Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

सुजाउद्दौल्याला तेव्हांपासून अबदालीच्या सगंतीचा अगदीं वीट आला. आपली आई, सदाशिवरावभाऊ, मल्हारराव होळकर, वगैरे मंडळींनी अबदालीला न मिळण्याविषयीं आपल्याला आग्रहपूर्वक सांगितलें असून आपण त्यांचे ऐकिलें नाहीं हा मूर्खपणा केला व नजीबखानासारख्या मात्रागमनी लुच्चाच्या नादीं लागून फसलों असें त्याचें त्यालाच वाटूं लागलें. ह्याकरितां तोहि सदाशिवरावाशीं सख्याचें बोलणे करूं लागला. ह्याप्रमाणें अबदालीला ह्यावेळीं त्याच्या सर्व साथीदारांनीं सोडून देण्याचा उद्योग आरंभिला. अबदालीनें शहाजादा अल्लीगोहर व मीरजाफरअल्ली, पटण्याचा सुभेदार, ह्यांनाहि आपणाकडे मिळवून घेण्याचा प्रयत्न पूर्वीपासून चालविला होता. परंतु अल्लीगोहरानें त्यांजकडे जाण्याचें अनेक कारणांकरितां नाकारिलें (लेखांक २२७ व २१९). सारांशा, अबदालीची ह्यावेळी अगदीं विपन्न स्थिति झाली होतीं. नजीबखानाच्या नादीं लागून व्यर्थ संकटांत मात्र पडलों असें अबदालीला वाटू लागलें. हिंदुस्थानची पातशाही मिळवून देण्याच्या नजीबखानाच्या गप्पांना भुलून आपण आपला सर्वस्वीं नाश करून घेण्याच्या पंथाला लागलों असें अबदालीच्या प्रत्ययास आलें. खरें पाहिलें असतां अबदालीला हिंदुस्थानच्या कारस्थानांत डवचाडवच करून लभ्यांश लुटीखेरीज कांहींच नव्हता. त्याला हिंदुस्थानांत कायमचें राहावयाचें नव्हतें त्याचें हिताहित हिंदुस्थानांत यत्किंचितहि नसून त्याचें सर्व कांहीं खैबरखिंडीच्या पश्चिमेकडे गुंतले होतें. हिंदुस्थानांत स्वारी करून, दोन चार महिने राहून, मिळेल ती लूट घेऊन विलायतेस निघून जाण्याचा त्याचा परिपाठ असे. ह्या खेपेला नजीबखानाच्या आग्रहाला मान देऊन तो हिंदुस्थानांत राहिला. परंतु त्या राहण्यापासून कांहीं फायदा नाहीं हें त्याला दिवसेंदिवस जास्त अनुभवास येऊं लागलें. त्याचे लोकहि हिंदुस्थानांत दहा महिने राहून कंटाळून गेले होते. कांहींनीं तर अफगाणिस्थानचा रस्ता सुद्धां सुधारला. कांहीं सदाशिवरावाच्या चिठ्ठया घेऊन गोविंदपंताकडे इटाव्याच्या बाजूला मराठ्यांना जाऊन मिळाले (लेखांक २३३, २३७, २४२, २४४). येणेंप्रमाणे स्वकीय व परकीय अशा दोन्हीं लोकांनीं त्याला सोडण्याचा क्रम जेव्हां आरंभिला तेव्हां मराठ्यांशीं स्नेह करून स्वदेशास आपणहि सुरक्षित निघून जावें असा अबदालीनें निश्चय केला (लेखांक २३६ व २४६). स्नेहाचें बोलणें करण्याकरितां भाऊकडे त्यानें वकीलहि पाठविले. परंतु त्याजकडील राजकारणाचा आपल्या मनाप्रमाणें बनाव बसण्याला बराच अवधि लागेल हें पाहून भाऊनें त्याच्या वकिलांच्या बोलण्याकडे विशेषसें लक्ष दिलें नाहीं (लेखांक २३७).