Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

सुजाउद्दौला, मलकाजमानी, अलीगोहर व मीरजाफरखान ह्यांच्यांशी राजकारण करून ह्यांना मराठ्यांच्या बाजूला आणण्याचा प्रयत्न करा म्हणून गोविंदपंताला मागें सदाशिवरावभाऊनें सांगितलेंच होतें. तेव्हां आंत व्यवस्था ठेवून बाहेर राजकारणे करण्याचें दुहेरीं काम गोविंदपंतावर येऊन पडलें. तीं दोन्हीं कामें त्यानें अर्धीमुर्धी केलीं. रतनसाला मायेंत घेऊन अंतर्वेदींतील अंमल गोविंदपतानें आठ पंधरा दिवस कसा तरी राखला (लेखांक १८७). अलीगोहराला पातशहा करावयाचा व त्याची बजिरी सुजाउद्दौल्याला द्यावयाचीं असें वचन दिल्यास सुजा मराठ्यांना मिळण्यास तयार आहे म्हणून गोविंदपंतानें सदाशिवरावभाऊस लिहिलें. तेव्हा शामजी रंगनाथ यास भाऊनें सुजाकडें वकिलीस पाठवून दिलें (लेखांक १८९) व आपण मालन, पाहारीवरून ग्वालेरीकडे कुच केलें. सदाशिवराव ग्वालेरीस ३० मेला आला (लेखांक १९४). ती सरदारांच्या म्हणजे शिंदेहोळकरांच्या सांगण्यावरूनच आला (लेखांक १८०, १८७ व टीप २७०). सरदारानींहि लक्ष्मीनारायणाच्या हस्तें सुजाउद्दौल्याकडे बोलणें लाविलेंच होतें, ह्याच सुमाराला नजीबखान व जहानखान यांणीं इटाव्यास वेढा घातला (लेखांक १९४) व अंतर्वेदींतील ठाणेदार दूरच्या अवाईनेंच आपलीं ठाणीं सोडून पळून जाऊ लागले. तेव्हां गोविंदपंतानें सदाशिवरावाला इटाव्याकडे काहीं सैन्य पाठवून देण्यास विनंति केली. सदाशिवरावानें गोविंदपंताला असें लिहून कळविलें कीं केवळ दूरची अवाई ऐकून तुमचे ठाणेदार ठाणीं टाकून पळतात ही शरमेची गोष्ट आहे; अशा पळपुट्या ठाणेदारांचें उत्तम प्रकारे पारपत्य करून ते अब्रनें दम धरून झुंजतील अशी व्यवस्था तुम्हीं अवश्य करावी; म्हणजे दुस-या ठाणेदारांस वचक बसून ते झुंझून मरतील परंतु पळणार नाहींत (लेखांक १९५). अशी ताकीद करून २ जूनला भाऊ ग्वालेरहून निघाला तो ४ जूनला ढवळपुरच्या खालीं पांच चार कोंस चमेल नदीवर आला (लेखांक१९६); ८ जूनला चमेलीच्या उत्तर तीराला गेला व ११ जूनला वोडशियास जाऊन पोहोचला (लेखांक २०२). आग्र्याला ताबडतोब जाऊन लागण्याचा भाऊचा विचार होता, परंतु गंभीरनदीस पाणी फार आल्यामुळें दहापंधरा दिवस त्याला मध्येंच कुचंबावें लागलें. जूनच्या शेवटीं त्यानें गंभीर नदी ओलांडिली व ६ जुलैला त्याची व शिंदे-होळकराची भेट झाली. ह्या भेटींत पुढें काय करावयाचें ह्याचा भाऊंनीं व सरदारांनीं विचार केला त्याचें वर्णन देण्याच्यापूर्वी सुजाउद्दौला, अल्लीगोहर, मीरजाफरअल्ली, नजीबखान, महमदखान बंगष, हाफीज रहिमतखान, वगैरे मंडळी काय करीत होती तें सागितलें पाहिजे पडदुराहून निघतेवेळींच सुजाउद्दौल्याशीं स्नेह करण्यास भाऊनें गोविंदपंतास लिहिले होतें. अबदालीचें व सुजाचें पिढीजाद वाकडे होतें. नजीबखानाचे व सुजाचेहि फारसें चांगले कधींच नव्हतें. १७५९ च्या नोव्हेंबरांत तो नजीबखानाला मिळाला ह्याचें कारण असे होतें की मराठे आपल्यावर स्वारी करणार ही त्याला भीती होती. नाहीं तर नजीबखानाला तो मुळींच मिळाला नसता.