Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

प्रस्तावना

१२. ह्या दहाव्या खंडांत माधवराव बल्लाळ, नारायणराव बल्लाळ, सवाई माधवराव व बाजीराव रघुनाथ ह्या चार पेशव्यांच्या कारकीर्दीतील पत्रव्यवहार आला आहे. पैकीं माधवराव बल्लाळाच्या कारकीर्दीतील ७९ लेख आहेत. त्यातला २१ वा लेखांक शक १६८५ श्रावण शुद्ध ५ चा असून, त्यांत दोन्हीं सैन्यें मिळून पांच सहा हजार लोक रणास आले, असें खुद्द माधवराव लिहितो. ह्या राक्षसभुवनाच्या लढाईत मोंगलांचे दहा हजार लोक पडले, असें डफ म्हणतो व आधार बखरींचा देतो. कोणत्याहि बखरीपेक्षा खुद्द माधवरावाच्या पत्रावर जास्त विश्वास ठेवला पाहिजे, हें उघड आहे. अस्सल पत्रापेक्षां बखरीवरच डफने विशेष निर्वाह केला होता, हे सांगावयाला नकोच. ही तपशिलासंबंधाची बाब झाली. परंतु; निजामाशीं चाललेल्या ह्या मोहिमेंत दुसरीच एक बाब इतिहासदृष्ट्या व राजनीतिदृष्ट्या महत्वाची आहे. ती बाब ही. मोरोबा फडणवीस, गोपाळराव पटवर्धन, सदोबा शेणवी, गमाजी मुतालिक, भवानराव प्रतिनिधी, वगैरे मराठे मुख्यसत्तेला सोडून शत्रुपक्षाला मिळाले, तें राजनीतीच्या दृष्टीनें कितपत न्याय्य होते? स्वतंत्र संस्थानांतील कोणीहि माणूस युद्धप्रसंगी किंवा शांततेच्या काली शत्रूंच्या संस्थानाच्या विरुद्ध कोणत्याहि प्रकारे संस्थानाच्या जाणून उपयोगीं पडल्यास, तो संस्थानद्रोही होऊन देहान्तशिक्षेस पात्र होतो, असा सर्व राष्ट्रांचा नियम आहे. त्या नियमाच्या दृष्टीनें पहातां गोपाळराव पटवर्धन वगैरे सरदार संस्थानद्रोही ठरतात. हा नियम त्या कालीं महाराष्ट्रांत प्रचलित नव्हता, असेंहि नाहीं. तोतयाचे बंड झाले तेंव्हा नाना फडणिसांनीं हजारों लोकांची त्यांच्या त्यांच्या अपराधांच्या मानानें शासनें केलेलीं आहेत (पत्रांक ३०७). संस्थानांतील सामान्य माणसें शत्रूंच्या सेवेस गेलीं असतां, त्यांचीं घरेदारें जप्त करण्याचीहि वहिवाट त्या कालीं होती (पत्रांक ६६ वगैरे). शिवाजी तर अशा माणसांना शत्रु समजून शासन करीत असे (म. इ. सा. खंड ८). रघुनाथरावाचें व माधवरावाचें इतकें बिनसलें असतां, रघुनाथरावाच्या विरुद्ध माधवराव निजामाला जाऊन कधींहि मिळालेला नाहीं. असा दंडक त्या वेळीं प्रचलित होता. मुख्य सत्ता शिरजोर असतां हा नियम लागू असतो, व कमजोर झाली असतां नसतो, असें तर बिलकूलच म्हणतां येत नाहीं. मुख्य सत्ता कोणत्याहि कारणानें कमजोर होऊं लागली असतां, तिच्याशीं एकनिष्ठेनें रहाणें इतकेच नव्हें, तर तिला शिरजोर करण्याकरितां जिवापाड मेहनत करणें संस्थानांतील प्रत्येक माणसाचा स्वभावसिद्ध धर्म आहे. तो धर्म न पाळला, तर संस्थानाचें स्वातंत्र्य त्या मानानें नष्ट होतें. संस्थानाचें स्वातंत्र्य जसजसें नष्ट होतें, तसतसें ज्या धर्म, नीति व संस्कृति यांच्या संरक्षणाकरितां स्वतंत्र संस्थान निर्माण झालेलें असतें, त्यांचा नाश होतो. त्या नाशाबरोबर संस्थानांतील प्रत्येक व्यतीचेंहि स्वातंत्र्य नष्ट होतें. अशी भयंकर आपत्ति संस्थानद्रोहानें येते. तेव्हां, संस्थानद्रोह्यांना मोठी शिक्षाच योग्य असते. अशी शिक्षा न देणारा संस्थानाधिकारीहि संस्थानाच्या नाशास कारण होतो. ह्या दृष्टीने पहातां, संस्थानहितार्थ माधवराव बल्लाळानें गोपाळराव पटवर्धनादि मंडळींचें यथायोग्य शासन केलें पाहिजे होतें. गोपाळरावादि मंडळी फौजबंद पडल्यामुळें व संस्थानाधिकारी कमजोर पेंचांत पडल्यामुळे, माधवरावाच्या हातून शासन करण्याचा धर्म यथास्थित अंमलांत आला नाहीं. त्याचा परिणाम असा झाला कीं, देशांतील राजधर्म व प्रजाधर्म ढिला पडला; ह्यापुढें प्रत्येक सरदार हरहमेष संस्थानच्या शत्रूंशीं कधीं गुप्तपणें व कधीं उघडपणें मित्रत्व करूं लागला. पानिपतच्या लढाईनंतर संस्थानद्रोहाचें पहिलें उदाहरण म्हटलें म्हणजे हें गोपाळरावादि मंडळींचें होय. ह्याचा कडक बंदोबस्त ताबडतोब व्यवस्थित रीतीनें त्याच वेळीं झाला असता, तर सर्व सरदारांना भयंकर वचक बसला असता व मराठ्यांचें स्वतंत्र संस्थान अजरामर झालें असतें. ह्या प्रकरणाचा येथें विशेष उल्लेख करण्याचें कारण असें की मराठ्यांचें पुढील सर्व चरित्र ह्या एका संस्थानद्रोहाच्या पातकानें लिप्त होऊन गेलेलें आहे. ह्या संस्थानद्रोहाचा मूळ उगम रघुनाथराव पेशवा होता. त्याचा निकाल यथायोग्य शासनानें माधवरावानें लावून टाकिला असता, म्हणजे द्रोहाचें बीजच नष्ट झालें असतें. शक १६९० च्या ज्येष्ठ शुद्ध १० स धोडपच्या लढाईंत रघुनाथरावदादाचा माधवरावानें रेच मात्र उतरला (पत्रांक ४९); परंतु, संस्थानद्रोहाबद्दल त्याचें करावें तसें शासन न करतां, कीड तशीच राहूं दिली. ह्या किडीच्या आश्रयानें संस्थानांतील सरदारांना संस्थानाच्या विरुद्ध वागण्यास अवसर मिळाला. ही कीड नाहींशी केली असती, म्हणजे सरदाराचें पृथक् होण्याचें एकच साधें खूळ राहिलें असतें. व तें कालांतरानें जमीनदोस्त करतां आलें असतें.