Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

कित्येक शब्दाची व्युत्पत्ती.
व-हाड, म-हाड, क-हाड.

मराठा शब्द महाराष्ट्र शब्दाचा अपभ्रंश कित्येक समजतात. कित्येक महारट्ट शब्दाचा हा अपभ्रंश असावाअसें ह्मणतात. आणि कित्येक मरहट्ट असें ह्या शब्दाचें मूळस्वरूप असावें असें प्रतिपादितात. पैकीं दुसरीव्युत्पत्ति विद्वानांना मान्य आहे, असें दिसतें. डा. भांडारकरांनीं आपल्या दख्खनच्या इतिहासांत हीच व्युत्पत्ति मानिली आहे. शकांच्या, शातवाहनाच्या, व अशोकाच्या वेळीं दक्षिणेंत रट्ट ह्मणून एक लोक होते; त्यांचेच भाऊबंद रडु, रड्डी, वगैरे उत्तर कर्नाटकांतील कांहीं जुने लोक होत; ह्या रट्टापैकीं कित्येक कुळी महापराक्रमी निघाल्या व त्यांनीं आपल्याला महारट्ट असें बहुमानार्थी। नांव घेतलें; वगैरे अनुमानें काढिलेलीं प्रसिद्ध आहेत. कार्लें येथील शिलालेखांत महारथी व महारथिनी असे शब्द आलेले आहेत. ते दोन वर्षांपूर्वीच्या मराठ्यांचे वाचक आहेत, असें बहुतेक सर्व प्राचीन लेखसंशोधकांचें ह्मणणें आहे. परंतु महारथी ह्या संस्कृत शब्दाचें महारट्ट हें प्राकृत रूप कसें झालें हें नीट उलगडून कोणीच दाखविलें नाहीं. रथ शब्दाचें रह व रथी शब्दाचें रही अशीं प्राकृत रूपें होतात; रट्ट व रट्टी अशीं होत नाहींत. महारथी उगाच मजेखातर रूप लिहिलें, असेंहि म्हणणें शोभत नाहीं. कारण, हे शिलालेख कांहीं कोणाला फसविण्याकरितां लिहिलेले नाहींत, त्यावेळीं जें रूप प्रचलित असेल तेंच लिहिलें असेल. अशोकाच्या शिलालेखांत रास्टिक ह्मणून एक नांव येतें तें निराळेंच. येणेंप्रमाणें (१) रास्टिक, (२) महारथी, (३) महारट्ट, (४) मरहट्ट, व (५) महाराष्ट्र, असे एकाच देशांतील लोकांच्या नांवाचें पांच प्रकार पहाण्यांत येतात. ह्यापैकीं खरें नांव कोणतें असेल तें निश्चयानें सांगतां येत नाहीं, मराड, मरट्ट, म-हाटा. मराठा, अशीं ही रूपें अलीकडील सात आठशें वर्षांत प्रचारांत आहेत. मराठा हा शब्द अलीकडील तीनशें वर्षांतील लेखांत दृष्टीस पडतो. त्या पूर्वीच्या तीनशें वर्षांतल्या ज्ञानेश्वरी वगैरे ग्रंथांत म-हाटा असें रूप आढळतें. प्राकृत पिंगलसूत्रांत मरट्ट, महरट्ट अशीं दोन रूपें सांपडतात. व एक दोन ताम्रपटांत मराड असें रूप येतें. सारांश, हा शब्द गेल्या दोन हजार वर्षांत नऊ दहा प्रकारांनी लिहीत आले आहेत. पैकीं खरा शब्द व रूप महरट्ट असावें असें वाटतें. रट्ट हें ह्या देशांतील एका पुरातन कुळीचें नांव आहे; व महरट्ट हे त्याकुळींतील एका पोटभेदाचें नांव आहे. आतां, महरट्ट म्हणजे मोठे रट्ट असा जो कोणी कोणी विद्वान् अर्थ करतात, ह्या अर्थातून निराळा एक अर्थ ह्या शब्दाचा करावा असें पुढील कारणाकरितां मला वाटतें. मराठींत व-हाड व क-हाड असे म-हाड शब्दासारखेच दोन शब्द आहेत. हे दोन्हीं शब्द एकाच देशांतील निरनिराळ्या प्रांतांत रहाणा-या लोकांचे वाचक आहेत. व-हाड शब्द वहरट्ट व क-हाड शब्द कहरट्ट शब्दाचा अपभ्रंश दिसतो. येणें प्रमाणें महरट्ट वहरट्ट व कहरट्ट असे तीन शब्द पुढें येतात. हे तिन्हीं शब्द रट्टांच्या निरनिराळ्या पोटभेदांचे