Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
शालिवाहन शकांत झालेल्या राजांची माहिती दोघाहि बखरनविसांनीं मोठी विचित्र दिली आहे. हस्तनापूर किंवा दिल्ली ह्या दोन शहरीं राज्य करणा-या सार्वभौम राजांची मालिकाच तेवढी देण्याचा ह्या लेखकांचा संकल्प असल्यामुळें शालिवाहनांच्या पुढें दक्षिणेंत कोणी राजे झाले तें सांगण्याच्या खटपटींत हे लोक पडलेच नाहींत. बाकी पडले असते तर त्यांत त्यांना फारसें यश आलें असतें असें क्वचितच् झालें अंसतें. हस्तनापूर व दिल्ली येथील हिंदुराजांची मालिका पिठोर राजापर्यंत आणून शके ५१२ त यवनांनीं पिठोराचा पराभव केला म्हणून हे बखरकार सांगतात. ह्या सांगण्याचा अर्थ असा होतो कीं, शके ५१२ म्हणजे इ. स. ५९० पर्यंत दिल्ली येथें हिंदूराजांनीं राज्य केलें व त्या वर्षीं पिठोराचा यवनांनीं पराभव केला. पिठोर राजाचा पराभव यवनांनीं १११५ त केला, ही गोष्ट प्रसिद्ध आहे. शालिवाहन शके इ. स. ७८ त सुरू झाला त्याअर्थीं १११५ वर्षांचा हिशोब, खरें पाहिलें तर, ह्या बखरनविसांनीं दिला पाहिजे होता. तसें न करतां ५९० वर्षांचा, व तोहि चुकीचा असा मजकूर ह्या बखरनविसांनीं देऊन बाकीच्या ५२५ वर्षांची माहिती अजीबात गाळून टाकिली आहे. हीं वर्षें त्यांनीं मुद्दाम गाळून टाकिलीं आहेत असें नाहीं. इ. स. ५९० त म्हणजे शके ५१२ त हिंदूंचें राज्य नष्ट झालें अशीं त्यांची बालंबाल खात्रीं झालेली होती असें दिसतें. कां कीं, शके ५१२ पासून शके १६३० पर्यंतच्या म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतच्या कालचा, शहाबुद्दीनापासून औरंगजेबापर्यंतच्या वंशावळी देऊन त्यांनीं, आपल्या मताप्रमाणें, चोख हिशोब देऊन टाकिला आहे. खरें पाहिलें तर, शहाबुद्दिनाच्या काळापासून म्हणजे शके १११५ पासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १६२९ पर्यंत ५१४ वर्षांचा अवधि जातो. ह्या बखरनविसांनीं तर शके ५१२ पासून शके १६३० पर्यंतच्या म्हणजे १११८ वर्षांचा हिशोब दाखवून दिला आहे. तो ६०४ वर्षांनीं खरे अवधीहून जास्त आहे. समकालीन राजे व ह्या अवधींत मुळींच न झालेले राजे, अशांचा वंशावळींत समावेश करून, ही आगंतुक वर्षें बखरनविसांनीं भरून काढिली आहेत. पिठोर राजाचा खरा काळ माहीत नसल्यामुळें, त्याच्या पूर्वींच्या हिंदूराजांच्या यादी उपलब्ध नसल्यामुळें, व त्याच्या नंतरच्या मुसलमान पातशाहांच्या कारकीर्दीचें यथास्थित ज्ञान नसल्यामुळें ह्या बखरनविसांच्या हातून ही गफलत झालेली आहे. युधिष्ठिर शक ३०४४ वर्षें चालल्यानंतर विक्रम शक १३५ वर्षें चालला व त्यानंतर शालिवाहन शक सुरू होऊन ५१२ वर्षांची व्यवस्था ह्या बखरनविसांच्या मतें नीट लागली. शकाच्या ५१२ व्या वर्षी पिठोराचा यवनांनीं पराभव केला व तेव्हांपासून यवनांचा अंमल जो सुरू झाला, तो औरंगझेबाच्या मृत्यूपर्यंत अव्याहत चालला, अशी समाधानकारक खात्री होऊन, आपण चुकत आहोंत अशी ह्या बखरनविसांना शंकाच आली नाहीं व ती येण्याला कांहीं कारणहि नव्हतें. युधिष्ठिरापासून औरंगझेबाच्या मृत्यूपर्यंतच्या कालाची संगतवार व्यवस्था लागलेली दिसत होती, तेव्हां त्यांना शंका आली नाहीं, हें रास्तच झालें. यवनांनीं पिठोर राजाचा पराभव शके १११५ त केला, हें पक्के माहीत असल्यामुळें, आधुनिक इतिहासकाराला मात्र इतके निःशंक राहतां येत नाहीं. बखरनविस चुकले आहेत, हें इतिहासज्ञ पुर्तेपणीं जाणतो व ते कसे चुकले ह्या प्रश्नाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो.
गोविंद खंडेराव चिटणीस, मल्हार रामराव चिटणीस व शिवदिग्विजयाचा कर्ता ह्यांनीं ही चूक युगसंख्येच्या व हस्तनापूरच्या राजांच्या यादींतून जशीच्या तशीच उतरून घेतली आहे. शके ५१२ त साधारणनाम संवत्सर होता, अशी मल्हार रामरावानें जास्त माहिती दिली आहे. शके ५१२ त साधारण संवत्सर नव्हता त्या अर्थीं ही जास्त माहिती चुकीची आहे, हें उघडच आहे. यादीकारांनीं शके ५१२ हा आंकडा कोठून घेतला हें पहाण्यासारखें आहे. यादीकारांनीं हा आंकडा एका रमलशास्त्राच्या पोथीवरून घेतला आहे. रमलशास्त्रांतील वचन येणेंप्रमाणें बखरनविसांनीं दिलें आहेः-