Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

त्रैवर्णिकांवर ओढवलेल्या विपत्तीची याद आणीक किती तरी वाढविता येईल. इथे फक्त मुख्य बाबींचा नामनिर्देश केला आहे. त्यावरून स्पष्ट दिसते की जैनबौद्धांनी शुद्ध ब्राह्मणदींचा पूर्ण पाडाव केला आणि क्षुद्रांचा पूर्ण विजय झाला. उत्तरकुरूंत जो अर्धरानटी क्षुद्र केवळ दासकर्म करून समाजसोपानाच्या अगदी खालच्या पाह्यरीवर लाथाडला जात होता, तो आता नंदांच्या व मौर्याच्या क्षुद्र व वृषल राजवटीत अध्यात्म, नीती, प्रवज्या, एकवर्णता, सर्वसमता व साम्राज्य यांचा विजयी चालक झाला. बुद्ध व जिन यांनी, विशेषत: गौतम बुद्ध याने, केलेली ही क्रांती केवळ सामान्य धर्मक्रांती नव्हे किंवा राजक्रांती नव्हे किंवा मतक्रांती नव्हे; ही सर्वव्यापी अशी भयंकर सामाजिक क्रांती होती. ह्या प्रचंड क्रांतीने वैदिक समाजाचे पाये उखडून, चातुर्वर्णिक समाज सुलटाचा उलटा होऊन गेला. गौतमबुद्धासारख्या व्रात्य क्षत्रियाच्या पुढारपणाखाली वर्णभ्रष्ट क्षुद्रांनी ब्राह्मणादी वर मिळविलेल्या ह्या विजयाने यद्यपि धर्मभ्रष्ट बौद्धांचे शत्रुत्व ब्राह्मणादींनी पत्करिले तत्रापि बुद्धाच्या अलौकिक कर्तबगारीचे  कौतुक व आदर ब्राह्मण प्रांजलपणे केलाशिवाय राहिले नाहीत. बुद्धाची गणना ब्राह्मणांनी श्रीकृष्णादींच्या बराबरीने दशावतारात केली आणि ओढवलेल्या विपत्तीच्या परिमार्जनार्थ उपाययोजण्यास आरंभ केला. विपदि धैर्य हा ब्राह्मणाचा स्वभावसिद्ध गुण ह्यावेळी जगाच्या प्रत्ययास आला. ह्याकाली ब्राह्मणांच्या विरुद्ध बहुतेक सर्व जग उठल्यासारखे झाले. खुद्द ब्राह्मणांपैकी कित्येक बुद्धभिक्षु झाले; क्षत्रिय व वैश्य यांच्यापैकी शेकडोंनी क्रियालोप करून व्रात्यपण अंगीकारिले आणि घरातील स्त्रियादेखील क्षुद्रप्राय होऊन गेल्या. अशी दुरवस्था सभोवार माजल्यामुळे, कात्यायनकाली प्रत्यभिवादनविधीत ब्राह्मण इष्टानिष्ट प्रपंच करू लागले. शुद्ध व सद्धर्मी क्षत्रिय किंवा वैश्य भेटावयास आला असता ब्राह्मण प्रेमाने प्रत्यभिवाद करीत आणि व्रात्य क्षत्रिय किंवा वैश्य भेटला असता प्रत्यभिवादापासून पराङ्मुख होत. सर्वच स्त्रिया क्षुद्रवत् होऊन गेल्यामुळे, शुद्ध की भ्रष्ट हा निर्णय करण्याचे तत्कालिक साधन नसल्याने, ब्राह्मण कोणत्याच वर्णाच्या स्त्रीचे प्रत्यभिवादन करीत नसत. पाणिनिकाली त्रैवर्णिक स्त्रियांचे प्रत्यभिवादन गुरुस्थानीय ब्राह्मण अगत्याने का करीत व कात्यायनकाली का करीतनासे झाले, असा प्रश्न प्रस्तुत विवेचनाच्या प्रथमारंभी उद्भवला होता. तसेच पाणिनिकाली सर्व क्षत्रियांचे व वैश्यांचे प्रत्यभिवादन ब्राह्मणगुरू अवश्यमेव का करीत आणि कात्यायनकाली काही क्षत्रियवैश्यांना प्रत्यभिवादनांतून का वगळीत, असाही प्रश्न निघाला होता. ह्या दोन प्रश्नांना उत्तरे देण्याकरिता प्रस्तुत कलमापर्यंतचा तपशील द्यावा लागला. त्यावरून प्रत्यभिवादनाभावाचे खरे कारण काय होते ते कळून आले. ब्राह्मण उन्मत्त होऊन स्त्रियांचा व वैश्यक्षत्रियांचा उपमर्द करीत असा प्रकार बिलकूल नव्हता. प्रकार अगदी उलट होता. जे वैश्यक्षत्रिय उन्मार्गगामी व व्रात्य होऊन शिष्यत्व सोडून गेले व ज्या स्त्रिया क्षुद्रप्राय बनल्या त्यांचे प्रत्यभिवादन व कुशलचिंतन करणे ब्राह्मणांना लज्जास्पद झाले होते. ह्या लज्जास्पद विपत्तीतून ब्राह्मणादी सद्धर्मी त्रैवर्णिक कसे तरून गेले त्या विषयचा किंचित उल्लेख पुढील कलमात करू.