Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
येथपर्यंत डोंगरी किल्ले व त्यांच्या आसपासचा प्रांत याची व्यवस्था झाली. आतां राज्यांतील सपाट प्रदेशाची व्यवस्था कशी होती ती पाहूं. हल्ली ब्रिटिश राज्यव्यवस्थेंत जी तालुक्याची पद्धति आहे त्याच प्रमाणें त्यावेळीं सपाट प्रदेशाचे महाल व प्रांत केलेले होते. अशा एका महालाची सर सालची जमाबंदी सरसरीनें पाऊण लाखापासून सवालाखापर्यंत असे. दोन अगर तीन महाल मिळून एक सुभा होई व त्यावरील अम्मलदारास सुभेदार ह्मणत. त्याचा पगार दरसाल चारशें होन ह्मणने सरासरीने दरमहा शंभर रुपये असे. मोंगलाई राज्यपद्धतींत जमाबंदीचें काम गांवचे पाटील कुलकरणी अगर जिल्ह्याचे देशमुख देशपांडे यांच्या ताब्यांत पूर्णपणें दिले असे. ही पद्धति शिवाजीनें चालू ठेविली नाहीं. गांवच्या व जिल्ह्याच्या ह्या वतनदारांचीं वतनें पूर्वीप्रमाणेंच त्यांजकडे चालू ठेवण्यांत आलीं होतीं. पण जमाबंदीच्या व्यवस्थेचें सर्व काम त्यांचेकडून काढून घेऊन सुभेदारानें आपल्या सुभ्याचें व महालक-यानें आपले महालाचें स्वतः करावें असें ठरविण्यांत आलें होतें. शिवाय दोन दोन अगर तीन तीन खेड्यांवर मिळून एक एक कमाविसदार ह्मणून कारकून नेमिला असून तो जमाबंदी करीत असे. महाल अथवा गांव यांचा वसूल मक्त्यानें घेण्याची पद्धत शिवाजीस बिलकुल पसंत नव्हती.
पायदळ व स्वार यांच्या पलटणीतील अम्मलदारांच्या व लोकांच्या अधिकारांची व्यवस्था ज्या पद्धतीनें शिवाजीनें अमलांत आणिली होती, त्याच पद्धतीच्या धोरणावर किल्ल्यावरील लष्करी अमलदारांचे व लोकांचे लहान मोठे दर्जे ठरविण्यांत आले होते. प्रत्येक दहा शिपायांच्या टोळीवर एक नाईक व अशा पांच टोळ्यांवर एक हवलदार, अशा दोन हवलदारांवर एक जमादार, व अशा दहा जमादारांच्या हाताखालीं मिळून एक हजार सैन्य असून त्यावर हजारी या नांवचा एक अम्मलदार असे. असे. सात हजारे मिळून एका सरनोबताच्या हाताखालील एक मावळी पायदळ पलटण होत असे. स्वारामध्यें बारगीर व शिलेदार असे दोन वर्ग असत व पंचवीस बारगीर अगर शिलेदार एका हवलदाराच्या ताब्यांत असत. पांच हवलदारावर एक जुमाला, दहा जुमाच्यावर एक हजारी, व पांच हजा-यावर एक पंचहजारी असून या सर्वावर स्वारांच्या सरनोबताना अम्मल असे. पंचवीस स्वारांच्या टोळीच्या दिमतीस एक भिस्ती व एक नालबंद दिलेला असे. पायदळ व स्वार यांच्या पलटणीवरील प्रत्येक मराठा अम्मलदाराच्या हाताखालीं एक ब्राह्मण जातीचा सबनीस अगर, मुजुमदार व प्रभु नातीचा कारखानीस अगर जमिनीस असे. बारगीरांच्या घोड्यांस पावसाळ्यांत छावणीमध्यें ठाणबंद ठेवीत व त्या ठिकाणीं त्यांच्या चंदी वैरणीची वगैरे चोख व्यवस्था असून, लोकांस राहण्याकरितां निवा-याच्या खोल्या बांधून दिलेल्या असत. लष्करांतील अम्मलदार शिपाई यांस ठराविक वेतन मिळे. पागाहजारीचा पगार १००० होन व पागापंचहजारीचा पगार २००० होन असे. पायदळांतील हजारीचा पगार ५०० होन असे. पायदळांतील शिपायाचा पगार नऊपासून तीन रुपयांपर्यंत व स्वारांतील बारगीरांचा पगार वीसपासून सहा रुपयापर्यंत जाच्या त्याच्या इभ्रतीप्रमाणें असे. सैन्यांतील लोकांस सालापैकीं आठ महिने मुलुखगिरीवर ह्मणजे मोंगलांच्या ताब्यांतील प्रांतांतून चौथाई व सरदेशमुखी या बाबींचा वसूल करून आपापला निर्वाह करावा लागे. मुलुखगिरीवर जातांना बरोबर बायका मुलें वागविण्याची सक्त मनाई असे. एखादें शहर लुटलें ह्मणजे प्रत्येक स्वारास अगर शिपायास मिळविलेल्या लुटीचा हिशेब द्यावा लागत असे. नवीन स्वारास अगर शिपायास सैन्यांत सामील होण्यापूर्वी चांगल्या वर्तणुकीबद्दल आपल्या दोस्त शिपायाची अगर स्वाराची हमी द्यावी लागत असे. लष्करी अम्मलदारास चौथ व सरदेशमुखी या बाबींच्या वसुलाचा हिशेब द्यावा लागत असल्यामुळें त्यास मात्र आगाऊ पगार मिळत असे. त्यावेळीं नोकरीबद्दल जमिनीचे उत्पन्न अगर जमीन तोडून देण्यांत येत नसे. शिवाजीचे लष्करी नियम इतके कडक असतांही त्याच्या सैन्यांत लोकांची भरती होण्यास कधींही अडचण पडली नाहीं व विजयादशमीच्या मुहूर्तावर सैन्याची जमवाजमव सुरू झाली ह्मणजे घाटमाथ्यावरील मावळे, कोंकणांतील हेटकरी, महाराष्ट्रांतील बारगीर व शिलेदार यास शिवाजीच्या बाहुट्याकडे धांव मारून त्याच्या हाताखालीं शत्रूशीं लढण्यापेक्षां दुसरी कोणतीही नोकरी करणें आवडत नसे.