Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[२०५] ।। श्री ।। १९ जून १७६०.
पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः-
विनंति उपरि. सुज्याअतदौला यांणी नजीबखान यास साफ जाब दिल्हा कीं आह्मी मराठियांकडे आहों, तुह्मी अबदालीस बिदा करणें. त्याजवरून ते फारच खट्टे होऊन निरोप घेऊन गेले. त्यास, आह्मी जवळ आलो; सुज्याअतदौलाचा जाब तसा जाहाला; आतां, नजीबखान याचे वस्तू कांहीं तिकडे२८४ राहावत नाही. तुह्मी इटावियास येऊन त्याचे फौजेस धुडावावें. आपलीं ठाणीं जीं गेलीं असतील तीं कायम करणें. सुज्याअतदौलाहि तुमचे कुमकेस फौज पाठवितील. त्यास लेहून पाठवणें. ते बोलत होते की गोविंदपंत इटावियास असते तरी नजीबखान कांहीं त्याजवर न जाता. परंतु हेच गेले असते तरी आह्मी फौज पाठवितों. असें भाषण केलें. असो. त्याजवर काय आहे ? तुर्त तुह्मीं त्याचे लोक उठवून आपला अंमल करावा. यास गुंता पडणार नाहीं. सारे एक होऊन करणें. जाणिजे. + गोपाळराव, गणेश संभाजी, तुह्मीं, अकबरपूरकर, सर्व जमा होऊन आपली जागा कायम करणें. शिंद्याकडून भिकारीदास सुजादौला ह्याकडे आहे. त्याचेंच पत्र आलें कीं नजीबखानास निरोप देऊन गंगापार आहेत. तुह्मांसहि वर्तमान कळलेंच असेल. मुकासदाराचें तेहि साहित्य करितील. तुह्मीं जमा होऊन अंमल आपला करणें. नजीबखान, जहानखान अबदालीकडेच जातील. हाफिजाचे बोलीवर अबदाली नजीबखानास टाकून जाईल. न गेला तर सरदार, आह्मी, जाट एक होऊन यमुना उतरून पारपत्य करूं. कोणे चिंता न करणें. सलाबत२८५ दुरून भारी असते. येथें सर्व कळलें. लौकरच उत्तम होऊन येईल. र॥ छ ५ जिलकाद. ऐवज जरूर खर्चास अठापंधरा रोजांत येईसा करणें. हे विनंति.