Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
त्या रुढीचा एक चमत्कारिक व हास्यकारक परिणाम होई. भोसले हे पंचकुळीच्या बाहेरील मराठयांना परमार्थाने संस्कृतीदृष्टया कमतर समजत, तर उलट बाहेरील मराठे लोक भोसले व त्यांची दसकुळी व पंचकुळी ह्यांना रागाने कमअस्सल म्हणून नावे ठेवीत! महाराष्ट्र क्षत्रिय व नागमाहाराष्ट्रिकोत्पन्न मराठे हे दोघेही क्षत्रियच. फक्त संस्कृतीत तेवढा जमीनअस्मानाचा फरक. एका पक्षाची साम्राज्ये चालविण्याची योग्यता तर दुसऱ्याची सामान्य देशमुखीही टिकविण्याची अयोग्यता. एक चतुरस्र विद्येचा भोक्ता; दुसरा विद्येचा पिढीजात शत्रु. एक सनातनधर्माचा व गोब्राह्मणांचा कैवारी; दुसरा भेटेल त्या देवधर्माचा व साळूमाळूचा अनुयायी एक सुवर्णयज्ञोपवीत धारण करण्यात भूषण मानणारा. तर दुसरा नागनरसोबा डोक्यावर घेऊन नाचणारा. असल्या ह्या कनिष्ठ दर्जाच्या क्षत्रियाची व्यवस्था कशी लावावी, त्याला सनातनधर्माकडे कसा वळवावा व तो वाटेल त्याची पाइकी न करील अशी व्यवस्था कशी करता येईल, ही अडचण राष्ट्रकूट, यादव, वगैरे राज्यकर्त्यांना त्या त्या काली सहजच पडे. सदरील विवंचनेचे परिमार्जन त्याकाली कसे व कितपत करता आले ह्या बाबीची स्फुटता पुढे करतो.
१००. चालुक्यादींच्या राजवटीत नागमाहाराष्ट्रिकोत्पन्न मराठयांची व्याप्ती महाराष्ट्र देशात सामान्य शेतकऱ्यांपासून तो पाटीलदेशमुखांपर्यंत झालेली होती. प्रथम जेव्हा माहाराष्ट्रिक दंडकारण्यात व दक्षिणेत वसाहती करू लागले तेव्हा तर्फे तर्फेने त्यांनी गणराज्ये स्थापिली. गणराज्यांतील मुख्य जो ज्येष्ठराज त्याच्याकडे गणाचे पुढारपण असे व गणसंघातील गण त्याचे अनुयायी असत. चालुक्यादी सम्राटांच्या अमदानीत ज्येष्ठराज देशमुख बनले व गणातील गण पाटील व कुणबी बनले आणि गणराज्यसंस्था लुप्त झाली. पाटील म्हणजे पट्टकील. पट्टकील ह्या सामासिक शब्दाचा अर्थ त्यातील अवयवशब्दांवरून स्पष्ट आहे. अशोकादींच्या वेळी कापसाचे विणलेले पट्ट लिहिण्याकरिता वापरीत. जमिनीच्या मालकीची नोंद ह्या पट्टांवर करीत आणि ते पट्ट कीलकांत म्हणजे वेळूच्या पोकळ कांडात घालून सुरक्षित ठेवीत. पट्टकील म्हणजे पट्ट ज्यात ठेविले आहेत ती वेळूची पोकळ कांडे. हे पट्टकील ज्याच्या ताब्यात असत त्या गावच्या ग्रामणीला पट्टकीलक म्हणत. पट्टकीलक या शब्दाचा अपभ्रंश पट्टकील. पट्टकील या शब्दाचा मराठी अपभ्रंश पाटैलु, पाटेल, पाटील. तांब्याच्या पत्र्यांवर जमिनीच्या मालकीची नोंद करण्याची कला निघाल्यावर पाटैलु जवळ ताम्रपत्रेही संग्रहार्थ रहात. चालुक्यादींच्या कारकीर्दीत गणसंघातील काही गण गावगन्नाचे पाटैलु बनले आणि काही गण कुणबी बनले. कुणबी म्हणजे कुलपती. कुलपतीचा अपभ्रंश कुळवई, कुळबी, कुणबी. कुणबी म्हणजे शूद्र नव्हे. कुणबी म्हणजे जमीन करणारा. तो निपरवादपणे चालुक्यांच्या चातुर्वर्णिक अमदानीत नागमाहाराष्ट्रिकोत्पन्न मराठा असे, क्षुद्र निखालस नसे. क्षुद्रांचे काम फक्त सेवा करण्याचे. तात्पर्य, चालुक्ययादवांच्या राशियतीत जमीन करणारे कुणबी, कुणब्यांचे पुढारी पाटील व पाटलांचे पुढारी देशमुख एथून तेथून सर्व देशभर नागमाहाराष्ट्रिकोत्पन्न मराठे असत. सध्या कुणबी थोडासा गबर झाला म्हणजे तो अपाल्याला मराठा का म्हणवितो व सामान्य कुणब्याला पाटील या नावाने संबोधिले असता तो खूष का होतो त्याचे बीज असे आहे की कुणबी हा वंशाने मराठा आहे व मराठा म्हणवून घेण्याचा त्याला जन्मसिध्द व वंशसिध्द हक्क आहे. ही कुणबी, पाटील व देशमुख मराठामंडळी मराठी भाषा बोलणारी असून आर्य संस्कृतीच्या अगदी खालच्या पाह्यरीवर होती व ह्यांना आर्य संस्कृतीचा अभिमान जेणेकरून येईल ते उपाय महाराष्ट्र क्षत्रियांना व ब्राह्मणांना कर्तव्य होते.