कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

राजवाड्यांचा वैचारिक-तात्त्विक पुनर्जन्म होणं शक्य होते, पण ते अशक्य झाले; कारण साधनसाहाय्याच्या अभावी गावोगाव हिंडून मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनासाठी अनेक घराण्यांचे माळे साफ करून पायी प्रवास करून, सापडलेल्या दप्तरातून इतिहास-सुवर्णाचे कण काढण्यात सर्वच आयुष्य घालवायचे, व जाता जाता मिळेल तिथे चिठ्ठया लिहून धातुकोशासाठी धातूंचा संग्रह करायचा, व्युत्पत्त्या शोधायच्या, एकाद्या जयराम पांडेसारख्या भाटाच्या पद्यरचनेचा बहाणा करून शहाजी-शिवाजी यांच्या स्वराज्यस्थापनेचा विचार करता करता हिंदुसमाजरजनाशास्त्राचा अमोल राधामाधव ग्रंथ लिहायचा ! अशा आयुष्यक्रमात या विलक्षण बुद्धिमंताची झेप मार्क्स-एंगल्स किंवा रशियन क्रांतीपर्यंत पोचली नाही, हे आपल्या इतिहासशास्त्राचे व विचारसाधनांच्या हिमालयाचे एक एवरेस्टच शिखरच अज्ञातात दडून पडले असे वाटते. हे पाहून मनाला खिन्नता येते. भाषाशास्त्राची, संस्कृत भाषेच्या ज्ञानाची, इतिहासशास्त्रसंभाराची उकल करणारी हिंदुस्थानातली एक "जीनियस"च आपल्या जनतेने अकाली घालविली. इतिहासमंथनाच्या मेरू पर्वताला बांधणारा वासुकीचा दोरच महासागरात निखळून पडला व मंथन खुटले. त्या ताटातुटीच्या पन्नासाव्या वर्षादिनी ती मंथनक्रिया नव्या साधनातील सिद्धान्तानी परत सुरू करण्याचा आपण सर्व विद्वज्जनांनी निर्णय घ्यावा,

खंडाळा, २५ डिसेंबर, १९७६
-एस. ए. डांगे