Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

अबदालीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष्य करण्याजोगीच भाऊची ह्यावेळीं स्थिती होती. अबदालीच्यापेक्षां सर्वतोप्रकारें श्रेष्ठ असे सैन्य भाऊजवळ होतें. अबदालीनें कधीं पाहिला नाहीं असा तोफखाना भाऊच्याबरोबर होता. ज्या शिंद्यांना सहा महिन्यापूर्वी अबदालीनें नाडिलें होतें त्यांच्याबद्दल यथेच्छ सूड उगविण्याची भाऊच्या मनांत सोत्कंठ ईर्षा होती. शहाजादा अल्लीगोहर याचाहि कल भाऊकडेच येण्याचा होता. तशात अबदालीच्या सैन्यांत फूटफाट झाली होती व आणीक होण्याचा संभव होता (लेखांक २२४). तेव्हां अशा वेळीं अबदलीला सोडावयाचा नाहीं असा भाऊने निश्चय केला. अबदालीनें मनाप्रमाणें तह केल्यास मात्र त्याला देशीं सुखरूप जाऊ द्यावयाचें; नाहीं तर अंतर्वेदींत कोंडून किंवा आत तडफडून यमुना उतरून अलीकडे आल्यास बाहेरून गांठून त्याला तंबी द्यावयाची असा व्यूह भाऊनें रचिला (लेखांक २५८). हा व्यूह तडीस नेण्यास लागणारीं साधने भाऊजवळ जय्यत तयार होतीं.

भाऊ आगस्टापासून अक्टोबरपर्यंत दिल्लीस होता. हे तीन महिने पावसाळ्याचे असल्यामुळें सैन्यांची हालचाल करणें बरेंच अडचणीचें होतें. तशांत दिल्लीस राहून भाऊला बरींच कामें उरकावयाचीं होतीं. अबदाली, नजीबखान, सुजाउद्दौला ह्यांच्याशीं तहाची बोलणीं भाऊनें येथूनच चालविलीं; अबदालीच्या सैन्यांत फूटफाट करण्याचे राजकारण येथूनच रचिले; व दिल्लीच्या पातशाहीची व्यवस्थाहि येथेंच राहून केलीं. अलमगीर पातशाहाचें सूत्र आंतून अबदालीकडे आहे असें समजून आल्यावरून १७५९ च्या नोव्हेंबरांत गाजुद्दिन वजिरानें त्याला ठार मारिलें व त्याच्या जागीं कामबक्षाचा पुत्र शहाजहान यास पातशहा केले. ह्या शहाजहानाचें राज्य, म्हणींतल्याप्रमाणें, औट घटकेचेच होतें. १७६० च्या जानेवारींत अबदालीनें दिल्ली घेतली त्यावेळीं ह्या राजश्रींचें राज्य संपलें. त्या वेळेपासून सदाशिवरावानें दिल्ली आगस्टांत घेतली, तोंपर्यंत तख्तावर कोणी पातशाहा नव्हता. अलमगिराचा पुत्र अलीगोहर हा भिऊन १७५९ च्या नोव्हेंबरांत जो पट्टण्यास पळून गेला तो इकडे पुन्हा परत येईना. अबदालीने व सदाशिवरावभाऊनें दोघानींहि त्याला बोलावणीं पाठविलीं, परंतु, कोणाकडेहि येण्याची आपली खुषी नाहीं असें त्याने साफ कळविलें. पुढे भाऊनें जेव्हां दिल्ली घेतली त्यावेळी त्यांने मराठ्यांच्या बाजूला येण्याचा कल दाखविला. मराठ्यांचा वकील शिऊभट त्यावेळीं अलीगोहरापाशीं होता (लेखांक २२७). ह्या वकिलाच्या उपदेशानें अलीगोहर मराठ्यांच्या बाजूला आला; परंतु, लढाईचा कायमचा निकाल झाल्यावांचून आपली दिल्लीस येण्याची खुषी नाहीं असें त्यानें कळविलें (लेखांक २१९), व आपला पुत्र जवानबख्त यास भाऊकडे पाठवून दिलें. ह्या जवानबख्ताला सदाशिवरावभाऊने नाना पुरंधरे व आप्पाजी जाधवराव यांच्या हस्तें १० अक्टोबर १७६० रोजीं वलीहद केलें व अलीगोहराला शहाअलम हें नांव देऊन त्याच्या नांवचे गजशिक्के चालविले (लेखांक २५८ व २५९).