Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

भाऊच्या भीतीमुळें अंतर्वेदींत राहणें तर त्याला अत्यंत धोक्याचें होतें. तेव्हां बागपताजवळ मोठ्या कष्टानें अबदाली यमुना उतरला व मोठ्या सावधगिरीनें पानिपताचा त्यानें रोख धरिला. ह्यावेळीं अबदाली सदाशिवरावाच्या कचाटींत चांगला सांपडला होता. तोंडावर सदाशिवरावभाऊचीं सर्वप्रकारें सज्ज झालेली फौज पानिपतास उभी होती व पाठीमागें दिल्लीस नारो शंकर सहा सात हजार लोकांनिशी अबदालीला पायबंद देण्यास तयार होता. यमुनेच्या उजव्या तीराला अबदालीला मराठ्यांनी ह्याप्रमाणें अगदी वतंग करून टाकिलें होतें. एक बाजू मात्र अबदलीला मोकळी राहिली होती. ती बाजू यमुनेच्या पलीकडील नजीबखानाच्या ताब्यांतील अंतर्वेद व रोहिलखंड हे प्रांत होत. ह्या प्रांतांतून अबदालीला पायबंद देण्याचें काम सदाशिवरावभाऊनें गोविंदपंताकडे सोपविलें होतें. त्यानें ते काम कसें बजावलें तें पाहूं.

अबदाली बागपतास यमुना उतरेपर्यंत म्हणजे २५ अक्टोबरपर्यंत यवनांचें सैन्य दिल्लीसमोर शिकंद-यापासून मिरतापर्यंत पसरलें होतें. त्यांना दाणागल्ला वगैरे रसद भोंवतालच्या प्रांतांतून व रोहिलखंडांतून मिळत असे ती लागभाग पाहून मारण्याचें काम गोविंदपंताचें होते. तसेंच नजीबखान व सुजाउद्दौला ह्यांच्या प्रांतांतील ठाणीं घेण्याचें व तेथें दंगा माजवून ह्या दोघां यवनसरदारांचीं चित्तें व्यग्र करण्याचें काम गोविंदपंतावर सोपविलेलें होतें. जाटाचे लोक सकुराबादेस बसले होते त्यांना मदतीस घेऊन हीं कामें जरूर करावीं, म्हणजे फार उपयोग आहे म्हणून सदाशिवराव गोविंदपंताला एकसारिखें लिहित होता (लेखांक २४४). ह्यावेळी अबदालीची रसद बंद करणें हें अत्यंत महत्त्वाचें व जरुरीचें काम होतें. गोविंदपंतानें हें काम टाकून निराळेंच एक काम करण्याचा डौल घातला. तालगांव, तिरव, कनोज, खेरनगर, भुजाजंग, खतलाख, मोहना, बरगांव, गुलोली वगैरे विठुराकडील लहान सहान गढ्या घेत बसून अंतर्वेदींतील यवनांच्या सैन्याला शह देण्याच्या जरुरीच्या कामीं गोविंदपंतानें पूर्ण हयगय केली (लेखांक २५८). किरकोळ गढ्या घेत बसून महिन्यांचे महिने व्यर्थ दवडण्यांत व मुख्य कामाला अडथळा आणण्यांत मतलब नाही; ताबडतोब भाऊसाहेबांच्या मदतीला जाऊन अबदालीला शह देण्यांतच खरा पराक्रम आहे; वगैरे सूचना गोविंदपंताला कित्येकांनीं केल्या. परंतु, किरकोळ गढ्या घेतल्याशिवाय अव्वल काम हाती घेतां येत नाहीं ह्या सबबीवर अबदालीला शह देण्याचें गोविंदपंतानें नाकारिलें (लेखांक २५०). त्यामुळें अबदालीच्या सैन्यांत दाणावैरणीची टंचाई मुळींच भासली नाहीं. अबदालीचा मार्ग भाऊनें कुंजपु-यास अडविल्यामुळें अबदालीं अंतर्वेदींत कोंडला गेला होता. फक्त रसद बंद करून त्याला घाबरा करण्याचें तेवढें राहिलें होतें. एवढें काम जरूर करावें म्हणून गोविंदपंताला सदाशिवरावाचा सक्त हुकूम होता. ह्या हुकुमाप्रमाणें गोविंदपंतानें अबदालीच्या पिछाडीस दंगा केला असता म्हणते अबदाली समूळ उडाला असता.