Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
२२. तत्कालीन हिंदूंची व रानटी अनार्यांची परीक्षा झाल्यावर आता मुसलमानांची परीक्षा करू. त्या काली महाराष्ट्रात तीन प्रकारचे मुसलमान असत. इराण, तुराण, अरबस्तान व अफगाणिस्तान यातून येणा-या मुसलमानांना अस्सल समजत. ह्या मुसलमानांचा पहिला वर्ग. ह्या अस्सलापासून शुद्रातिक्षुद्र स्त्रियांच्या ठायी झालेल्या लेकवळ्या मुसलमानांचा दुसरा वर्ग आणि येथीलच खाटीक, हलालखोर, तांबोळी, पटवेगार, मोमीन, रंगरेज, लोहार, बोहरी इत्यादी बाटलेल्या जातींचा तिसरा वर्ग. वतने राखण्याकरिता कित्येक ब्राह्मण व मराठे जे बाटले तेही या तिस-या वर्गातच पडतात. पैकी, या तिस-या वर्गातील लोकांचा पेशा उदभ्यांपैकी असल्यामुळे राजकीय विचारात त्यांची गणती करण्याची जरूर नाही. मुसलमानी रिवाजात मूळच्या जाती नाहीत, तेव्हा येथील आर्यानार्य स्त्रियांच्या पोटून त्यांना जी संतती झाली ती ते लेकवळे किंवा युरोपियन मानतात त्याप्रमाणे हाफक्यास्ट मानीत नाहीत, फुलक्यास्टच मानतात. लेकवळा हा शब्द येथे मिश्रविवाहोत्पन्न संतती एवढ्याच दृष्टीने योजिला आहे. हे लोक येथे स्थायिक होऊन कित्येक पिढ्या झालेल्या होत्या व ह्यांना दक्षिणी किंवा दख्खनी असे नामाभिधान पडले होते. इराण, तुराण, अरबस्थान, इकडून जे नवीन मुसलमान येत त्यांना परदेशी ही संज्ञा असे. ह्या दक्षिणी व परदेशी मुसलमानातून निजामशाही व आदिलशाही राज्यात मुत्सद्दी व लष्करी अंमलदार मिळत आणि ह्यांच्याच कर्तबगारीवर राज्याची स्थिरस्थावरता अवलंबून असे. निजामशाही व आदिलशाही राशियतीच्या प्रारंभीच्या पन्नास शंभर वर्षात दक्षिणी परदेशी असा भेद मुसलमानात उद्भवला नव्हता. सर्वच मुसलमान परदेशी होते. पुढे जी घराणी ह्या पेशात पिढ्यानपिढ्या कायम होऊन राहिली त्यांना दख्खनी किंवा दक्षिणी अशी संज्ञा पडली. ह्या दक्षिणी मुसलमानांचे येथे कायमचे हितसंबंध निर्माण झाले आणि त्यांच्या हितसंबंधाची व पातशाही हितसंबंधांची तेढ पडू लागली. ह्या तेढीला तोड म्हणून पातशाहा परदेशी नवीन मुसलमानांना आपल्या दरबारी सदा बोलवीत, कारण नवीन परदेशात हितसंबंध उद्भवले नसल्यामुळे पातशाही हितसंबंधांशी परदेशी कायमचे दक्षिणी बनत तोपर्यंत काही काळ त्यांच्या तेढीही उद्भवत नसत. दक्षिणी व परदेशी असे हे दोन पक्ष एकमेकांविरुद्ध चालवून शाहा आपल्या हाताखालील अंमलदारांना दाबात ठेवण्याचा प्रयत्न करीत. मनुष्यांना वागविण्याची नाजुक करामत ज्या सुलतानाला साधे त्याच्या हाती हा प्रयत्न फलप्रद होई. परंतु, एखादा सुलतान कमअक्कल किंवा दुर्बल किंवा पोरसवदा निपजला म्हणजे हे दोन्ही पक्ष उर्मट होऊन सुलतानाच्या कह्यात न वागता त्याच्यावरच कुरघोडी करीत.