Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १८० ] श्री. ५ ऑक्टोबर १७४८.
पुरवणी राजश्री पंत स्वामीचे सेवेसीः-
विनंति उपरि. स्वामीनें गतवर्षी अनंतभट व बाळंभट रुईकर यांजपासून मोहरा १९।। व रु. १७ देविले. त्यास, जमान नीळकंठभट रुईकर आहे ऐसियास, मुदती श्रावणांतील केली ते येऊन गेली त्याजवर आह्मीं भाद्रपद्रमासीं रोख सटू वसुलास अनंतभटाकडे पाठिवला. तेव्हां गांवास आला नव्हता. ह्मणोन रिकामाच फिरोन आला. याजवरी कालीं आह्मीं अवरंगाबादेहून येतेसमयीं स्वामींचीं पत्रें व आपलीं पत्रें व खताची नक्कल ऐदी देऊन सेख सटूस छ १ सफरीं त्रिंबकास अनंत भटाकडे पाठविला. याणें जाऊन पत्रें दिधलीं अनंतभट व बाळभट भेटला. त्यास पत्रें देऊन पैकियाचें मागणें लाविलें तेव्हां त्याणें जाऊन शहरचे फौजदारापाशीं फिर्याद केली. आणि त्यास अंतस्थ लाच रुपये ४० देऊन त्यांच्या प्यादियापासोन धरून सेख सटूस खोडियांत अवग्र आठ दिवस घालविले तेव्हां आह्मीं उमरखानाचें पत्र पाठवून सोडवून आणविला ऐसे भट लोक होऊन त्रिंबकांतील वास जाहले आहेत !!! याउपर रुपये त्याजपासून येत नाहीत. त्याचे जमान नीलकंठभट तेथें स्वामीपाशीं आहेत त्यास तेथेंच जमान घेऊन त्यासी नसिहत करून पाठवावया आज्ञा करावी ह्मणजे अनतभटाबाबती रुपये नीलकठभटापासून वसूल घेऊन याउपर स्वामीने या रुईकराचा इतबार सहसा धरिला न पाहिजे. स्वामीपाशीं येऊन गरिबी दाखविताती परंतु हे लोक ऐसे मवाशीनें वर्तणूक करिताती तर नीलकंठभटाची बळकटी करून पाठविला पाहिजे सेवेशी श्रुत होय. याउपर रुईकराचा इतबार केला स्वामीनें याचा विश्वास न धरावा हे लोक भले मनुष्य नव्हेत अपहार करावयाचे लोक आहेत तर यांजपासून द्रव्य हातास ये ऐसी योजना केली पाहिजे. सेवेसी सूचना मात्र लिहिली असे श्रुत होय.