Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
इतकेच नव्हे तर नवव्या दहाव्या शतकांच्या सुमारास नंदुरबार प्रांतातील कित्येक यजु:शाखीय व्यवहाऱ्यांनी व सराफांनी व रंगाऱ्यांनी इराण, अरबस्थान व शामळदेश ह्यांच्याशी बेपार करता करता काही मुसलमान अवलियांचे शिष्यत्व पतकरिले. जो कोणी पोटाला देईल, मग तो स्वधर्मी असो की विधर्मी असो, त्याची सेवा करण्यास हे नागोत्पन्न मराठे व यजुर्वेदी ब्राह्मण सारखेच तयार असत. मराठयांचा हा असा स्वभाव बनण्यास मुख्य कारण म्हटले म्हणजे ह्यांचे नागवंशत्व होय. वांशिक ऊर्फ सामाजिक कारणांचे व्यावहारिक, राजकीय व धार्मिक बाबतींवर परिणाम घडल्याशिवाय रहात नाहीत त्याचे हे एक उदाहरण आहे. अशा ह्या अज्ञानपंकांत डुबलेल्या प्राकृत जनांना त्याकाळी संस्कृत प्रांतात फोफावलेल्या संस्कृतीचे बाळकडू पाजिल्याशिवाय राष्ट्रचालकांची व ह्या प्राकृत जनांची समरसता होणे दुरापास्त होते. बाळकडू संस्कृतभाषाद्वारा पाजू म्हटले तर ते अशक्य होते, कारण प्राकृतांना संस्कृतभाषेची ओळख नव्हती. प्राकृतांची जी मराठी भाषा तीतून प्राकृतांना बाळकडू पाजावे, तर मराठी भाषा अद्याप अक्षरनिविष्टही झाली नव्हती. त्यातल्या त्यात एक बाब मात्र समाधानाची होती. ती अशी की, सर्व महाराष्ट्रदेशभर देशमुख्यांपासून रंकापर्यंत सर्व जातीची व सर्व लोकांची मराठी ही शालिवाहनाच्या पाचव्या शतकापासून नवव्या शतकापर्यंतच्या अवधीत जन्मभाषा बनून गेली होती. प्रांतिक भेदाने मराठी भाषा प्रांतोप्रांती किंचित् भिन्न उच्चारिली व बोलली जाई. परंतु, देवगिरी प्रांतातील मराठी भाषा मध्यवर्तित्वामुळे सर्व प्रांतांना सहज कळण्यासारखी असे. सबब, देवगिरीय मराठी भाषेला शिष्टत्व देऊन तिच्या द्वारा उच्च आर्य संस्कृतीचा प्राकृतजनांत फैलाव करण्याचा निश्चय राज्यकर्त्या ब्राह्मणक्षत्रियांनी केला. प्राकृतजनांत उच्च आर्यसंस्कृतीचा फैलाव करणे म्हणजे आर्यसंस्कृतीत जे वर्णधर्म, आश्रमधर्म, शौचधर्म, जातिधर्म, कुलधर्म, राष्ट्रधर्म व देशधर्म त्याकाली विद्यमान होते व जे ऐतिह्य, शास्त्र व कलाज्ञान वृध्दिंगत झाले होते ते प्राकृतजनांत पसरविणे. हे धर्म व हे ज्ञान प्राकृतजनांत त्याकाली नव्हते, असा ह्या विधानाचा अर्थ होतो. का नव्हते, तर ते प्राकृत लोक महाराष्ट्रक्षत्रियांच्या व ब्राह्मणांच्या राष्ट्राचे अवयव नव्हते, फक्त परकीय कामकरी होते. मराठे लोक नाग व माहाराष्ट्रिक या दोन लोकांच्या मिश्रणाने नुकतेच नवे लोक बनून फक्त पाच चारशे वर्षे लोटली होती. ह्या नव्या लोकांचे नवे मराठा राष्ट्र बनविण्याचा उच्च संकल्प तत्कालीन परकीय महाराष्ट्र क्षत्रिय व ब्राह्मण यांच्या मनात स्वहितार्थ व स्वसंरक्षणार्थ उपरिनिर्दिष्ट समरसतेच्या सिध्यर्थ आला. उत्तरेकडून स्वकीय क्षत्रिय व ब्राह्मण दक्षिणेत येण्याचे अनेक राजकीय व सामाजिक कारणांनी जसजसे उत्तरोत्तर बंद होत चालले, तसतसे महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, क्षुद्र व अतिक्षुद्र यांचा ममतेचा पाठिंबा मिळविणे राज्यकर्त्यांना अगत्याचे होऊन बसले.
१०४. समरसता चार द्वारांनी उत्पन्न करण्याचे ठरले. पहिले द्वार भक्तीचे. असंस्कृत बुध्दीच्या अव्युत्पन्न मराठया लोकांत राम, कृष्ण इत्यादी दैवतांची भक्ती पसरविण्याकरिता अभंग, ओव्या इत्यादी छंदात काव्यनिर्मिती शक ९०० पासून मराठीत ब्राह्मण कवींनी रचिली. दुसरे द्वार ऐतिह्याचे. भारत, भागवत व रामायण ह्यातील प्रसंगांवर गद्यपद्य रचना करून भारतीय ऐतिह्याचे ज्ञान मराठयात फैलाविण्याचा उपक्रम ह्याच काली झाला. तिसरे द्वार वेदान्ताचे. शांकरीय वेदान्ताचा प्रसार करण्याकरिता छिंदवाड्यातील सिंद राजांचा आश्रित जो मुकुंदराज त्याने ग्रंथरचना संस्कृतात व प्राकृतात ह्याच कालावधीत केली आणि पांचरात्रीय वेदांत ज्ञानदेवाने ह्याच मोसमात गायिला. चवथे द्वार ग्रामजोशांच्या व कुणब्यांच्या उपयोगाचे ग्रहज्योतिषाचे व फलज्योतिषाचे. श्रीपतीने आपली ग्रहगणिताची रत्नमाला असंस्कृतज्ञ ग्रामज्योशांना ग्रहगणित करून पंचांगे बनविता यावी म्हणून याच काळी मराठीत गुंफिली आणि सहदेवभाडळीने मेघमाला व संवत्सरफले मराठीत कुणब्यांच्या माहितीकरिता संस्कृतग्रंथांतून ह्याच काली उतरली. अशारीतीने मराठी भाषेचा ग्रंथावतार मराठा लोकांच्या अनुग्रहार्थ शक ९०० पासून शक १२०० पर्यंत होत होता व मराठा राष्ट्र आस्तेआस्ते साक्षर बनत होते.