Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
लेखांक ७५.
श्रीगजानन.
१६७२ मार्गशीर्ष शु.।।११. श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी-
विनंति. सेवक नारो शंकर कृतानेक सां। नमस्कार विज्ञापना ऐसीजे- सेवकाचे वर्तमान ता ९ माहे मोहरमपावेतो स्वामीचे प्रतापेकरून कुशळ असे. बहुत दिनावधि जाली. पत्र पाठवून परामर्श न जाला. याकरितां चित्त साक्षेप असे. कृपापत्र पाठवून सांभाळ केला पाहिजे. तेणेकरून सेवकांचे चित्त आनंदाते पावेल. या प्रांतचे वर्तमान तरी वोडसे प्रांतचे हरामखोर सर्व एकत्र होऊन कुंवर भूपाळसिंग राजे यांचा कनिष्ठ नातू यांस सिरउपस्थाई पुढे करून खरगापूरवाले व उप्तानवाले व पलेरावाले व कटारवाले धमना वगैरे बुंदेले धंदेर पंवार तीन चार सहस्त्रपावेतो लोक पांच सातसे स्वार जमा होऊन दुंडी केली. वोडशाचे राज्याचा मुलूख ताराज केला व सरकार खालशाचे गांव महू, राणीपुरा, कुरेछा वगैरे प्रांतचे चाळीस पनास गांव मारून मुलुखांत बखेडा बहुतच केला. देशी नाना प्रकारचे वर्तमान व पठाणाच्या युध्दाच्या बालडाची अवाई उठऊन धूम केली. यामुळे सरकारचे नुकसान जाले. राजियास तो ऐवज येणे ठिकाणच नाहीसे केले. मागीलपैकी राजेयाने निकाल करून मुलुखांत ऐवज नेऊन दिल्हा. तो गर्दीस मेळविला. तेव्हां आम्ही फरोकाबाद प्रांती होतो. हे वर्तमान ऐकून या प्रांते आलो. तो दिवस पर्जन्याचे, यामुळे फौजा जागोजागी पाठविल्या. बंदोबस्त केला. त-ही चार महिने दंगाच राहिला. उपरांतिक, विजयादशमी जाहलियावर राजियास समागमे घेऊन मुलुखांत गेलो. हरामखोरास पराभवाते पाऊन राजेयाचे मुलुखाचा व सरकारच्या मुलुखाचा बंदोबस्त करून कुंवर भूपालसिंगास शिक्षा करून ठिकाणी ठेविले. तो मागती राजश्री सरदारांची पत्रे आली की पठाणांनी बळ केले आहे. फौजेवर्तमान सत्वर येणे. त्यावरून तिकडे दरमजल जाण्याचा विचार केला. तो राजे प्रीथीसिंग यांस वेथा निर्माण होऊन निधन पावले. राणीसुध्दा अकरा स्त्रियांनी सहगमन केले. मागती नवा मनसबा निर्माण जाला! तेव्हां कुंवर सावंतसिंग यांस राजतिलक मार्गशीर्ष शुध १०स सर्व राज्याचे मते जाला. सरकारचा नजराणा येणेप्रो ठरविला. एक ७५०००, कारकुनी रु १५००० व मशारनिलेस सरकारांतून हत्ती सिरपाव द्यावयाचे रु १००००, एकूण येतां एक लक्ष रु ठरविले. ऐवजाचा विचार त्याचे घरचा स्वामी जाणतच आहेत. दोन तीन सालांत राज्यांतून तजवीज करून घ्यावी तेव्हा वसुलांत येईल. याप्रमाणे इकडील बंदोबस्त करून दरमजल राजश्री सरदारांकडे जात असो. राजे सावंतसिंग यांस सिरपांव वस्त्रे पाठवावी. हत्ती सरकारांतूनच दिल्हा तरी दहा हजार रुपये नुकसान होणार नाही. नाही तरी रु देणे लागतील. येविषई आज्ञा कर्तव्य ते केली पाहिजे. वस्त्रे व खातरजमेचे पत्र राजेमजकुरास पाठवावयास आज्ञा करावी. बहुत काय लिहिणेॽ