Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

महाराष्ट्रांत अव्वल प्रतीचें घराणें म्हटलें म्हणजे सातारच्या छत्रपतीचें. त्यांचें महत्त्व कमी करण्यास बाळाजीनें वर सांगितलेल्या खटपटी केल्या. येणेंप्रमाणें बाहेर मेहनत करून बाळाजीनें १७६० त बहुतेक हिंदुस्थान व बहुतेक सर्व दक्षिण जिंकून टाकिली व आंत मेहनत करून सातारचे छत्रपती व त्यांचें राजमंडळ ह्यांस बहुतेक संपुष्टांत आणून आपलें वर्चस्व सर्वत्र स्थापित केलें व ब्राह्मणपदबादशाहीची कल्पना खरी करून दाखविण्याचा प्रसंग जवळ आणून ठेविला. पानपतच्या लढाईंत पेशव्यांस यश येतें तर त्या यशाच्या दरा-याच्या जोरावर सर्व भरतखंड महाराष्ट्रमय त्यानें करून टाकिलें असतें व बाळाजी विश्वनाथाचा वंश ब्राह्मणपदबादशाहीचा आधारस्तंभ झाला असता. तसेंच पानिपतच्या लढाईंत पेशव्यांस यश येतें तर ह्या दुर्बल छत्रपतींचा मागमूसही न रहातां, असा तर्क करण्यास जागा आहे. कारण पेशव्यांचे महत्त्व १७५० पासून १७६१ पर्यंत जसजसें वाढत चाललें तसतसें छत्रपतींचें कमी कमी होत चाललें हें विवेचनावरून दिसून येण्यासारिखें आहे. अर्थात् पेशव्यांचें महत्त्व १७६१ त झेनिथाला जाऊन पोंचलें असतें तर छत्रपतींचें महत्त्व नाडिराला जाऊन बुडलें असतें ह्यांत संशय नाहीं. सातारच्या छत्रपतींना पुढें पुंढे कोणी अगदीं विचारीत नाहींसें झालें ह्याचा दाखला पाहिजे असल्यास नाना फडणिसाच्या आत्मचरित्रांत उत्तम पहावयास मिळतो. आम्ही पेशव्यांचे सेवक, आम्हास छत्रपतींशीं कर्तव्य नाहीं असें नाना फडणवीस लिहितो. ह्यावरून छत्रपतीविषयीं इतरांच्या मनांत किती आदरबुद्धि होती ह्याचें अनुमान करितां येईल. परंतु मराठ्यांच्या दुर्दैवानें तो सुयोग जुळून आला नाहीं. सामान्य नीतीच्या दृष्टीनें पहातां ह्या दुर्बल छत्रपतींचें महत्त्व बाळाजीनें संपुष्टांत आणिलें हें बरेंच गर्हणीय आहे. परंतु बुद्धीनें व शक्तीनें बलिष्ट अशा पुरुषाच्या किंवा पुरुषांच्या हातांत कोणत्याहि राष्ट्राचीं सूत्रें असणें मोठें हितकर असतें ह्या राजनीतीच्या धोरणानें बाळाजीच्या प्रयत्नांचा विचार केल्यास झालें तें योग्यच झालें असें म्हणणें प्राप्त होतें. इतकेंच कीं, जें झालें तें पानिपत येथील घोर संकटामुळें झालें नाहीं. एवढेंच नव्हें; तर जें झालें तें अंशतः न झाल्यासारिखेंच झालें. हें पाहून मन किंचित् उद्विग्न होतें. उद्विग्न होण्याचें कारण असें आहे कीं, ही पानिपत येथील विपत्ति पर्यायानें व परंपरेनें मराठ्यांच्या राष्ट्राच्या नाशास कारण झाली. ती कशी झाली व तिचीं कारणें प्रस्तुत ग्रंथांत छापिलेल्या पत्रांच्या आधारानें काय होतीं त्याचा पुढील विवेचनांत सविस्तर प्रपंच केला आहे.