचनांचे झाले.
८) दोन निरनिराळे वचनप्रत्यय लावणारे दोन भिन्न समाज होते. पैकी एक समाज स्, स् + स् , स् + स् + स् हे प्रत्यय लावी. दुसरा समाज म् व इ हे दोन प्रत्यय आणि इ हा तिसरा प्रत्यय लावून शिवाय एक दोन तीन या मात्रा लावून वचने दाखवी. येणेप्रमाणे दोन वचनप्रत्यय लावणारे दोन समाज होते.
९) तिसरा एक समाज होता तो स्, स् + स् व स् + स् + स् ही संख्यादर्शक अक्षरे नामाच्या पाठीमागे उपसर्ग म्हणून लावी.
१०) या तिन्ही समाजात अद्याप लिंगप्रत्यय किंवा विभक्तिप्रत्यय लावण्याचा प्रघात पडला नव्हता. मनात स्त्रीपुरुषभेद असे, परंतु वैय्याकरणिकलिंग या समाजात अद्याप माहीत झाले नव्हते. अशा काळी उत्तमपुरुषवाचक व मध्यमपुरुषवाचक सर्वनामांची एकद्वित्रिवचनाची रूपे बनली गेली व ती भाषेत इतकी दृढ झाली की लिंगप्रकरणी ही दोन्ही सर्वनामे कायमची अव्यय ठरली. त्वं म्हणजे स्त्री, पुरुष की पोर याचा बोध त्वं या रूपाने होत नाही, तर इतर कोणत्यातरी ज्ञापकाने होतो. याकाळी स् हा संख्यावाचक शब्द योजणाऱ्या समाजाचे सर्व प्रातिपदिकशब्द हलन्त होते. गाव्, हरव्, गुरव्, देवय्, रमय्, मातर्, पितर्, नर्, अभिजित्, प्रतिपद् असे सर्व शब्द हलन्त असत. म् इ व इ हे प्रत्यय योजणाऱ्या समाजाचे शब्द हलन्त व अजन्त असे दोन्ही प्रकारचे असत.
११) उत्तमपुरुषवाचक व मध्यमपुरुषवाचक सर्वनामांची तिन्ही वचनांची रूपे प्रत्ययी
समाजाच्या भाषेत जशी होती तशी उपसर्गीं समाजाच्या भाषेतही होती. म्, इ व इ प्रत्यय योजणाऱ्या समाजात या सर्वनामांची रूपे कशी असत ते समजण्यास काही एक गमक राहिलेले माझ्या आढळात अद्याप आलेले नाही. प्रत्ययी समाजाच्या भाषेत अहम्मि, आमि, मि ही रूपे असत व उपसर्गी समाजाच्या भाषेत अहम् हे रूप असे पैकी आमि, मि ही सर्वनामरूपे धातूपुढे प्रत्ययी समाज लावी व अहम्, अम्, म् ही रूपे उपसर्गी समाज लावी. भवामि, अद्मि या क्रियापदात प्रत्ययी भाषेची रूपे आली आहेत व अभवम्, भवेयम्, अकरम्, तारिषम्, या रूपात उपसर्गी भाषेची रूपे आली आहेत. भवानि रूपात अहन सर्वनाम योजणाऱ्या समाजाच्या प्रत्ययी भाषेचा दाखला राहिला आहे आणि जगाम व ददौ या रूपात आणिक दोन प्रत्ययी समाजाच्या भाषेचे चिन्ह राहिलेले दिसते. आमि, मि रूपे योजणाऱ्या पूर्ववैदिक समाजापासून वर्तमान मराठीतील मी सर्वनामरूप आले आहे. अहम् सर्वनामरूप उपसर्गी भाषेतून वैदिक भाषेत उतरले आहे. तेव्हा वैदिक आर्य ऋषी उपसर्गी भाषा बोलणाऱ्या कोणत्यातरी अनार्य समाजाच्या सहवासाला व छायेखाली काही काळ होते असे झाले. परकीयांच्या दास्यांतून मुक्त झाल्यावर अहं रूप योजणारे ऋषी भारतवर्षात आले व दास्यांत कमाविलेल्या गुणांच्या व तपाच्या जोरावर सर्व आर्यांचे पुढारपण सहजच त्यांच्या गळ्यात पडले. भारतवर्षात निरनिराळ्या पोटभाषा बोलणारे हे सर्व समाज एकवटले आणि वैदिक भाषेपासून पाणिनीय संस्कृत भाषा जन्मली. इतर आर्यसमाजातील कनिष्ट दर्जाचे जे प्राकृत लोक होते त्यात त्या त्या समाजाच्या पोटभाषा तशाच चालू होत्या. त्यांच्यापासून प्राकृत झाल्या व प्राकृत भाषांपासून सध्याच्या मराठी, हिंदी, गुजराथी, बंगाली वगैरे प्राकृतिक भाषा झाल्या.