Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
२८. शहाजी विजापूरकरांकडे १५४७ त गेलेला पाहून आदिलशहा व मोंगल यांची कास धरलेला जाधवराव त्याच सुमारास निजामशाहीत मलिकंबराच्या कारवाईने पुन: परत आला. त्या काळी एका राज्यातून रुसून दुस-या राज्यात जाण्याचे व तेथून प्रसंग पाहून परत येण्याचे कृत्य अनीतीचे व कमीपणाचे मानीत नसत. स्वत: मलिकंबराने वेळ पडेल त्याप्रमाणे आदिलशाही व मोंगलाई यांचा आश्रय कितीदा तरी केला होता. खुर्रम, लोदी, रणदुल्लाखान, शिवाजीचा पुत्र संभाजी, औरंगजेबाचे पुत्र, अकबराचे पुत्र इत्यादी अनेक इसमांच्या धरसोडीची उदाहरणे जगजाहीर आहेत. जाधवराव निजामशाहीत आल्यावर मलिकंबराने शहाजीराजाला वठणीस आणण्याची मनाजोगती कामगिरी त्याला सांगितली आणि आपण स्वत: आदिलशहाने लुबाडलेला धारूर प्रांत काबीज करण्याच्या तयारीस लागला. आदिलशहा व शहाजी यांच्यावरील या दुतोंडी योजनेच्या विचारात व तयारीत असता, मलिकंबर शक १५४८ च्या वैशाखात वारला. मलिकंबराचा जावई जो विजापूरचा मुस्तफाखान त्याचे तर म्हणणे असे होते की, आपल्या श्वशुराला मूर्तिजाशहाने करणी वगैरे करून मारिले (साने, पत्रे यादी ४३८) आणि हे म्हणणे खरे नसेलच असे म्हणवत नाही. मलिकंबराने मूर्तिजाला गेली सव्वीस वर्षे इतके काही छळले होते की, त्याचा त्याने प्राण घेतला असल्यास तो देवाच्या घरी अपराधी ठरण्यास बरीच अडचण पडली असेल. मलिकंबराच्या मरणाने धारूरवरील स्वारी लांबणीवर पडली. शहाजीवरची जाधवरावची स्वारी १५४८ च्या पावसाळ्यानंतर सुरू होऊन, जाधवरावाच्या रेट्यापुढे शहाजी माहुली, जुन्नर, पारनेर, करकंब, मंगळवेढे या रस्त्याने आदिलशाहीत शक १५४९ च्या चैत्राच्या सुमारास रेटला गेला. ह्या बापआज्यांच्या रेटारेटीनंतर शिवाजीराजे भोसले यांचा जन्म शिवनेरीस १५४९ च्या वैशाखात झाला, असे बहुतेक नव्याजुन्या इतिहासलेखकांचे म्हणणे आहे. जेधे शकावली व बृहदीश्वर शिलालेख शिवाजीचा जन्मकाल शक १५५१ फाल्गुन वद्य ३ देतात. दोहोतून खरे साल कोणते ते ठरविण्याला निश्चित प्रमाण उपलब्ध आहे. त्यावरून शक १५४९ हे साल शिवजन्माचे धरणे योग्य दिसते. का की, शक १५५१ च्या चैत्रापासून आश्विनापर्यंत शहाजीवर जुन्नर माहुली प्रांतात कोणीही स्वारी केली नाही व स्वारी करणारा म्हणून म्हटलेला जो लखुजी जाधवराव त्याचा खून मूर्तिजाने शक १५५१ च्या आश्विनी पूर्णिमेस केला होता.