Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

३१. दुर्बल मूर्तिजाच्या बोकांडीस ही मनुष्यकृत हानी शक १५५१ च्या अखेरीस बसल्यानंतर शक १५५२ त दैवी हानीने त्याला पालथे पाडिले. शक १५५२ साली गोदातीरी अवर्षणाने भयंकर दुष्काळ पडला. एका हुनक्यास म्हणजे लहान होनास दोन शेर दाणे झाले. करवसुली शक्य नसल्यामुळे मूर्तिजाची आधीच खंगावलेली तिजोरी पूर्णपणे शुष्क होऊन गेली. फौज परागंदा, कारभारी अजुर्दा व मुलूख उकिरडा बनून मूर्तिजा हलाखीच्या अगदी शेवटच्या पायरीस पोहोचला. दुष्काळाचा त्याचा एक मात्र फायदा झाला. शक १५५२ साली त्याच्या तिन्ही शत्रूंच्या हालचाली काही काळ स्तब्ध राहिल्या. पंचभुतांच्या प्रकोपापुढे शत्रूमित्र अशा सा-यांच्याच नाड्या आखडल्या. शहाजहानचे सबंध १५५२ साल दक्षिणेत फुकट गेले. आदिलशाही मुत्सद्दी निजामशाही मरू द्यावी की तरू द्यावी हा विचार करीत बसले. शहाजी दुष्काळानंतरच्या बनावाला तोंड देण्याकरिता आपले हत्यार पाजवीत राहिला आणि तिघांचा भक्ष्य जो मूर्तिजा तो दैवी व मानवी संकटातून पार पाडण्याचा मार्ग शोधू लागला. निजामशाहीची ही अशी हलाखी झालेली पाहून शहाजी व आदिलशाही मुत्सद्दी यास दया आली. निजामशाही बुडाली असता मोंगलांच्या व आपल्यामधील पाचर नाहीशी होऊन मोंगलांशी प्रत्यक्ष गाठ पडणे बरे नव्हे, हे आदिलशाही मुत्सद्दी जाणून होते. सबब मूर्तिजाशी त्यांनी तह केला (शक १५५२ मार्गशीर्ष). मुरारपंताने सोलापूर, परंडा व कोकण हे निजामशाही प्रांत गेल्या दोन चार महिन्यात जिंकिले होते ते निजामशहाने आदिलशहास द्यावे, शहाजीने जिंकिलेला प्रांत शहाजीकडे ठेवावा, आदिलशहाने निजामशहास मोंगलांविरुद्ध मदत करावी व फतेखानास बंधमुक्त करू नये, इत्यादी करारमदार ह्या तहात ठरले व निजामशाहीचे मरण किंचित लांबणीवर ढकलले गेले. इतक्यात मोंगलांचे सैन्य आपल्या हद्दीवर आले अशी मूर्तिजास बातमी कळली. तिने घाबरून जाऊन कुमकेस येत असलेल्या आदिलशहाच्या व शहाजीच्या सैन्याची वाट न पाहता, मूर्तिजाने नुकत्याच केलेल्या तहाची कलमे मोडण्यास सुरुवात केली. वेडसर मूर्तिजाच्या डोक्यात अशी विचित्र कल्पना आली की, आपल्यावर ओढवलेल्या दैवी व मानवी आपत्ती आपला नवीन दिवाण जो तकरीबखान त्याच्या पायगुणामुळे आल्या. अर्थात त्याला काढून टाकिले असता, सर्व काही पूर्ववत सुरळीत चालेल, ह्या कल्पनेने तकरीबखानास रजा देऊन आपला जुना दिवाण जो फतेखान त्याला त्याने बंधमुक्त केले व शक १५५२ च्या पौष वद्य एकादशीस पुन: वजिरीवर स्थापन केले. क्षणात तह मोडण्याची मूर्तिजाची ही कसरत पाहून आदिलशाही मुत्सद्दी थक्क झाले. ह्याच सुमारास मूर्तिजाने चतुर साबाजी आपल्या राणीशी लागू असावा अशा संशयावरून त्याचा वध केला (चांदोरकर - चतुर सांबाजी- भा.इ.सं. १८३४ वृत्त). फतेखानाचे व आदिलशाही मुत्सद्यांचे वाकडे होते. सबब, प्रधान पदावर आल्याबरोबर त्याने शहाजहानशी सूत्र बांधिले आणि त्या सूत्रान्वये कारवाई आरंभिली. त्याने वेडा म्हणून मूर्तिजास प्रतिबंधात ठेविले; मूर्तिजाच्या विश्वासातील पंचवीस वजनदार सरदारास एका दिवसात ठार केले आणि सा-यावर कळस म्हणून दोनचार महिन्यांनी म्हणजे शक १५५३ च्या चैत्रवैशाखात खुद्द बु-हाणशहाचा ऊर्फ मूर्तिजाचा प्राण घेतला (जेधे शकावली). मूर्तिजाला दैवी व मानवी आपत्तीतून कायमचे मुक्त केल्यावर त्याच्या सात वर्षांच्या हुसेन नामक अर्भकास फतेखानाने मसनदीवर बसविले आणि नंतर स्थिरस्थावर झालीशी वाटून तो शहाजहानशी उर्मटपणे वागू लागला. शहाजहानाने तत्काल सैन्य पाठवून त्याला तेव्हाच नरम केले व आठ लाख रुपये नजर देऊन व दरसाल खंडणी ठरवून निजामशाहाला आपला
मांडलिक बनविले (१५५३ ज्येष्ठ आषाढ).