Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

४९. ह्या थोर पुरुषाचे एकंदर साद्यंत राजकीय चरित्र थोडक्यात हे असे आहे. त्यावरून शहाजीचे मुख्य धोरण काय होते व इतिकर्तव्यात कोणती होती ते स्पष्ट होते. जयराम म्हणतो त्याप्रमाणे स्वराज्य स्थापून स्वधर्म व स्वदेश व स्वभाषा व स्वजन यांचे पालन, लालन व संरक्षण करावे, ह्यात तो आपल्या जीविताचे साफल्य मानी. आजपर्यंत अशी समजूत होती की, स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषादी संरक्षण करण्याच्या कल्पनेचा प्रथमोदय शिवकाली झाला. आजपर्यंत अशी समजूत होती की, पातशाही नोकरी व चाकरी करून भाकरी मिळविण्यापलीकडे शहाजीची उडी गेली नव्हती. आजपर्यंत अशी समजूत होती की, संस्कृतप्राकृत भाषांना प्रथमाश्रय शिवाजीने दिला. आजपर्यंत अशीही समजूत होती की, मराठे लोकांच्या अंगी माणुसकी प्रथम शिवाजीने आणिली. परंतु ह्या कल्पना जयरामाच्या प्रत्यक्ष साक्षीपुढे व वरील कालानुक्रमिक राजकीय चरित्रापुढे ह्यापुढे टिकणे शक्य नाही. स्वराज्यस्थापनेच्या कल्पना शहाजीच्या वेळीच अत्यंत अंधुकपणे व अल्पांशाने का होईना पण उदय पावत होत्या. शहाजीचा प्रकटपणे स्वतंत्र स्वराज्य स्थापण्याचा पहिला उद्योग शक १५५१ त लोदीच्या बंडाच्या वेळी झाला. परंतु, शहाजहानच्या व आदिलशहाच्या जोड प्रतिरोधापुढे तो उद्योग फार काळ टिकला नाही. नंतर स्वराज्यस्थापनेचा दुसरा उद्योग शक १५५५ त निजामशाही पुनरुज्जीवित करून तिची पेशवाई करता करता व विशेष वैपरीत्य भासू न देता राजकीय प्रसंगांच्या सहज ओघात राज्यासन स्वत: आक्रमिण्याचा होता. तोही शहाजहानच्या प्रबळ विरोधामुळे व महमदशहाच्या नरमपणामुळे साधला नाही. नाही तर, त्याचवेळी प्रछन्न स्वराज्यस्थापनेचा योग बहुतेक जुळून आला होता. राज्यस्थापनेचा हा दुसरा प्रछन्न बार हुकल्यावर शहाजीने पुन: दहा वर्षे खटपट व जुळवाजुळव करून स्वराज्याची कर्नाटकात पुन: तिस-यांदा रचना केली व ती त्यावेळी साधली. कारण त्या कामी शहाजहानासारख्या प्रबळ शत्रूचा प्रतिबंधही नव्हता आणि शिवाजी आणि संभाजी यांच्या शस्त्रप्रहाराने आदिलशहा हतप्रभही झाला होता. परंतु ह्या कर्नाटकातल्या स्वराज्यात व भीमगडच्या स्वराज्यात महदंतर होते. कर्नाटकातले शहाजीचे स्वराज्य म्हणजे परक्या कानडी लोकांवरचे परक्या मराठ्यांचे राज्य आणि भीमगडचे स्वराज्य म्हणजे मराठे लोकांवरचे म्हणजे स्वजनांवरचे मराठ्यांचे राज्य. असे हे कर्नाटकातल्या स्वराज्यात व्यंग होते. परंतु परिस्थितीपुढे त्याला काही उपाय नव्हता.