Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
आदिलशहाकडील व मोंगलाकडील शेकडो सरदार शहाजीने पाडाव करून धरून आणिले. पैकी फरहादखान व रणदुल्लाखान हे आदिलशाही सरदार निजामशहाच्या चाकरीस राहिले. तेव्हापासून शहाजीराजे व रणदुल्लाखान यांचा जो स्नेह जडला तो मरणान्त अकृत्रिम राहिला. भातवडीचे हे घनघोर युद्ध संपल्यावर आदिलशाही व मोंगली सैन्यापैकी जे काही सैन्य पळून जात होते त्याला आदिलशहाकडील जोहरखान नामक सरदाराने थोपून धरून पाठलाग करणा-या निजामशाही सैन्याला परत तोंड दिले. निजामशाही सैन्याचे पुढारपण शरफोजीराजाकडे होते. ते ह्या पाठलागात वीरस्वर्ग पावले. ही बातमी शहाजीराजास कळताच ते व खेळोजीराजे ह्या दोघांनी आदिलशाही व मोंगलाई अवशिष्ट सैन्याचा फडशा उडविला. शक १५४२ च्या ब-हाणपूरच्या स्वारीत व शक १५४० तील नर्मदापारच्या मांडवगडाच्या स्वारीत शहाजीने मलिकंबराच्या अध्यक्षत्वाखाली बरी बहाद्दरी केली होती. परंतु शक १५४६ तील या भातवडीच्या घोर संग्रामात शहाजीचे लढवय्येगिरीचे व पुढारपणाचे सर्व गुण ठळकपणे जगाच्या निदर्शनास आले. ह्या संग्रामात वृद्ध मलिकंबर हा ऐंशीच्या घरात गेलेला असून नावाला मात्र सेनाध्यक्ष होता, बाकी लढाईची सर्व व्यूहरचना ऐन तिशीत असलेल्या तरुण शहाजीची होती. युद्धानंतर मूर्तिजाशहाच्या म्हणजे बु-हाणनिजामशहाच्या दर्शनाला मंडळी गेली, त्यात शिरस्त्याप्रमाणे यद्यपि मलिकंबराला दरबारी शिलशिल्याला अनुसरून अग्रेसर केले होते, तत्रापि निजामशहाने विशेष मर्यादा, विशेष बहुमान व विशेष आदरकर्त्या व आवडत्या शहाजीराजाचा केला (बृहदीश्वरशिलालेख). त्यामुळे ह्या प्रसंगानंतर वृद्ध मलिकंबर व तरुण शहाजी ह्यांत द्वेष, मत्सर व वैनस्य यांचा प्रवेश झाला. गेली पंधरा वीस वर्षे जाधवरावांनी मत्सर केला. आता त्यांच्या जोडीला अंबरही जाऊन बसला.