Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
श्रीभवानीचें अभयवचन, जिजाबाईचा आशीर्वाद व सैनिकांची विलक्षण स्वामिभक्ति या त्रिगुणात्मक मात्रेनें प्रोत्साहन दिल्यामुळें, स्वतः पसंत करून ठेवलेल्या जागी आपल्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याची भेट घेण्याचा शिवाजीनें निश्चय केला. इकडे शिवाजीची अशी कडेकोट तयारी चालली होती. पण तिकडे अफझुलखानाचा निराळाच बेत चालला होता. आपल्या अफाट सैन्यापुढें शिवाजी रणांगणांत तोंड द्यावयास उभा रहावयाचा नाही, तेव्हां कसेंही करून त्यास किल्ल्यांतून बाहेर आणून जिवंत धरून विजापुरास न्यावा व युद्धाची कटकट टाळावी याच विचारांत ते मांडे खात होता. कृष्णेच्या आणि कोयनेच्या वळणांत जंगलाच्या आड शिवाजीचें सैन्य दडून राहिलें होतें. अफझुलखानाचें सैन्य मात्र वाईपासून महाबळेश्वरपर्यंत एकसारखें पसरलें होतें. कांहीं आश्रय नसल्यामुळें या सैन्यावर दोहों बाजूनी सहज हल्ला करतां आला असता. शिवाजी आणि अफझुलखान एकमेकांस धरण्यास वाघासारखे टपून बसले होते. कारण सेनापति सांपडला की लढाईचा निकाल झालाच, ही गोष्ट दोघांसही पूर्णपणें अवगत होती. शिवाजीने वकीलामार्फत ‘आपण शरण येण्यास कबूल आहो' असें अफझुलखानास कळविलें. अफझुलखानानेंही या गोष्टीची सत्यता पहाण्याकरतां आपल्या जवळच्या ब्राह्मणपंडितास शिवाजीकडे पाठविलें. या ब्राह्मणपंडिताच्या मनांत स्वधर्म व स्वदेशाभिमानाचें वारें भरवून शिवाजीनें त्यास आपलासा करून घेतलें. या ब्राह्मणाच्या मध्यस्तीनें परस्परांनी एकांतांत एकमेकांची गांठ घ्यावी, कोणीही आपलें सैन्य बरोबर आणूं नये असें ठरलें. या भेटीच्या वेळीं ज्या गोष्टी घडल्या त्याचें वर्णन निरनिराळ्या इतिहासकारांनीं निरनिराळ्या प्रकारानें केलें आहे. वाघनखें चालवून व भवानी तरवारीचा वार करून शिवाजीनें प्रथम विश्वासघात केला, असें मुसलमान इतिहासकार व तदनुगामी गाँटडफ साहेब ह्मणतात. चिटणीस, सभासदप्रभृति बखरकार लिहितात की, खानानें शिवाजीच्या मानेस डावे हातानें हिसडा देऊन त्यास पुढें ओढून आपल्या डावे काखेंत दाबून टाकल्यामुळें निरुपाय होऊन शिवाजीस वाघनखाचा प्रयोग करावा लागला. कसेंही असो त्या काळीं अशा प्रसंगी विश्वासघात करणें ह्मणजे मोठेसें पातक मानलें जात नसल्यामुळें, असा विश्वासघात होईल असें समजूनच दोघेही भेटीस तयार झाले होते. अशा कृत्यास प्रवृत्त होण्यास शिवाजीस बरींच सबळ कारणें होती. आपल्या भावास मारल्याबद्दल व तुळजापूर व पंढरपूर येथील देवालयें भ्रष्ट केल्याबद्दल त्यास खानाचा सूड घ्यावयाचा होता. रणांगणांत उभें राहून अफझुलखानाशी दंड ठोकण्याइतकी त्याची कुवत नाहीं हें तो पक्केपणीं जाणून होता. शिवाय गेल्या १२ वर्षांत त्याणें जो खटाटोप केला, त्याला यश येणें सर्वस्वी या लढाईच्या निकालावर अवलंबून होतें. यावरून शिवाजीच प्रथम कपटानें खानास मारण्यास उद्युक्त झाला असावा. शिवाय या दोघांच्या स्वभावावरूनही हेंच अनुमान खरें ठरतें. अफझुलखान गर्विष्ठ, सैलट व अविचारी होता. शिवाजी मोठा धूर्त, सावध आणि प्रसंगावधानी होता. भेटीअंतीं जो निकाल लागेल त्याचा पूर्ण फायदा करून घेण्याचीही शिवाजीनें आधींच तयारी करून ठेवली होती. खान मेला हें वर्तमान कळतांच शिवाजीच्या सैन्यानें खानाचे फौजेवर हल्ला केला. खानाची फौज बेसावध असल्यामुळें तिची फार गाळण उडाली. वरील सर्व गोष्टींचा विचार केला ह्मणने ग्राँटडफचें” ह्मणणें खरें असावें असें वाटतें. कदाचित् दोघेही परस्पराबद्दल साशंक असल्यामुळें एकमेकाचे वास्तविक हेतू त्यांस बरोबर कळले नसतील आणि यामुळें त्या दोघांत जो विशेष बेसावध होता, त्यास त्याच्या हलगर्जीपणाचें प्रायश्चित्त सहजच मिळालें असेल. कदाचित् कपटानें दुस-यास मारावें असा दोघांचाही आरंभापासून