Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १६६.
१६९८ आषाढ वद्य ६.
राजश्री लक्ष्मण आप्पाजी गोसावी यांसि :-
सु॥ सबा सबैन मया व अलफ. तुमचीं ज्येष्ठ शुद्ध दशमीचीं पत्र आलीं. त्या अलीकडे पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं, तरी सविस्तर वरचेवर लिहीत जाणें.
येथील खर्चाची वोढ मोठी. दररोज दोन हजार रुपये पाहिजेत. त्यास, इंग्रेजाचा प्रकार वोढीचा. लिहिल्याप्रों ऐवज देणार नाहींत. याजकरितां किमानपक्ष तीस पस्तीस हजार दरमाहाची बेरीज तुह्मांस लिहिली. याणीहि खर्च चालणेंच नाहीं. तथापि च्यार दिवस हरकसी गुजराण होईल. आणि जवाहीर मागणें. त्यास, बारा हजारांचा नेमणूक जनराल याची असल्यास, यांणीं येथील खर्चाचा सेवट कसा लागतो ? याजकरितां तुह्मीं जनराल यासी बोलोन, जवाहीर तऱ्हीं मागावें. ह्मणजे जनराल याजकडील ऐवज व जवाहीर हरकोठें ठेऊन, दोनी ऐवजांनीं च्यार दिवस खर्च चालऊं. आजच कारखाने उपासी मारतां येत नाहीं. कलम १.
तिकडे भाऊचें बंड बळावलें आहे. तिकडे येखादा शाहाणा मनुष्य पाठवणें, ह्मणोन पेसजी लिहिलेंच आहे. त्यास तुह्मी ज्यास पाठवाल त्यांणी जाऊन, काय चरित्र आहे तें मनास आणावें. केवळ हुजूरूनच पाठविलें, हाहि भाव दर्शऊं नये. असें मधेचें बोट तोंडाजवळ न्यावें, तोंडांत सांपडूं देऊं तर नये. दाखवावे तर खरें. याप्रों तेथील भावगर्भ काय असेल तो मनास आणावा. याप्रों जो जाईल त्याणीं करावें. त्यास कांही आशा उपजे, असें बोलावें. परंतु दस्ताऐवज सांपडू न देणें. आह्मापासून येक अंतर तेव्हां पडलें की, रूबरू आणून पाहिलें नाहीं. दुरूनच पाहिलें. हें तर गोष्ट खरी. वरकट मातबर मुछद्दी यानें जवळून पाहून खोटा ह्मणाले. तेव्हां काय पाहावे या अर्थे न पाहिलें. हेहि भाव येथील त्यास समजावे. तुह्मांकडील कारकून अथवा खिजमतगार, असें समजल्यास दोष नाहीं. कलम १.
सदरहू आठ कलमें खास दस्तुरी लेहून याचीं पहिली रवानगी तुह्मांकडे केलीच आहे. पत्रें येऊन पोंहचलीच असतील. कलम १.
नवाब हैदरअली खानबहादर बमय फौजसुद्धां कुच दरकुच बंकापुरास येऊन बंकापूर घेतलें. पुढे दरमजल धारवाडास येऊन तें घेऊन मिर्जेस येणार. याप्रों नवाबाची पत्रें व बाजीराव गोविंद यांचीं पत्रें छ ६ रबिलावलची त्याणीं रवाना केली ते छ ८ जमादिलावली पोंहचलीं. त्यांच्या नकला तुह्मांस पाहावयास पहिले रवानगींत पाठविल्या आहेत. येऊन पावतील. तरी पुढें त्यास काय सला ल्याहावी ते सला लिहिणें. कलम १.
स्वहस्तें परहस्तें कसें तरी आमचें कार्य व्हावें, हे मर्जी पूर्वी जनराल याची होती. त्यास, याचा संदर्भ लाऊन ते संतोषानें आह्मास दुसरे स्थळी पोहचावीत असें करावें. निरोपच द्यावा. येथें दुसरें राजकारण अंगरेजाचे प्रतिमेचें आहे. परंतु याची मर्जी तोडून कसें जावें, या अंदेशांत आहों. जवाहीर घेऊन व याचें संमत घेऊन दुसरें तऱ्ही राजकारण करावें; या विचारांत आहों. कलम १.
सिद्दीं याजकडील फौजेचें राजकारण करावयाचे मांडिलें आहे. त्याचे वकील येथें आले आहेत. त्यासी बोलतच असो. होईल तेव्हा खरें. सिद्दी ह्मणजे नगर ठठ्ठा भुजे पलीकडे. तेथील फौज यावयाचा मजकूर. कलम १.
