Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

त्यावरून गोविंदपंताला शिंद्यांविषयीं फार कळकळ वाटते. अशी पेशव्यांची समजूत झाली. दत्ताजीला गोविंदपंताचा राग आला होता. गोविंदपंतानें सुजाउद्दौल्याकडून व नजीबखानाकडून लाच खाली होती, दत्ताजीला यश आलें काय किंवा अबदालीला आले काय, गोविंदपंताला त्याची फिकीर नव्हती (लेखांक १४७), वगैरे प्रकरणें पेशव्यांना माहीत नव्हतीं. वृद्ध गोविंदपंत, दत्ताजीला व जनकोजीला साहाय्य करून आपण हिंदुस्थानांत येईतोपर्यंत आपली बाजू सांभाळीत आहे अशी पेशव्यांची समजूत होती. ह्याच समजुतींवर भिस्त ठेवून बाळाजी बाजीरावानें व रघुनाथरावानें उदगीरच्या मोहिमेतून गोविंदपंताला स्नेहाची व आश्वासनाची पत्रे पाठविलीं. ह्याच समजुतीवर भिस्त ठेवून सदाशिवरावभाऊनेंहि पडदूर वगैरे ठिकाणांहून वर लिहिलेल्या कामगि-या करण्यास गोविंदपंताला लिहिले त्या त्यानें कशा बजाविल्या तें पुढें दिसून येईल.

१७६० च्या २८ एप्रिलास सदाशिवराव सीहोरास आला (लेखांक १७४). तेथून त्यानें माधोसिंग, बिजेसिंग, कोटेवाले राष्णाजी वगैरे रजपूत संस्थानिकांना येऊन मिळण्याविषयीं पत्रें व वकील पाठविले. हे सर्व संस्थानिक दोन्ही डगरीवर हात ठेवून होते. जिकडे जोर दिसेल तिकडे त्यांचा जाण्याचा विचार होता. सदाशिवराव जवळ आल्याकारणानें मराठ्यांना येऊन मिळण्याचा त्यांनीं रुकार दिला. परंतु, आंतून अबदालीकडे त्यांचा ओढा होता. सीहोरच्या आसपासच्या काहीं दंगेखोर मवासांचे पारपत्य करून मराठे खेचीवाड्यांत अरुण येथे १४ मेला आले. तेथील अहिरांचे बंड मोडून भाऊनें नरवराच्या दिशेनें कुच केलें. ह्यावेळी अबदाली अंतर्वेदींत अनुपशहरी होता. त्यानें जहानखान व नजीबखान ह्यांना मराठ्यांच्या ताब्यांतील अंतर्वेदींतील इटावें शहराकडे दबाव टाकण्याकरितां व सुजाउद्दौल्याशीं स्नेह करण्याकरितां पाठविलें, अंतर्वेदींत ह्यावेळी गोविंदपंताचा पाराशर दादाजी नामेंकरून कोणी पथक्या होता. त्याच्या सैन्याचें व यवनाच्या सैन्याचें युद्ध झाले, त्याची सर्व फौज उठोन गेली (लेखांक १८१) व सकुराबादचें ठाणें यवनाच्या हाती पडले (लेखांक २०९). ह्याच सुमाराला बक्षी व सुमेरसाचा पुत्र रतनसा ह्यानीं बुंदेलखंडांत बंड केलें (लेखांक १८४). काशीतहि कोंकणस्थ व क-हाडे यांचें भांडण लागलें (लेखांक १८५). गोविंदपंताच्या ताब्यांतील जे बुंदेलखंड, अंतर्वेद व कडाकुरा प्रांत त्यांच्यांत कांहीं ठिकाणीं हीं अशीं बंडें अधून मधून होत होतीं. ही बंडें मोडून जेणेंकरून सरकारकिफायत होईल तें काम करणें म्हणून शिंदे, होळकर व सदाशिवरावभाऊ ह्यांनीं गोविंदपंताला हुकूम केला.