Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

येथून पुढें शिवाजीच्या चवथ्या आणि शेवटच्या भागास सुरुवात झाली. नुकताच राज्याभिषेक झाला असल्यानें चोंहीकडे आनंदीआनंद दिसत होता. नवीन स्थापिलेल्या बलिष्ठ हिंदुपदपादशाहीच्या सन्मानार्थ सह्याद्रि पर्वतावरील व समुद्रावरील प्रत्येक किल्यांतून तोफांची सलामी झडत होती. या भागांत शिवाजीस बरीच शांतता मिळाली. विजापुरचें आणि गोवळकोंडचे राज्य घेण्याच्या प्रयत्नास मोंगल सरकार लागले असल्यानें, त्यांनीं शिवाजीस फारसा त्रास दिला नाहीं. गोवळकोंड्यावर मोंगल सेनापतीनें स्वारी केली, पण हंबीरराव मोहिते यांची कुमक वेळेस येऊन मिळाल्यामुळें त्यास माघार खावी लागली. शिवाजीच्या आश्रयामुळें कांहीं काळपर्यंत गोवळकोंडच्या राजाचा बचाव झाला. शिवानीनें कर्नाटकावर स्वारी केली तेव्हा गोवळकोंडच्या राजानें शिवाजीच्या मदतीस आपली फौज पाठविली होती. या स्वारींत शिवाजी अगदीं तंजावरपर्यंत गेला होता. जातां जातां वाटेंत त्यानें वेलोर घेतलें, जिंजी किल्याची डागडुजी केली व म्हैसुरांतून जाणा-या रस्त्यावर फौजेचीं ठाणीं बसविलीं. मोंगलांनीं विजापुरावर सारखी शिस्त धरली. खुद्द विजापूर शहरास वेढा दिला. विजापूरचे आदिलशाही राजे व त्यांचे प्रधान अगदीं गांगरून गेले. त्यांस तरणोपाय कांहीं सुचेना. तेव्हां त्यांनी शिवाजीची मदत मागितली. शिवाजीनें पूर्वीचा वैरभाव विसरून आपली फौज विजापूरच्या साहाय्यास पाठविली. शिवाजीच्या सैन्यानें सुरतेपासून बहाणपुरापर्यंत मोंगलाचा प्रदेश उनाड करून मोंगल फौजेवर पिछाडीनें व दोहोंबाजूंनीं हल्ला केला. अशा रीतीनें कैचींत सांपडल्यामुळें, मोंगल सरदारास विजापूरचा वेढा उठवून औरंगाबादेस परत जाणें भाग पडलें. याच काय त्या या भागांतील मुख्य मुख्य स्वाच्या आणि मोहिमा होत. या भागांत थोडीशी विश्रांति मिळाल्यामुळें शिवाजीस राज्यव्यवस्थेंत मन घालण्यास बराच अवकाश मिळाला. या अवधींत त्यानें ज्या सुधारणा अमलांत आणिल्या व राज्यपद्धति सुरू केली, त्यामुळेंच या भागास विशेष महत्व आलें आहे. कोणकोणत्या सुधारणा शिवाजीनें अमलांत आणिल्या त्यांचें सविस्तर वर्णन पुढच्या प्रकरणांत येईल. येथें एवढें सांगणें जरूर आहे कीं, जो शिवाजी आपल्या कारकीर्दीच्या पहिल्या भागाच्या शेवटीं चाकणपासून नीरेपर्येंतच्या लहानशा प्रदेशाचा मालक होता, तोच शिवाजी त्याच्या निधनसमयीं तापी नदीच्या दक्षिणेकडील प्रदेशांत अति बलाढ्य राजा होऊन राहिला होता. तापीपासून कावेरीपर्यंतचे सर्व हिंदु मुसलमान राजे त्याची सार्वभौम सत्ता कबूल करून त्याचे अंकित होऊन राहिले होते.