Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

विवेचन पांचवें.

दुस-या, तिस-या व चवथ्या विवेचनांवरून दिसून येईल कीं मराठ्यांनी १७६१ पर्यंत जीं जीं कृत्ये केलीं त्या सर्वांत एकच धोरण होतें. महाराष्ट्रधर्म वाढविणें हा मुख्य मुद्दा होता. हा मुद्दा अस्पष्ट रीतीनें त्यावेळच्या मुत्सद्यांच्या मनांत होता असा बिलकुल प्रकार नाहीं. महाराष्ट्रधर्माची कल्पना व तत्साधनार्थ योजिलेल्या उपायाचें व्यवस्थित स्वरूप तत्कालीन मुत्सद्यांच्या, विचारी पुरुषांच्या व सेनापतींच्या मनांत स्पष्टपणें आविर्भूत झालेलें दिसतें. हिंदूधर्माची प्रस्थापना, गोब्राह्मणांचा प्रतिपाल, स्वराज्याची स्थापना, मराठ्यांचें एकीकरण व त्यांचे पुढारपण, ही जी महाराष्ट्रधर्माची मुख्य अंगें त्यांचा उचार शिवाजी राजाच्या तरुणपणीं जसा स्पष्टपणें झालेला दिसतो तसाच खर्ड्याच्या लढाईनंतर नाना फडणिसानें निजामाशीं केलेल्या तहांतहि दिसून येतो. ह्या तहांत धर्म, गोब्राह्मण व स्वराज्य ह्यांच्या संरक्षणार्थ कलमें आहेत. तेव्हां १६४६ पासून १७९६ पर्यंत महाराष्ट्रधर्माची प्रसृति होत असतां मराठ्यांचें पुढारपण वेळोवेळीं निरनिराळ्या जातींनीं घेतलें. प्रथम स्वराज्याची शुद्ध कल्पना उत्पन्न झाली. तत्साधनार्थ मराठ्यांचें पुढारपण शिवाजी, राजाराम, शाहू व अनुषंगानें बाळाजी विश्वनाथ ह्यानीं घेतलें. ह्या चार पुरुषांच्या प्रयत्नानें ज्याला स्वराज्य म्हणून प्रथम संज्ञा दिली गेली तो सर्व प्रदेश मराठ्यांच्या ताब्यांत आला. स्वराज्याचें साधन केल्यावर मराठ्यांच्या वाढत्या पराक्रमाला स्वराज्यांतर्गत प्रदेश संकुचित भासूं लागला व तो उफाड्यानें स्वराज्याच्या मर्यादेच्या बाहेर पसरूं लागला. म्हणजे सार्वभौमत्वाची कल्पना त्यावेळीं अवश्य होऊन तिचा स्पष्ट उच्चार बाजीरावानें शाहूपुढें करून दाखविला. ह्या कालापासून हिंदुपदबादशाहीची प्रस्तावना झाली. हिंदुपदबातशाहाची प्रस्तावना बाजीरावाच्या पुढारपणाखालीं झाली हें जरी खरें आहे, तरी ती शाहूराजाच्या सल्ल्यानें झाली म्हणून तिला मी हिंदुपदबातशाही हें नाव दिलें आहे. शाहूराजा वारल्यानंतर किंवा वारण्याच्यापूर्वी देखील सातारच्या छत्रपतींचें तेज मावळत जाऊन महाराष्ट्राचें पुढारपण पेशव्यांच्या हातांत आलें. म्हणून बाळाजी बाजीरावाच्या उत्तरार्धापासून ब्राह्मणपदबादशाहीचा प्रारंभ झाला म्हणून मी म्हटलें आहे. ब्राह्मणपदबादशाही म्हणजे हिंदुपदबादशाहीच होय. १७५० पर्यंत ह्या बादशाहीची प्रस्तावना भोसल्यांच्या कुळाच्या नांवानें होत असे. आतां ती पेशव्यांच्या कुळाच्या नांवानें होऊं लागली. पहिलीस भोंसलेकुलबादशाही अथवा मराठपदबादशाही व दुसरीस भट्कुलबादशाही किंवा ब्राह्मणपदबादशाही म्हटल्यास चालेल. नांव पाहिजेल तें द्या. वस्तुस्थिति ध्यानांत आली म्हणजे झालें.