मेवा शेंपन्नासाचा अंगरेज मायेचे व कोंसलदारास खरिदी करून वाटावा. कलम १
लक्ष्मण गोपाळ याजवर बहुत ममता करीत जाणें. येविसीं याचें पत्र हुजूर येई असें करणें. कलम १.
मारवाडचें राजकारण करून फौज आणावयाकरितां राजश्री बिजेसिंग याजकडे माधवराव वैद्य रवाना केले असेत. भागोजी गवारी व कृष्णराव भास्कर तेथें आहेतच. होईल तें खरें. कलम १.
एकूण नव कलमें लिहिली आहेत. परंतु यांत सारासार पाहून छान करून बोलत जाणें. तुह्मांस मसलत सुचेल ती लिहीत जाणें. तुह्मी शाहाणेव मर्जीस वाकीफ आहां व येकनिष्ठ आहां. तुह्मी मसलत, येथील उपयोगी तेच ल्याहाल व कराल. मनसब्याचा पेंचपांच आढळल्यास उगऊन उत्तर लिहीत जाणें. येथेंहि छान होईल. फिरोन उत्तर येईल तैसें बोलावें. चार दिवस अधिक लागले तरी चिंता नाहीं. परंतु मनसुबा नांसू नये. हे मोठे शहाणपणचे उपाय आहेत. तूर्त दुसरे राजकारणावर आमचा भार आहे. परतुं याची मर्जी खटी करावयाची नाहीं व आपलें तर केलें पाहिजे. याजला विलायतेचा हुकूम लौकर येईल, हा भरंवसा येत नाहीं. यास्तव च्यार रुपये खर्चाची वोढ अधिक आगळी दाखऊन व सर्वस्वें हस्तपरहस्तें काम करून. हें पहिलें भाषण आहे. त्याजवरच कोठून रजा घ्यावी व जवाहीर घ्यावें. पुढें आंतून गुप्तरूप आमची कुमक करीत तें करावें. जाहीर न करीत तरी चिंता नाहीं. आह्मावर अंगरेजाचें, या जनरालाचें, उपकार मातबर. यासी छद्म करणें उचित नाहीं. परंतु यांणी हरयेक तजविजेनें काम आमचें करावें. यांस देऊं केलें तें देऊंच. दुसरेंही काम जाहालें तरी यासी वाकडी गोष्ट करावयाची नाही, हें खातरजमा करणें. मेस्तर शाहा विलायतेस जातात. लवकरच तेथें येथील. त्यांचे जबानीवरून कांही मजकूर कळतील परंतु दुसरी राजकारणें कोणतीं, हें त्यांस नांवनिसीं सांगितली नाहीं. तुह्मीही न बोलणें. जवाहीर सवासाहा लक्षाचें हातास आल्यावर मेस्तर शाहास रद्दकर्जी व कांही वाटखर्ची पाउण लक्षाचें ऐसीं हजारपर्यंत जवाहीर द्यावयाचें आहे. तुह्मांस पूर्वी सूचना असावी. लक्ष्मण गोपाळ ममतेत घेतल्यास तुह्मांस विचारास सोबत उत्तम होईल. आमचीही मर्जी सांप्रत कोशलांत घ्यावा, असी आहे. तेथें तुह्मांस त्याची वर्तणूक दृष्टीस पडत असेल, त्याप्रों करणें. आह्माजवळ नारो गोपाळ हा सर्वही मजकूर सांगतो. कोशलांत आहेत, यास्तव कोसल करून केल्यास पेंच पडत नाहीं. तेथें पक्की त्याची खातरजमा करून घेणें. वरकड ज्याचें त्याप्रों बोलत जाणें. इष्टोराचे मैत्र बहुत. आमचे ममतेचा. त्यासी बोलत जाणें. कारनेलीसी कार्याकारणें बोलावें. वरकडही अंगरेज ममतेंत राखावें. मेवा वाटावा. हरतऱ्हेनें कोसलदार वगैरे ममतत घ्यावे. मेहनत करावीं. सर्व मुछदी गेले. तुह्मी राहिलां. तरी सर्वांपेक्षां अधिक करून दाखवाल हा भरंवसा आहे. श्रीकृपा करणार. हा कागद दोन तीन वेळां वाचणें. मेहनत करणें. जाणिजे. छ २० जमादिलावल.
(लेखनावधि:)