Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
४४. शक १५७१ त बंगळूरास गेल्यावर, महमदशहास दिलेल्या वचनाप्रमाणे संभाजीला त्याने थोपवून धरले आणि चित्रकलच्या भरम्यावर स्वारी केली (१५७१). शहाजीराजा चित्रकलला जाऊन थडकला तेव्हा भरमा माशाची शिकार करीत होता. शहाजी आला ही वार्ता कळताच तो स्वार झाला आणि आपल्या सैन्यानिशी शहाजीवर धावून गेला. त्या धडकीत शहाजीच्या हातून भरम्यास गती मिळाली. भरम्याची सर्व बिरुदे व बाडबिछायत शहाजीने जप्त करून आदिलशहाकडे विजापुरास येऊन गुदरली. ती सर्व शहाजीस बक्षीस दिली. तेव्हापासून तंजावरचे भोसले ती बिरुदे वापरू लागले. भरम्यावरील ही स्वारी संपल्यावर शहाजीराजाला महमदशहाने विजापूरासच चार वर्षे मोठ्या इतमामाने ठेवून घेतले. अंत:स्थ हेतू असा की, कर्नाटकात जाऊन सूड घेण्याच्या इराद्याने त्याने स्वतंत्र राज्याची स्थापना करू नये व आपला बाप ओलीस असल्याची जाणीव जागृत राहून शिवाजीने जास्त बंडाळी माजवू नये. खुद्द विजापूरासच शहाजी राहिल्यामुळे, शिवाजीचा व शहाजीचा कोणताही व्यवहार घडल्यास तो उमगून येण्यास सुलभ पडावे, हाही एक हेतू होताच. शेवटी ह्या चार वर्षात महमदशहाची पक्की खात्री झाली की, शहाजी व शिवाजी यांचा पत्रोपत्रीही संबंध नसून, शिवाजी शहाजीच्या सल्ल्याने बिलकुल वागत नाही. तत्रापि, शहाजी ओलीस पडल्यासारखा झाल्याने शिवाजीने ह्या चार वर्षात आदिलशाही मुलखाला म्हणण्यासारखा स्पर्श केला नाही. येणेप्रमाणे शिवाजीचा थोडाबहुत बंदोबस्त झाला व पुण्याकडील पीडा शमल्यासारखी दिसली, तो शहाजीच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन कर्नाटकातील पाळेगारांनी बंडाळी मांडल्याच्या खबरीवर खबरी येऊ लागल्या. लहानसान मुसलमान सरदार ठिकठिकाणी होते त्यांच्या आपआपसातील वैमनस्यामुळेही बंडाळी आटोपात येईना. इतक्यात कुतुबशहाचा मुख्य वजीर जो मीरजुमला तो आदिलशाही प्रांतात शिरल्याची वार्ता आली. मीरजुमला म्हणजे त्या काळचे एक बडे प्रकरण होते. हा जातीचा इराणी असून, शक १५५२ च्या सुमारास दक्षिणेत आला. जवाहि-याच्या धंद्यावर याने खूप संपत्ती मिळविता मिळविता युक्तिकौशल्याने हा कुतुबशहाचा मुख्य वजीर झाला. ह्याने कुतुबशाही हद्द गंडीकोट्टचा दुर्भेद्य किल्ला घेऊन अर्काटापर्यंत वाढविली. ह्याच्या तैनातीस पाच हजार घोडेस्वार व वीस हजार पायदळ असे. ह्या सैन्याच्या जोरावर ह्याने पूर्व कर्नाटक जिंकिले, इतकेच नव्हे, तर जिंकिलेल्या प्रांताचा हा बहुतेक स्वतंत्र नवाब झाला व आपला धनी जो कुतुबशहा त्याला धाब्यावर बसवू लागला.