Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
महाराष्ट्रधर्म व महाराष्ट्रराज्य जिकडे तिकडे करण्याचा प्रयत्न ह्या कालीं मराठ्यांचा चालला होता. प्रसंगोपात्त ह्या प्रयत्नाचा पुढाकार कधीं महाराष्ट्रांतील मराठ्यांनीं व कधीं महाराष्ट्रांतील ब्राह्मणांनीं केला. हेतु पाहिला तर दोघांचाहि एकच होता. महाराष्ट्रांतील मराठ्यांनीं व ब्राह्मणांनीं दोघांनीं मिळून महाराष्ट्रधर्माचा व राज्याचा प्रसार करण्याचें काम चालविलें होतें. ह्या कामीं येणा-या यशापयशाचा वांटा ह्या दोघांनाहि सारखा घ्यावा लागे. इ. स. १६४६ पासून १६८० पर्यंत शिवाजीच्या पुढाराखाली मराठ्यांस उत्तरोत्तर यशच येत गेलें. १६८९ पासून १७०७ पर्यंत मराठ्यांना अवरंगजेबाशीं लढावें लागलें. शिवाजीच्या वेळीं आलेल्या संपत्ती व त्याच्या पश्चात् आलेल्या विपत्तीचे वांटेकरी ब्राह्मण व मराठे हे दोघेहि झाले. त्या मरणप्राय संकटांतून निघून मराठ्यांनीं पेशव्यांच्या पुढारपणाखालीं समुद्रवलयांकित पृथ्वीचें सार्वभौमत्व मिळविण्याचा सुमुहूर्त १७६० च्या सुमारास आणिला. परंतु १७६१ सालीं अबदालीशीं युद्ध होऊन मराठ्यांचा कधीहि झाला नव्हता असा पराभव पानिपत येथें झाला. ह्याहि गंडांतरांतून निभावून थोडक्याच कालांत त्यांनीं आपली पूर्वीची सत्ता बहुतेक कायम केली; परंतु पूर्वीची भट्टी जी ह्यावेळीं बिघडली ती पुनः कधी नीट सावरतां आली नाही. १७६० त सर्व हिंदुस्थानाला म्हणजे उत्तरेस मुलतान, लाहोर, ठठ्ठा, भकर, रोहिलखंड, अंतर्वेद, काशी, प्रयाग, अयोध्या व बंगाला; दक्षिणेस श्रीरंगपट्टण, तंजावर व रामेश्वर आणि पूर्वेस तैलंगण व पूर्वसमुद्र इतक्या प्रदेशांवर मराठ्यांची सत्ता कायम करावयाची असा सदाशिवरावभाऊचा व बाळाजी बाजीरावाचा बेत होता. परंतु १७६१ नंतर पश्चिमोत्तरेकडील मुलतान, लाहोर, ठठ्ठा, भकर व पूर्वोत्तरेकडील प्रयाग, अयोध्या व बंगाला; दक्षिणेकडील श्रीरंगपट्टण व रामेश्वर व पूर्वेकडील तैलंगण व पूर्वसमुद्र, हे प्रांत मराठ्यांच्या ताब्यांत पुढें कधींच आले नाहींत. १७६० पर्यंत मराठ्यांचें पाऊल एकसारिखें पुढें पडत चाललें होतें तें १७६१ पासून यमुना व तुंगभद्रा ह्या दोन नद्यांच्या आत आलें. हें जें आंत पाऊल आलें हीच पानिपत येथील पराभव केवढा भयंकर होता ह्याची उतम साक्ष आहे. प्रस्तुतच्या विवेचनांत ह्या पराभवाचा विचार करावयाचा आहे. पानिपत येथील पराभवाचीं अनेकांनीं अनेक कारणें कल्पिलीं आहेत; त्यापैकीं मुख्य मुख्य कारणांचा येथें निर्देश करितों व त्यांपैकीं खरीं कारणें कोणतीं ह्याचा उलगडा ह्या ग्रंथांत व इतरत्र छापिलेल्या पत्रांच्या साहाय्यानें होईल तितका करून दाखवितों.
(१) पेशव्यांनीं छत्रपतींची सत्ता संपुष्टांत आणिल्यामुळें स्वामिद्रोहाच्या पापानें पेशव्यांचा क्षय झाला.
(२) छत्रपतींची सत्ता संपुष्टांत आणिल्यामुळें मराठा व ब्राह्मण सरदारांचीं मनें पेशव्यांविषयीं कलुषित झालीं.
(३) मराठ्यांच्या राज्यव्यवस्थेंत सत्तेचें केंद्रीभवन झालेलें नव्हतें, त्यामुळें निरनिराळ्या सरदारांना आपापली सत्ता स्वतंत्रपणें स्थापण्याची दुरिच्छा झाली.