प्रस्तावना

९. अशा तऱ्हेने राजानुग्रहातपात सुखोष्मा अनुभवीत असता, कवीची कीर्ती शिवराय गोस्वामी यांच्याद्वारा गंगाधरपंत या नामे करून युवराजाला नवीन अमात्य करून दिला होता त्याच्या कानावर गेली. तेव्हा कवीस आपल्याकडे घेऊन येण्यास अमात्यांनी गोसावी यास विनंती केली. भेटीच्या वेळी कवीने अमात्यांवर जो श्लोक केला त्याने अमात्य इतके खूष झाले की, त्यांनी तो श्लोक आपल्या मुद्रेच्या आसनावर कोरविला. पुढे काहीका दिवसांनी युवराज जे संभाजीराजे त्यांचा शेवट झाल्यानंतर युवराजपद एकोजीराजांना मिळाले. एकोजीराजाला संभाजीराजाप्रमाणेच संस्कृतप्राकृत कवींचा परामर्श घेण्यात हर्ष वाटे. ह्या एकोजीरावांनी मुद्दाम पाचारण करून कवीमुखाने राधामाधवविलासचंपू ऐकिला व कवीचे चातुर्य पाहून एकोजनार्दना प्रमाणे म्हणजे एकनाथस्वामी प्रमाणे पूर्णब्रह्मसाक्षात्कार झालेल्या जनार्दनपंडित नामक कोशाधिका-याला कवीस एक हजार वराया प्रतिवर्षी देण्याविषयी आज्ञा केली आणि यशवंतराव नामक मुत्सद्याला कवीची सर्वतो प्रकारे बरदास्त ठेविण्यास सांगितले. एवढा कथाभाग नवव्या उल्लासात कवीने आणिला आहे.

१०. ह्या एकोजीराजाला लोक सवाईमहाराज म्हणून प्रेमाने ओळखीत असत. सवाई महाराजा बरोबर कवी श्रीशैलमल्लिकार्जुनाच्या यात्रेस किंवा मोहिमेस गेला होता. श्रीशैलपर्वताचे वर्णन कवीने मोठे बहारीचे केले आहे. तद्नंतर शहाजीमहाराजांच्या राखेचा पुत्र कोयाजीराजा याचा व कवीचा परिचय झाला. हा कोयाजीराजा नृत्य, गायन, संस्कृतप्राकृत इत्यादी सर्व काही जाणणारा असून घोड्यावर बसणे, भालाबर्ची खेळणे, कुस्तीकवायत करणे इत्यादी कलांत निपुण होता. कोयाजीने संस्कृतप्राकृतांचा अभ्यास विश्वनाथ ज्योतिष्यांजवळ केला असून, तो मल्लविद्या नरषट्कसा नावच्या प्रख्यात जेठीपाशी शिकत होता. काव्य, नाटक, आख्यायिका, इतिहास, संगीत, नाना देशभाषा इत्यादींच्या परिज्ञानात त्याने अत्यंत कौशल्य संपादिले होते. ह्या कोयाजीराजाला नायकीण नावाची एक मुलगी होती; तिला गायननर्तनाची तालीम काही कवीश्वर देत असत. कर्नाटकात गायननर्तन, हावभाव इत्यादी शिकविणारे कलावंत ब्राह्मण पूर्वीही प्रख्यात असत व सध्याही कोठे कोठे पाहाण्यात येतात. ह्या कवीश्वरांची व जयरामकवीची गाठ पडली असता, त्यांच्या कर्मासंबंधाने कवीने अशी स्तुती केली की, तुचे हे काम साक्षात ब्रह्मदेवाच्याही बाच्याने होणार नाही, तुम्ही लाकडाच्या बाहुल्यांनाही नाचवू शकता, तेव्हा बोलत्याचालत्या स्त्रियांना उत्तम नर्तकी बनवाल यात आश्चर्य आहे? एकदा काही प्राकृत कवींशी जयरामकवीची गाठ पडली असता, त्यांना उद्देशून तिरस्काराने कवीने खालील उद्गार काढिले. गहनारण्यात संस्कृतसिंहाची गर्जना ऐकून, प्राकृतमर्कटे भाषावृक्षांच्या क्षुद्रशाखात लपून बसली. ही निर्भर्त्सना ऐकून प्राकृत कवींना फार राग आला व त्यांच्यापैकी रघुनाथ व्यास वगैरे नामांकित कवींशी जयरामकवीचे अनेक सवालजबाब झाले, त्या सवालजवाबात जी बारा भाषांत प्राकृत पद्ये कवीने रचिली ती त्रिमल्ल व वेंकट ह्या तात्कालीन प्रख्यात गायकांनी कोयाजीला गाऊन दाखविली. इतका कथाभाग नवव्या व दहाव्या अशा दोन उल्लासात आला आहे.