Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

वैदिक अहम् हे एकच रूप आहे. परंतु, पूर्ववैदिक १ आमि, २ मि, ३ अस्, ४ अ, ५ औ, ६ आनि, ७ ए, ८ इ, ९ ऐ अशी रूपे आहेत. तसेच, वैदिक त्वं हे एकच रूप आहे. परंतु पूर्ववैदिक १ स्, २ सि, ३ असि, ४ अस्, ५थ, ६ ह, ७ हि, ८ से, ९ थास्, १० स्व, अशी १० रूपे आहेत. याचा अर्थ काय? एकाच पूर्ववैदिक भाषेत अहम् हा अर्थ व्यक्त करण्याकरता ९ निरनिराळे प्रकार असत की काय? व त्वं हा अर्थ व्यक्त करण्याकरिता १० निरनिराळे प्रकार असत की काय? या प्रश्नाला उत्तर असे की पूर्ववैदिक एकच भाषा नव्हती, अनेक भाषा असत. त्या अनेक भाषांत फार प्राचीनकाळी ही दहा रूपे साक्षात नित्याच्या व्यवहारात बोलण्यात येत असत. पुरुषवाचकसर्वनामांच्या दृष्टीने पहाता, पूर्ववैदिकभाषांचे मोठे दोन वर्ग म्हटले म्हणजे आत्मनायक सर्वनामे योजिणाऱ्या भाषांचा पहिला वर्ग व परस्मायक सर्वनामे योजिणाऱ्या भाषांचा दुसरा वर्ग. आत्मनायक भाषांत तीन पोटभाषा असत; एक पोटभाषा अहमर्थक ए हे सर्वनाम योजी, दुसरी पोटभाषा इ हे सर्वनाम योजी आणि तिसरी पोटभाषा ऐ हे सर्वनाम योजी, परस्मायक भाषात सहा पोटभेद असत; एक पोटभाषा अहमर्थक आमि हे सर्वनाम योजी, दुसरी मि हे रूप योजी, तिसरी अम् हे रूप योजी, चवथी अ हे रूप योजी, पाचवी औ हे रूप योजी आणि सहावी आनि हें रूप योजी. १) वदामि, २) वेद्यि, ३) अवदम्, ४) उवाद, ५) ददौ, ६) वदानि, ७) वदे, ८) अवदे, ९) वदै, या नऊ रूपातील अहमर्थक आमि, मि, अम् इत्यादी शब्द एकाच भाषेने जरूर पडेल त्याप्रमाणे किंवा मनास वाटले त्या लहरीप्रमाणे मुद्दाम निर्माण केलेले नाहीत. वद्कपासून वदामि हे रूप योजिणाऱ्या भाषेला विद्पासून विदामि रूप खचित करता आले असते. तसेच, अवदामि, उवदामि, चकर्मि किंवा चकरामि, अशी आमि ह्न प्रत्ययान्त रूपे खचित बनविता आली असती. ती तशी एका साच्याची न बनता, वेद्मि, अवदम्, उवाद, चकर अशी भिन्नप्रत्ययान्त रूपे वैदिक भाषेत बनलेली आढळतात. वर्तमानकाली आमि, भूतकाली अम्, आज्ञार्थी आनि, लिटर्थी अ किंवा औ, हे प्रत्यय वैदिक ऋषींनीं एका काळी एका ठिकाणी बसून सर्वसंमतीने मुद्दाम बनविलेले नाहीत. भाषा अशा कृतक तऱ्हेने कधी बनत नसते. तसेच हजार पंधराशे वर्षात अन्त्य अक्षरांचा म्हणजे उच्चारांचा लोप किंवा बदल होऊन, आमि चे आनि किंवा औ कोणत्याही जादूने बनण्यासारखे नाही. तेव्हा, हे निरनिराळे प्रत्यय उप्तन्न होण्याचा एकच रस्ता रहातो. तो हा की, ही धातूंना लागणारी निरनिराळी सर्वनामरूपे वैदिक भाषेत तत्पूर्वकालीन अनेक भाषांतून आलेली आहेत दुसऱ्या एका रस्त्याने आपणाला याच अभ्युपगमाकडे यावे लागते. मूळचे वैदिक भाषेतील हे दहा लकार काय आहेत? वर्तमान, भूत, भविष्य, संकेत, आज्ञार्थ, विध्यर्थ, हे मुळात काय होते? पृथक्करण व अन्योन्य तुलना करून हे दहा लकार मुळात काय होते त्याचा छडा लावू.