Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
प्रस्तावना
१०. वांशिक पद्धतीनें इतिहास लिहावयाचा म्हटला म्हणजे त्या त्या देशांतील लोकांची वंशपरीक्षा करणें अपरिहार्य होतें. मराठ्यांच्या इतिहासासंबंधाने विचार करावयाचा म्हटला म्हणजे मराठ्यांचा वंश कोणता, तें ठरविणें अवश्य होते. मराठे शकवंशीय आहेत, असे रिस्ले प्रपादतात. तें खोटें व निराधार आहे. असे मी म्हणतों. रिस्लेचा प्रत्येक शब्द असत्य व डळमळीत आहे, असें मला वाटतें. मराठे कोठून आले, केव्हा आले, कसे आले, एतत्संबंधीं रिस्लेची माहिती कोती, असंबद्ध, निराधार, पोरकट व शास्त्रशून्यतेला साजेल अशी आहे. शकांनीं आपली मूळ शाक भाषा टाकून दिली, आर्य प्राकृत भाषा स्वीकारली व तिच्यापासून वर्तमान मराठी झाली, असा रिस्लेचा विचित्र कोटिक्रम आहे. बोलण्याला आधार कशाचाही नाही. नुसता Wild and ignorant conjecture आहे. ह्याला सशास्त्र पद्धत म्हणतात ! व हिंदुस्थान सरकार हें भारुड छापण्याकरिता पैसे खर्चते! लेखकाच्या सशास्त्र पद्धतीचें कौतुक विशेष करावें किंवा हिंदुस्थान सरकारच्या पारखेचे कौतुक विशेष करावें, ह्याचें मला गूढ पडलें आहे!
११. असो. असले विपरीत सिद्धांत युरोपियन लेखकांच्या लेखांत पदोपदी आढळतात. जशी वेळ पडेल व लहर लागेल, त्याप्रमाणें हे सिद्धांत एका टोंकापासून दुस-या टोंकापर्यंत बदलत असतात. मोंगलांना चिरडून हिंदुस्थान इंग्रजांनी मिळविलें, असें एक लेखक लिहितो; तर मराठ्यांपासून हिंदुस्थान इंग्रजांनीं हिसकून घेतलें, असे दुसरा लेखक प्रपादतो. हिंदुस्थानच्या विचित्र हवेंत शारीर व मानसिक श्रम युरोपांतल्याप्रमाणें होत नाहीत, असें एक शहाणा बरळतो, तर दुसरा होतात म्हणून त्याचा निषेध करतो. असे नाना प्रकारचे परस्परविरुद्ध ग्रह युरोपियन लोक आपल्या सुपीक डोक्यांतून, मन मानेल तसे, प्रसवत असतात. त्यामुळें होत आहे काय कीं, ह्या पाश्चात्यांच्या कोणत्याच बोलावर इकडील विचारी लोकांचा विश्वास बसत नाहींसा झालेला आहे. अशा स्थितींत एकच मार्ग सुरक्षित भासतो. आपली मते यथासत्य बनविण्यास आपणच उद्योग केला पाहिजे; दुस-याच्या दुटप्पी बोलण्यावर भिस्त ठेवून बसण्यात तात्पर्य नाही, हीच गोष्ट लक्ष्यांत घेऊन, मराठ्यांचा यथासत्य इतिहास निपजण्याकरितां, मराठ्यांच्या इतिहासाचीं अस्सल साधनें प्रसिद्ध करण्याचा प्रस्तुत लेखकानें उपक्रम केला आहे. त्या कामीं प्रस्तुत प्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेनें साहाय्य केलें, ही बाब मतैक्याची सूचक आहे.