Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१६४] श्री. १३ सप्टेंबर १७९५.
विनंति विज्ञापना. चंदा कंचनीच्या घरीं चौकी छ २६ सफर गुरुवारीं बसली. याचें कारण चंदाचें पत्र मोहरेनशीं नाजमन्मुलूक याचे नांवाचे बेदराकडे कोणी घोड्यावर स्वार होऊन जात असतां घोड्याचे खोगरांतून लाखोटा चौकीच्या माणसांनीं धरून नवाबापाशीं आणिला. पत्र वाचून पाहिल्यानंतर हुकूम झाला जे, चंदास धरून आणावें, घरीं चौकीं पाठवणें. त्याप्रमाणें चौकीस पहारे व तारासाहेब गुंफरजंगाचे, पुत्राकडील रिसाल्याचे लोक बसले. चंदा घरीं नव्हती. मीरअल्लम याचे हवेलीस राहिली. तिच्या पोरी व चीजवस्तू जप्त झाली. माणसें धरून आणिलीं. एक दोघांस मारहाण केली. घरावर तोडा झाला. राव रंभा दरबारास आले. ते दोन घटका रात्रपावेतों नवाबाचे हवेलींतच होते. त्यानंतर आपले बि-हाडास गेले. माजमन्मुलूक यांस पत्र लिहिलें तें धरलें. त्यांत मजकूर कीं, तुह्मीं पेशजी जिन्नस पाठविला तो पोहोंचला. याउपर जिन्नस पाठवूं नये. सबब कीं, हल्लीं कोतवाल पहिला तगीर होऊन दुसरा झाला. याअन्वयें मजकूर होता. याची चौकशी, पहिला कोतवाल यास पुरशीस केली. त्याचें ह्मणणें, मला कांहीं ठाऊक नाहीं. चंदाचें ह्मणणें, हे मोहोर माझी नाहीं, खोटी मोहोर. त्यावरून मीरअल्लम यानीं मोहोरेचे सनाचीही चौकशी केली व करितात. चंदाचे घरची मालियत याची मोजदाद झाली. चार लक्ष रुपये पाठविले. अजमास झाला आहे. चौकी आहे तशी आहे. पुढें निर्णय काय ठरेल पहावें. चंदाची बहिणी महताब ईचे घरीं चौकी बसली. ते रदबदल होऊन सुटली. र।। छ २८ सफर. हे विज्ञापना.