Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

युरोपियन भौतिक शास्त्रीय संस्कृतीच्या रेट्याचा दक्षिणी शहावर हा असा परिणाम झाला. दिल्लीच्या मोंगलांवरही अशीच छाप शास्त्रशस्त्रसंपन्न पोर्तुगीज लोकांची बसली. प्राजक्ताचे झाड हलविले असता फुले जशी टपटपा गळून पडतात, तशी गुजराथ, कोंकण व बंगाल या देशांच्या किना-यांवरील बंदरे पोर्तुगीज लोकांच्या शस्त्रांच्या व अस्त्रांच्या दणक्याने पटापट युरोपियनांच्या पदरात पडली. त्यामुळे दिल्लीच्या मोंगलांची ही गुर्मी समुद्रावर जिरविणारे शेरास सवाईशेर कोणीतरी पृथ्वीच्या पाठीवर फिरंगी म्हणून लोक आहेत अशी हिंदुस्थानभर आख्या झाली व तितक्यापुरता मोंगलांच्या इज्जतीस धक्का बसला. मोंगल एक काफर तर फिरंगी सात काफर, असे हिंदुस्थानात लोकमत बनले. फिरंग्यांना जिंकिणे म्हणजे मोठे शतकृत्य करणे, असे हिंदुस्थानातील लोकास वाटू लागले. शहाजीने फिरंग हातात धरली म्हणजे फिरंग्यांचा रंग जातो, अशी जी जयरामाने शहाजीची स्तुती केली आहे त्यातील मतलब असा आहे की, अजिंक्य फिरंग्यांनाही ज्याने जिंकिले तो शहाजी मोंगलांची विशेष तमा बाळगीत नव्हता हे जाहीर व्हावे. ह्या सर्व तपशिलाचे तात्पर्य एवढेच की, हिंदुस्थानातील व विशेषत: ज्यांना पोर्तुगीजांचा निकट शेजार होता त्या महाराष्ट्रातील लोकांच्या मनातून आदिलशहा, निजामशहा व मोंगल या तिघांच्या संबंधाने आदर व इज्जत उतरत्या कळेस लागली. हा युरोपियन संसर्गाचा परिणाम झाला. इज्जत उतरण्याला दुसरीही आणीक कारणे वावरत होती. मोंगल पातशहा वंशाने तुराणी, विद्येने इराणी व धर्माने अरबी होते. मूळचे मध्य आशियातील मोंगल लोक अर्धवट रानटी असून, शेजारास असलेले त्यांच्या देवधर्माहून श्रेष्ठ असे देवधर्म ते स्वीकारीत असत. पूर्वी कित्येक शक ऊर्फ मोंगल लोकांनी वासुदेवभक्ती घेतली होती, कित्येकांनी बौद्धमत अंगीकारिले होते आणि सध्या ते महम्मदाच्या देवधर्माचे अनुयायी बनले होते. हिंदुस्थानात आल्यावर ख्रिस्ती, झरदुष्ट्री व वेदान्ती कल्पनांचा पगडा त्यांच्या मनावर बसून, निर्भेळ इस्लाम मतापासून ते च्युत होत चालले होते. अकबर, जहांगीर, शहाजहान ह्या मोंगल पातशहांनी अनेक हिंदू चाली उचललेल्या होत्या, हे सर्वप्रसिद्ध आहे. इब्राहीम आदिलशाहाला ललित कलांचा इतका काही शोक असे की, त्यापुढे तो इस्लामधर्म तुच्छ मानी, अशी काजीमुल्ला वगैरे धर्माचार्यांना भीती पडली. मोंगल लोकांचे देवधर्म विकार असे शिथिल होत असता, त्यांच्या इराणी विद्यासंस्कारातही बदल होत गेले. फारशी भाषा मोंगल भाषेहून श्रेष्ठ पडल्यामुळे व मध्य आशियातील सर्व दरबारी व्यवहार फारसीत चालत असल्यामुळे, ह्या अर्धरानटी मोंगल लोकांनी इराणची परकीय अशी फारसी भाषा स्वीकारिली व फारसीत लिहिणारे इराणी कारकून व मुत्सद्दी पदरी बाळगिले. ह्या इराण्याहून हिंदू कारकून व मुत्सद्दी वरचढ असत, सबब सर्व व्यवहार आस्ते आस्ते हिंदू कायस्थांच्या हाती गेला. देवधर्म व फारसी विद्या यांची अशी पायमल्ली होत असता मोंगलांची वंशशुद्धीही भेसळ होत गेली. रजपूत वगैरे हिंदू जातींशी शरीरसंबंध होऊन, शुद्ध मोंगलत्व उत्तरोत्तर बिघडत गेले व त्याबरोबर मोंगल स्वभावही अपकृष्ट होत गेला. गनिमी काव्याने लढण्यात मूळ मोंगलांची व तुराण्यांची मोठी ख्याती. पण हिंदुस्थानात ती कीर्ति त्यांनी गमाविली. मराठ्यांच्या गनिमी पेचापुढे व हुलकावण्यापुढे, हिंदुस्थानात सुखावलेले मोंगल कच खाऊ लागले. असा चोहोकडून युरोपात, समुद्रात, हिंदुस्थानात, धर्मात, विद्येत व वंशात -हास होत गेल्यामुळे, शहाजी व शिवाजी ह्या मराठ्यांना चिरडून टाकण्याचे सामर्थ्य दक्षिणेतील किंवा उत्तरेतील मुसलमानात राहिले नाही. शहाजीने मुसलमानांची ही व्यंगे ओळखून, तदनुसार आपली कारवाई चालविली व तीत त्याला यावे तसे यश आले. मुसलमान पातशाह्या दिसण्यात खूप टब्बू दिसत, परंतु आतून रोगांनी पोखरल्या गेल्या होत्या, हे शहाजीस ओळखता आले, ह्यातच शहाजीचे मोठेपण दिसून येते. दिल्लीन्द्र म्हणजे केवळ अजिंक्य, ही जी तत्कालीन सामान्य समजूत, तीत तथ्यांश कितपत आहे, हे शहाजीने व शिवाजीने व त्यांच्या ब्राह्मण मुत्सद्यांनी उत्तमोत्तम जोखिले होते.