Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
स्वसंरक्षणाचा हा पहिला कार्यभाग, रक्तस्राव न होतां, सर्व पक्षांच्या संमतीने पूर्णपणें तडीस गेल्यानंतर, विजापूर दरबारशीं सामना करण्यास शिवाजीस कंबर बांधावी लागली. विजापूर दरबारनें प्रथम शिवाजीचा बाप शहाजी यास कपटाने कैद केलें. गुप्त हेर पाठवून शिवानीस धरण्याचा प्रयत्न केला व शेवटीं मोठमोठे शूर सरदार पाठवून शिवाजीस जमिनदोस्त करण्याचीही खटपट केली; पण त्यांच्या प्रयत्नास यश आलें नाहीं. १० वर्षे झुजून शिवाजीनें विजापूर दरबारास दाती तृण धरून शरण येण्यास भाग पाडलें. वाटेल त्या शर्ती त्याजपासून त्याणें कबूल करून घेतल्या. अशा प्रकारें विजापूरच्या युद्धांत विजयी झाल्यामुळें शिवाजीची. सत्ता जोरावली. तिला बरेंच कायमचें स्वरूप आलें. त्याच्या अमलांतील मुलूखही वाढला. त्याची कीर्ति सर्वत्र पसरली. इतकें झालें तरी मराठ्यांत एकी करून मराठ्यांच्या मुलुखाचें संरक्षण करावें हा त्याचा मूळचा विचार काडीइतकाही बदलला नाहीं. विजापूर दरबाराशीं उपस्थित झालेल्या भांडणाचा इतिहास हा शिवाजीच्या कारकीर्दीचा दुसरा भाग होय. विजापूर दरबारची खोड मोडल्यानंतर दक्षिणेवर चाल करू पहाणा-या मोंगलाशीं शिवाजीस तोंड द्यावे लागलें. मोंगलाशीं झालेला संग्राम हा शिवाजीच्या कारकीर्दीचा तिसरा भाग होय. या संग्रामास १६६२ त सुरुवात झाली. १६७२ त मोंगलाचा पूर्ण पराभव करून शिवाजीनें नवीन उदयास आणलेल्या मराठेशाईची सत्ता मोंगलास कबूल करावयास लावली. शिवाजीस १६७४ त राज्याभिषेक झाला. यावेळेपासून त्याच्या कारकीर्दीच्या चवथ्या आणि शेवटच्या भागास आरंभ झाला. या भागांत त्याच्या सर्व आशा आणि मनोरथ परिपूर्ण झाले असल्यामुळें, शिवाजीच्या कारकीर्दीचा हा अगदी पूर्णावस्थेचा भाग आहे. या भागांतील इतिहासावरूनच त्यांच्या चरित्राची आणि स्वभावाची बरोबर ओळख होते. या भागांत त्याणें जी शासन पद्धति सुरू केली व ज्या उदात्त राजनीतितत्वांचा कित्ता घालून दिला, त्यावरूनच त्याची खरी पारख करावयाचा आहे. शिवाजीनें आपल्या कर्तव्याचें मुख्य धोरण कधींच बदललें नाहीं. मराठ्यांची पांगलेली शक्ति एकवटून स्वसंरक्षण साधावें हा काय तो त्याचा मुख्य हेतु होता. ज्या इच्छित प्रदेशांत हा हेतु सिद्धीस न्यावयाचा, त्या प्रदेशाची परिस्थि त्यनुरूप मर्यादा वाढत गेली; पण त्याचा हा मूळचा हेतु बदलला नाहीं. शेजा-यापाजा-यांपासून स्वतःचे जहागिरीचें संरक्षण करतां करतां यदृच्छेनें मिळालेल्या नवीन मुलखाचा मोंगलाच्या त्रासापासून बचाव करावा लागल्यामुळें त्याच्या मूळच्या स्वसंरक्षणाच्या कामास राष्ट्रीय संरक्षणाचें स्वरूप आलें. त्याच्या अमलांतील प्रदेश वाढत गेल्यामुळें निरनिराळ्या ठिकाणच्या मराठे सरदारांत एकी करण्याची त्यास संधि मिळाली. परंतु त्याचा वर निर्दिष्ट केलेला हेतु कायमच होता. विजापूर किंवा मोंगल बादशहाशीं भांडण उपस्थित करण्याची त्यास मुळींच इच्छा नव्हती. पश्चिम महाराष्ट्र काबीज करण्याची हाव न धरतां, कर्नाटकांतील व उत्तर हिंदुस्थानांतील आपआपल्या प्रदेशांत हे बादशहा राज्य करते तर शिवाजीनें त्यास सुखानें नांदूं दिलें असतें. गोवळकोंडच्या राज्याचा बचाव करण्याची तर शिवाजीनें हमीच घेतली होती. मोंगलांचे हल्ले फिरवून लावण्याचे कामीं शिवाजीनें विजापूर दरबारासही पुष्कळ वेळ मदत केली आहे. शिवाजीच्या अमलांतील प्रदेशास मोंगल बादशहा त्रास देतेना, तर तो मोंगलांचा मांडलिक होऊन रहाण्यासही राजी होता. मोंगल बादशहाचें स्वामित्व कबूल करण्याकरतां तो दिल्लीससुद्धां गेला होता; पण मोंगलांनी तेथें त्यास कपटानें कैद केलें. मोंगलांनीं अशी दगलबाजी केली तरीही शिवाजी त्यांच्याशी तह करण्यास तयार होता. मोंगल बादशहानें आपल्यास पादशाही दरबारांतील बड्या सरदारांत गणावें एवढेंच कायतें त्याचें ह्मणणें होतें. आर्यावर्तातील सर्व हिंदू रानांत एकजूट करून मुसलमानांची सत्ता नामशेष करावी, ही कल्पना शिवाजीच्या मनांत कधीच आली नाही. शिवानीचे पश्चात् या कल्पनेचा उदय झाला आहे. पंतप्रतिनिधीशीं झालेल्या वायुद्धांत, मोंगलराज्यवृक्षाच्या फांद्या छेदीत न बसतां, या वृक्षाचा मुख्य गड्डा जो दिल्लीपति त्यावर चाल करून या वृक्षाची पाळेंमुळें खणून टाकलीं पाहिजेत, अशी सल्ला जेव्हां शाहूमहाराजांस बाजीराव पेशव्यानीं दिली, तेव्हांच प्रथम या कल्पनेचें बीजारोपण झालें. शिवाजीची कल्पना इतकी दुरवर गेली नव्हती. दक्षिणेत ‘स्वराज्य' स्थापून विजापूर व गोवळकोंडा येथील राजांच्या मदतीनें मोंगलास तापी नदीच्या उत्तरेस घालवून द्यावें एवढाच त्याचा उद्देश होता. पश्चिम हिंदुस्थानांत हिंदुराज्याची स्थापना करून गोवळकोंडा व विजापूर या दोन मुसलमान दरबारांच्या मदतीनें उत्तरेकडील मोंगलाच्या त्रासापासून आपला बचाव करावा व आपल्या देशबांधवांस शांतिसुखाचा व धर्मस्वातंत्र्याचा लाभ करून द्यावा हीच कायती त्याची महत्वाकांक्षा होती. ही गोष्ट बरोबर कळली ह्मणजे शिवाजीच्या कारकीर्दीच्या चारी भागांचा इतिहास पूर्णपणें लक्षांत येण्यास बिलकुल अडचण पडणार नाहीं.