वाचक आहेत हें उघड आहे. आतां, ताम्रपत्रांतून व ग्रंथांतून क-हाड शब्द करहाटक, करहट्ट अशा रूपांनीं आढळतो, हें खरें आहे. परंतु, मरहट्ट, मरहाटक, ह्या शब्दाप्रमाणेंच करहाटक, करहट्ट हीं भ्रष्ट रूपें आहेत असें मानणें रास्त आहे. वरहट्ट व वरहाटक हे शब्द ताम्रपटांत व ग्रंथांत कोठेंही आढळत नाहींत. पण, महरट्ट व कहरट्ट ह्या शब्दांप्रमाणेंच हजार पंधराशे वर्षांपूर्वी वहरट्ट हा शब्द प्रचलित होता असें अनुमान होतें. कदाचित् वहरट्ट ही पोटकुळी राजकीयदृष्ट्या फारशी महत्वाची नसल्यामुळें तिचा नामनिर्देश ताम्रपटें व ग्रंथ ह्यांत नाहीं, इतकेंच. तेव्हां, वहरट्ट, महरट्ट व कहरट्ट असे तीन शब्द व्युत्पत्यर्थ आपल्यापुढें उभे राहतात. ह्या तीन शब्दांतील वह, मह, कह ह्या शकलांचे अर्थ बसवावयाचे आहेत. माझ्या मतें, वह ह्मणजे पलीकडील, मह ह्मणजे मधील व कह ह्मणजे अलीकडील, असे अर्थ घ्यावे. रट्ट कुळीचे एकंदर तीन पोटभेद होते, पलीकडील रट्ट ते वहरट्ट, मधलि, रट्ट ने महरट्ट, व अलीकडील रट्ट ते कहरट्ट. सारांश, हजार बाराशें वर्षांपूर्वी एके काळीं महाराष्ट्राचे व-हाड, म-हाड व क-हाड असे तीन भाग होते व त्यांतील लोकांस व-हाडी, म-हाडी व क-हाडी किंवा व-हाडी, मराठे, वे क-हाडे अशीं नांवें पडली. ह्या तिन्हीं प्रांतांतील तिन्हीं पोटकुळ्या एकच भाषा बोलतात व एकाच कुळींतल्या आहेत. मधील पोटकुळीतील जे महरट्ट किंवा मराठे ते राजकीय चळवळी करणारे असल्यामुळें त्यांच्या नांवानें नागपुरापासून तुंगभद्रेपर्यंत व तैलंगणपासून कोंकणापर्यंत जो विस्तीर्ण मुलुख आहे तो महशूर झाला आहे. भोज, पिटिनिक, अपरांतिक, वगैरे पैठण, नगर, उत्तर कोंकण प्रांतांतील मराठी भाषेसारखीच भाषा बोलणारे लोक राजकीयदृष्ट्या महत्वाचे नसल्यामुळें महरट्टांच्या ह्मणजे मराठ्यांच्या तेजांखालीं लोपून गेले. नाशकापासून वाईपर्येंतचा जो टापू तो महरट्टांचा मूळदेश; वाईपासून कोल्हापुरापर्येंतचा जो प्रांत तो कहरट्टाचा मुलूख; व खानदेशापासून नागपूर प्रांतापर्येंतचा जो देश तो वहट्टांचा प्रांत, असा प्रकार होता. पहिल्यांदा एकटी महरट्ट कुळी राजकीयदृष्ट्या महत्वाची झाली; तिनें पुढें वहरट्ट व कहरट्ट ह्या पोटकुळ्या आत्मसात् केल्या, आणि नंतर वाढत वाढत नागपूर, खानदेश, पैठण, बालेघाट, गुलबुर्गा, कोल्हापूर, बेळगांव, उत्तरकोंकण, दक्षिणकोंकण, गोंवा, कारवार, वगैरे प्रदेश आक्रमिले. हा प्रकार शहाजी व शिवाजी ह्यांच्या पर्यंतच्या पंधराशे वर्षांत झाला. नंतर मराठशाहींत ओडिसा, ग्वालेर, इंदूर, बडोदा, गुत्ती, अर्काट, तंजावर, येथपर्यंत मराठ्यांच्या छावण्या व वसाहती पसरल्या. असा हा मराठ्यांच्या कुळीच्या राजकीय प्रसाराचा वृत्तांत आहे. ही प्रसार होतांना पूर्वी अनेक अडथळे आलेले आहेत व सध्यां तर तो बहुतेक थांबल्यासारखाच आहे. परंतु ह्या कुळीच्या वाढीचा गेल्या दोन हजार वर्षांचा इतिहास पहातां, सर्व आर्यावर्तावर व जवळच्या म्लेंच्छ देशांवर ही कुळी पसरावी असा अंदाज बांधावा लागतो. ही पसरणी होतांना हजारों ठेंचा, लाखों अडचणी व शेंकडों वर्षे लागतील, हें उघड आहे.