Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

४३. येथे शहाजीच्या चरित्राचा तिसरा भाग संपला. शक १५६८ त शहाजी आदिलशाही मनसबदार बनल्यापासून तो शक १५७१ त बंधमुक्त होऊन बंगळुरात स्वस्थानापन्न होई तावत्काळ पर्यंतची जी बारा वर्षे गेली त्यात महमदशहाचा ढिलेपणा, आदिलशाहीचा कमकुवतपणा, मुरारपंताचा खून, बड्या साहेबिणीची स्त्रीनायकी, मुस्तफाखानाचा कपटी स्वभाव इत्यादी चमत्कार पहात पहात, शहाजी शिरजोर बनून आदिलशहाला डोईजड झाला. ह्यावेळी शहाजीचे वय सुमार पंचावन्न असून, त्याचे दोघे मुलगे कर्तेसवरते झाले होते. पूर्वी निजामशाहीत असताना मलिकंबर, फतेखान व शहाजहान यांच्याशी शहाजीला एकट्याला झुंजावे लागले. आता आदिलशहाशी झगडताना त्याला त्याच्या दोन कर्त्या पुत्रांचे अकृत्रिम साह्य मिळू लागले. त्यामुळे जो मामला त्याला निजामशाही साधिता आला नाही, तो त्याला आदिलशाहीत सिद्ध करता आला. शहाजी येथून पुढे बंगळूर प्रांतात बहुतेक स्वतंत्र राजा बनला आणि आदिलशहाची त्याजवरील साहेबकी फक्त नाममात्र उरली. जयराम म्हणतो की, शहाजीराजासारखे प्रस्थ कर्नाटकात असल्यामुळे, आदिलशाही काही काळ मोंगलांच्या तडाख्यातून जिवंत राहिली. भीमेच्या दक्षिणेस ह्या काळी शहाजीराजा एवढा वजनदार व सामर्थ्यवान असा दुसरा पुरुष तत्कालीन शहात, राजात किंवा मुत्सद्यात कोणीही नव्हता. भीमेच्या उत्तरेस किंवा जयराम म्हणतो त्याप्रमाणे नर्मदेच्या उत्तरेस शहाजहान व दक्षिणेस शहाजी भरतखंडाची राजकीय शांतता रक्षण करीत होते. तात्पर्य, शहाजी म्हणेल ती पूर्व दिशा, असा मनू शक १५७१ त दक्षिणेत प्रवर्तित झाला आणि तो शहाजीच्या मृत्यूपर्यंत म्हणजे शक १५८५ पर्यंत चालला. त्यापुढे शिवाजीचा जगप्रसिद्ध मनू दक्षिणेत सुरू झाला.