विचार असेल; पण प्रसंगी तो एकानें साधला, दुस-यास तो साधतां आला नसेल. अफझुलखानाच्या पराभवामुळें पन्हाळ्याच्या दक्षिणेकडचा व कृष्णाकिनारचा सर्व प्रदेश शिवाजीस मिळाला. विजापूरदरबारनें पुनः दुस-यांदा शिवाजीवर सैन्य पाठविलें. शिवाजीने याही सैन्याचा पराभव करून अगदी विजापूर शहरच्या वेशीपर्यंत आपलें सैन्य नेलें. त्याच्या सेनानायकांनीं राजापूर व दाभोळ हीं शहरें घेतलीं. विजापूरदरबारनें तिस-यानें शिवाजीवर सैन्य धाडले. यावेळी शिवाजी पन्हाळच्या किल्यांत होता अशी संधि पाहून विजापूर सैन्यानें पन्हाळ्यास वेढा दिला. वेळ कठिण आली; पण शिवाजी मोठ्या युक्तीनें विजापूर सरदाराच्या हातावर तुरी देऊन रांगण्यास पळून गेला. विजापूर सैन्यानें शिवाजीचा पाटलाग केला; पण शूरवीर बाजी प्रभू याणें आपल्या १००० लोकांनिशी या अफाट सैन्याची वाट अडवून धरली. या दोन सैन्यांत सरासरी ९ तास तुमुल युद्ध चाललें होतें. बाजी प्रभूचे तीनचतुर्थांश लोक पडले; पण हा शूरवीर एक पाऊलही मागें सरला नाहीं. शिवाजी रांगण्यास सुरक्षित जाऊन पोंचल्याच्या तोंफा जेव्हां त्याणें ऐकल्या, तेव्हांच त्या रणधुरंधरानें आपलें शिर धारातीर्थी ठेवलें. ह्या पराक्रमास उपमा ग्रीसच्या इतिहासांतील स्पार्टन लोकांचा राजा लीओ निडस यानें आपल्या तीनशें लोकांनिशीं धरमापायतीच्या खिंडींत प्रचंड पर्शियन सेनेबरोबर केलेल्या युद्धाचीच योग्य होय. १६६१ ६२ त विजापूर बादशहा शिवाजीवर स्वत :च चालून गेला; पण या स्वारीचा कांहीं उपयोग झाला नाहीं. यापुढेंही एक दोन वर्षें ही लढाई हळूहळू चाललीच होती. याच सुमारास शिवाजीनें नवीन आरमार उभारून जंजि-याखेरीज समुद्रकांठचे सर्व किल्ले घेतले. सर्व प्रयत्न निर्फळ झाल्यामुळें हताश होऊन विजापूर दरबारनें शहाजीच्या मध्यस्तीनें १६६२ त शिवाजीबरोबर तह केला. या तहाअन्वयें शिवाजीनें काबीज केलेला सर्व मुलूख त्याच्या ताब्यांत राहिला. शिवाजीच्या पहिल्या भागाचे कारकीर्दीच्या अखेरीस शिवाजीच्या ताब्यांत चाकणपासून निरानदीपर्यंतचा सर्व प्रदेश, त्याची स्वतःची जहांगीर व पुरंदरपासून कल्याणपर्यंत सह्याद्रिपर्वतांतील सर्व किल्ले इतका मुलूख होता. दुस-या भागाचे शेवटीं कल्याणापासून गोव्यापर्यंतची सर्व कोंकणपट्टी व याच कोंकणपट्टीस समांतर असा घांटमाथ्यावरील भीमेपासून वारणेपर्यंत उत्तर दक्षिण १६० मैल लांब व सह्याद्रीपासून पूर्वेस १००. मैल रुंद इतका टापू शिवाजीस मिळाला. शिवाजीच्या कारकीर्दीच्या तिस-या भागाच्या शेवटीं शेवटीं विजापूर बादशहानें हा तह मोडला व शिवाजीवर पुन: चाल केली. शिवाजीचा सेनापति प्रतापराव गुजर याणें हा हल्ला फिरविला. पण शत्रुसैन्याचा पाठलाग न करतां त्याणें त्यास परत स्वदेशीं जाऊं दिलें. या स्थानीं सदयतेबद्दल शिवाजीनें प्रतापरावाची बरीच कानउघाडणी केली. प्रतापरावाच्या मनास ही गोष्ट इतकी झोंबली की, विजापूर सैन्यानें जेव्हां शिवाजीच्या मुलुखावर पुन : हल्ला केला, तेव्हां त्या सैन्यावर तुटून पडून त्यांची कत्तल करतां करतां प्रतापरावानें आपला प्राण सोडला. पुढें मोंगलांनीं जेव्हां विजापुराम वेढा दिला, तेव्हां विजापूरच्या बादशहानें मोठ्या कळवळ्यानें शिवाजीची मदत मागितली. शिवाजीनेंही पूर्वीचे सर्व अपराध विसरून त्यास मदत दिली. मोंगलाच्या प्रदेशांत लढाई सुरूं करून व मोंगल सैन्यावर पिछाडीनें व बाजूंनीं मारा करून मोंगलास विजापूरचा वेढा उठविण्यास शिवाजीनें भाग पाडलें. या शिवाजीच्या उदार कृतीमुळेंच विजापूरचें राज्य आणखी २० वर्षे राहिलें. वस्तुत: या गोष्टीचें वर्णन शिवाजीच्या कारकीर्दीच्या तिस-या भागांत करावयाचें, पण वाचकांस विजापूर दरबारशीं झालेल्या संग्रामाची सविस्तर हकीकत एके ठिकाणी वाचावयास मिळावी म्हणूनच त्याचें या प्रकरणांत थोडेंसे दिग्दर्शन केलें आहे.