Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
२६. कार्तिक मार्गशीर्षात भातवडीच्या लढाईत नामोहरम झालेल्या आदिलशहाला जमीनदोस्त करण्याचा कट मलिकंबराने घातला. त्याने आपले विजयी सैन्य थेट विजापूरच्या इलाख्यात नेऊन, इब्राहीम आदिलशहाने वसविलेले नवरसपूर जाळूनपोळून खाक केले व जाताना वेढा घालून सोलापूरचा भुईकोट काबीज केला. ही मोहीम १५४७ च्या चैत्रवैशाखापर्यंत चालून पावसाळ्यात सैन्य स्वस्थळास आले. सैन्याबरोबर शहाजी व खेळोजी वगैरे भोसले मंडळीही राजधानीस परत आली. इकडे राजधानीत निराळीच मिसल बनून राहिली होती. मलिकंबराच्या बगलबच्यांनी मूर्तिज्याच्या मनात असे भरवून दिले की, भातवडीची लढाई, नवरसपूरची जाळपोळ व सोलापूरचा वेढा विजयाने शेवटास नेण्यात शहाजीचा पराक्रम विशेष नसून, मुख्य कर्तबगारी खेळोजी भोसल्याची आहे. अर्थातच, मूर्तिजाने शहाजीला न गौरविता खेळोजीचा आदर नवरसपूरच्या मोहिमेनंतर विशेष केला. खरी कामगिरी शहाजीची होती आणि तत्प्रीत्यर्थ दरबारी त्याचा आदर झाला पाहिजे होता. परंतु, तसा काही एक प्रकार न होता इतरांचाच जयजयकार झालेला पाहून शहाजी विमनस्क, खिन्न व अजुर्दा झाला. शहाजीला असे दिसले की, आज पंचवीस वर्षे ज्या मूर्तिजाची आपल्यावर मेहेरनजर असे व ज्याच्या कृपेच्या पाखराखाली पराक्रम करण्याची आपण ईर्ष्या बाळगिली तो मूर्तिजा आपल्यावर उलटला आहे. कर्त्या व चढत्या शहाजीच्या शत्रू मंडळीत आता घरचे भाऊ खेळोजी व राज्याचा धनी मूर्तिजा यांची गणना होऊ लागली. सासरा जाधवराव, वजीर मलिकंबर, धनी मूर्तिजा व चुलत भाऊ खेळोजी हे विरुद्ध झालेले पाहून शहाजीला सुरक्षिततेचा मार्ग धुंडाळणे भाग पडले. खिन्न होऊन स्वस्थ बसता तर शहाजी ह्या चौकडीपुढे नष्ट झाला असता. ज्या पराक्रमाचे तेज सहन न होऊन निजामशाहीतील प्रमुख सूत्रधार शहाजीच्या विरुद्ध झाले तोच पराक्रम आदिलशाहीतील मुख्य कर्णधारांना आदरणीय व स्वीकरणीय वाटला आणि त्यांनी विजापूरी येण्याबद्दल शहाजीशी संविधान लाविले. ते संविधान प्रशस्त भासून शक १५४७ च्या पावसाळ्यानंतर शहाजी आदिलशाहीला स्वसैन्यासह जाऊन मिळाला. तेथे पुढे शक १५४८ क्षय संवत्सरी शहाजीराजास त्याला साजेलशी मनसब व अक्कलकोट वगैरे जहागीर मिळाली (साने पत्रे यादी वगेरे ४१०, शिवदिग्विजय इ.)