Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

४२ वडिलांचे हे वर्तान बंगळुरास संभाजीराजास कळताच, त्याने आपला सर्व फौजफाटा व जंगी तोफखाना घेऊन मुस्तफाखानाच्या ताब्यातील तालुक्यास व ठाण्यास उपद्रव देण्यास सुरुवात केली. तो उपद्रव मुस्तफाखानास आटोपता आटपेना. एवढ्यानेच मुस्तफाखानाच्या मागील पीडा संपली असे नाही. चित्रकलचा नायक बिच्चकती भरमा नावाचा मोठा शूर संस्थानिक होता. त्याचा आणि आदिलशहाचा उभा दावा असे. त्याने उठावणी करण्यास हीच संधी साधिली. तो तीन हजार घोडेस्वारांचा मालक असे. तो इतका संपत्तीमान असे की, त्याच्या तरवारीचे म्यान सोन्याचे असे व त्याच्या स्वारांच्या तरवारीची म्याने रुप्याची असत. ह्या तीन हजार स्वारांखेरीज त्याचे पायदळही जबरदस्त होते. चित्रकलेच्या प्याद्यांची सा-या कर्नाटकात कजाख म्हणून ख्याती असे. भरम्याने आदिलशहाचा मुलूख लुटीत लुटीत खुद्द विजापूरची पेठ लुटली. संभाजी व भरमा यांच्या बंडाळीने कर्नाटकात दंग्यांची व धोप्यांची इतकी गर्दी झाली की, शहाजीला पकडल्याने गांधीलमाश्यांचे मोहोळ सुटल्याचा भास, नव्हे अनुभव, महमदशहास आला! म्हैसूर प्रांतातील आदिलशाही अंमल बहुतेक उठल्यासारखा झाला. संभाजीप्रमाणेच शिवाजीनेही वडिलांच्या अपमानकारक बंधाची वार्ता ऐकताच आदिलशाही मुलखावर चाल केली. तिचा प्रतिकार करण्याकरिता महमदशहाने बल्लाळ बेडर, फतेखान व मुसेखान हे तीन सरदार शिवाजीवर शक १५७० च्या आश्विनात रवाना केले. शिवाजी पुरंदर किल्ल्याच्या आश्रयाने होता. त्या किल्ल्याचा जाबता घेण्याचे काम फतेखान व मुसेखान यांनी घेऊन त्यांनी बल्लाळ बेडराकडे शिरवळचा भुईकोट सर करण्याची कामगिरी दिली. त्याप्रमाणे बेडराने येऊन शिरवळचे ठाणे काबीज केले. शिवाजीचा सरदार भिवराव शिरवळच्या आसपास होता. त्याने शिरवळच्या ठाण्याचे जसे रक्षण करावे तसे केले नाही. ते न आवडून, भिवरावास आल्या पावलाने परतून शिरवळचे ठाणे परत घेण्याचा शिवाजीने हुकूम केला. पुरंदराहून त्याच पावली दक्षिण दरवाजाने निघून, तीन कोस पलीकडे असलेले शिरवळचे ठाणे भिवरावाने मोर्चे लावून परत काबीज केले. त्यावेळी जी कत्तल झाली तीत बल्लाळ बेडर मारिला गेला. इकडे फतेखान व मूसेखान यांनी पुरंदरावर हल्ला चढविला तो शिवाजीने परतवून लाविला. तेव्हा इरेस चढून, फतेखान व मूसेखान हे पुन: संधी साधून किल्ल्याच्या दरवाजाला येऊन भिडले. ह्या ऐन बाणीच्या प्रसंगी शिवाजी काही निवडक लोकांसह किल्ल्याच्या बाहेर पडला व हल्ला करणा-या शत्रूच्या लोकास त्याने स्वत: मारून कहाडून दिले. त्या खणाखणीत मूसेखान प्राणास मुकला व फतेखान जीव घेऊन पळाला. फतेखान व मूसेखान यांच्या दुर्दशेची वार्ता ऐकून, महमद आदिलशहाचे धाबेच दणाणले. संभाजी व भरमा यांनी कर्नाटकात दंगल उडवून दिली आणि शिवाजीने पुणे प्रांतात धुडगूस घातला; त्यामुळे महमदशहा अतिच गांगरून गेला. इतक्यात त्याला अशी बातमी लागली की, शिवाजीने शहाजहानशी संधान बांधिले आहे व त्याच्या साह्याने तो आदिलशाही मुलखावर स्वारी करणार आहे. ह्या वार्तेने तर महमदशहाच्या तोंडचे पाणीच पळाले. शहाजहानला महमदशहा अती भिई. महमदशहा आपणा स्वत:ला शहाजहानाचा मांडलिक म्हणवी. त्याच्याशी दोन हात करण्याचे महमदशहाच्या स्वप्नीही नसे. काही थोडेसे औद्वत्य मनातल्या मनात तो शहाजहानाविषयी बाळगी, परंतु ते कर्नाटकातील बलिष्ठ सरदार जो शहाजी त्याच्या जोरावर. त्या शहाजीला तर महमदशहा दुखवून बसला. त्या अपमानाचा सूड घेण्याकरिता शहाजीच्या दोघा पराक्रमी पुत्रांनी दोन्हीकडून शत्रे उपशिली; इतक्यात शक १५७० च्या मार्गशीर्षात ज्याच्या बदसल्ल्याने महमदशहाने मूर्खपणाने शहाजीची इज्जत घेतली तो कपटी व बेवकूफ मुस्तफाखान एकाएकी मरण पावला. मरता मरता शहाजीवर चांगली नजर ठेवा, असे सांगून त्याने प्राण सोडिला! मुस्तफाखान मेल्यावर, आता आपल्याला कोणीही जबरदस्त वाली राहिला नाही हे पक्के ध्यानात उतरून व सर्व जग आपल्यावर उलटले आहे हे लक्षात घेऊन, महमदशहा शहाजीराजाशी नरम गोष्टी करू लागला. तुच्याकडे काहीही अपराध नाही, तुम्हाला धरण्याचा मी हुकूम दिला नव्हता, फक्त दरबारी एकदा येऊन जा म्हणून मुस्तफाखानाला निरोप पोहोचविण्यास सांगितले होते, त्याने बेवकूफपणाने तुम्हाला अटक केली, आता दिल सफा करून तुम्ही आपल्या दोघा पुत्रांना आवरून धरा आणि आपल्या जहागिरीवर सुखरूप अंमल करा, अशी गोड, मऊ व नरम भाषा महमदशहा वापरू लागला.