Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
शिवाय असेही जर दाखविता आले की अ हे रूप सर्वात प्राचीन आहे, तर गलन्ती पक्षाला वर तोंड काढावयाला जागाही रहात नाही. समर्थनार्थ, आमि, मि व अम ही सर्वनामे समकालीन आहेत की विषमकालीन आहेत ते पाहू. वदामि व वेद्मि या दोन रूपात आमि व मि ही दोन सर्वनामे आहेत व ती एकाचकाळी प्रचलित होती. पैकी आमि जुने म्हणण्यास व मि नवे म्हणण्यास काहीच प्रमाण नाही. वैदिक लेट् घ्या. इत श्च लोप: परस्पैपदेषु, या सूत्रात पाणिनी सांगतो की, लेटांत परस्मायक प्रत्ययांतील इ चा लोप विकल्पाने होतो. म्हणजे मि व म, सि व स्, ति व त् असे दोन प्रकार प्रत्ययांचे होतात. पैकी मि जुना व म नवा म्हणण्यास काहीच आधार नाही. दोन्ही समकालीन आहेत आणि जर काहीचा आधार नाही, तर मि चा म् होण्यास हजार-पंधराशे वर्षाचा कालावधी कोठून काढावयाच? कोणी म्हणेल की अन्त्य स्वरांचा व व्यजनांचा लोप करण्याकडे सर्व भाषांची प्रवृत्ती दिसते; तद्वत् मि तील इ चा लोप झाला. होय, अशी प्रवृत्ती भाषात दिसते. परंतु, ही प्रवृत्ती समकालीन नसते, हजार पंधराशे वर्षांच्या कालावधीने अंतरित असते. हा कालावधी मि चा म् व्हावयाला उपलब्ध नाही. सबब, मि चा म् झालेला नाही व आमि चा अम् झालेला नाही. दोन्ही स्वतंत्र आहेत व समकालीन आहेत. वैदिक लेट् व लुङ् घ्या. तारिषम् व अतारिषम् अशी लेट्ची व लुङ् ची रूपे आहेत. मूळ तृ धातु. त्याला सिप् होऊन तारिष असे अंग झाले. नंतर अम् प्रत्यय लागून तारिषम् रूप झाले आणि अ उपसर्ग व अम् प्रत्यय लागून अतारिषम् रूप झाले. तारिषम् लिङथर्क आहे व अतारिषम् भूतार्थक आहे. येथे दोन्ही रूपात अम् हा प्रत्यय आहे. अम् हा प्रत्यय भूतार्थक लुङ् चा च तेवढा आहे असे नाही, लिङर्थक लेट् चाही आहे. तारिषम् व अतारिषम् ही दोन्ही रूपे, शिवाय, समकालीन आहेत कोणी असे म्हणेल की, अम् हा प्रत्यय भूतकालदर्शक आहे व आमि हा प्रत्यय वर्तमानकालदर्शक आहे. तर हेही म्हणणे टिकण्यासारखे नाही. लेट्, विधिलिङ् व अशीर्लिङ् यामध्ये अम् प्रत्यय लागतो, आणि लेट् व लिङ् हे लकार काही भूतार्थक नाहीत. ही इतकी कारणे मि व अम् ही रूपे आमि चे अपभ्रंश नाहीत, हे सिद्ध करण्यास पुरे आहेत. आता, अ व औ ही रूपे आमि चे अपभ्रंश आहेत की काय ते तपासू. चकर् अंगाला अ सर्वनाम लागून चकर रूप होते. चकर हे रूप पूर्ववैदिक भाषात केवळ भूतकालदर्शकच तेवढे नसे, वर्तमानकालदर्शकही असे. वैदिक भाषेतही चकर भूतार्थी, वर्तमानार्थी व भविष्यार्थीही योजिले जात असे. हे स्वच्छ सांगण्याकरता पाणिनीने छंदसि लुङ्लङलिट: हे सूत्र रचिले. या सूत्रात असे सांगितले आहे की, छंदोभाषेत लुङ्, लङ् आणि लिट् हे भूत, भविष्य, वर्तमान, आज्ञार्थ, संकेतार्थक वगैरे वाटेल त्याअर्थी योजिले जातात. उदाहरणार्थ, अद्य ममार हा प्रयोग पाणिनीय भाषेतील अद्य म्रियते या वाक्याप्रमाणे वर्तमानकालवाचक आहे. लक्षणेने वर्तमानकालवाचक आहे, असे सांगण्याचा पाणिनीचा हेतू नाही, तर वाच्यार्थाने वर्तमानकालवाचक म्हणजे लङर्थक आहे असा पाणिनीचा आशय आहे.