Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

११. त्रिमल्लवेंकटनायकांनी जी जयरामकृत प्राकृत पद्ये गायिली ती सर्व जयरामाने परिशिष्टखंडात एका ठिकाणी दिली आहेत. त्यांची एकंदर संख्या २०१ आहे. ज्या प्राकृत कवींनी जयरामकवीला समस्या घातल्या किंवा ज्या विद्वानांचा जयरामकवीने उल्लेख केला किंवा ज्यांनी राजापुढे पद्ये गायिली त्यापैकी प्रमुखांची नावनिशी अशी : १) रघुनाथ व्यास, २) रघुनंदन, ३) ठाकूर चतुरद, ४) लछिराम, ५) श्याम गुसाई, ६) ठाकूर शिवदास, ७) केहरिदास, ८) नारायणभट्ट गुरू, ९) गयंदकवी, १०) द्वारकादास, ११) देव काशीकर, १२) शेष व्यास काशीकर, १३) बलभद्र कवी, १४) सुखलाल, १५) अल्लीखान, १६) बालकवी, १७) रघुनंद रामानुज, १८) जदुराय, १९) दुर्ग ठाकूर, २०) सुबुद्धिराव, २१) ढुंढरी कवी, २२) अकब्बरपूरचा कवी, २३) अनामक पंजाबी कवी, २४) हिंदुस्थानी अनामक कवी, २५) फारसी कवी, २६) गुजराथी कवी, २७) मोरिर्ना भाट, २८) बर्गी कवी, २९) मोदलराय, ३०) कोट्टा पोबराय, ३१) लालमनी, ३२) घनशाम, ३३) विश्वंभर भाटे, ३४) बलदेव नरायन, ३५) अनंत नरायन. अशा पस्तीस भाषाकवींचा व आगंतुक विद्वानांचा उल्लेख जयरामने केला आहे. कोणी कोठचाही कवी आश्रयार्थ आला म्हणजे शहाजीराजा त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्या जवळ आदराने ठेवून घेत असे आणि तो जे ईश्वरविषयक किंवा राजविषयक किंवा मनोरंजनविषयक कवित्व त्याच्या जन्मभाषेत करी ते ऐकण्यात फावला वेळ घालवून आपले मन रिझवीत असे. अकबर पातशहाला विजापूरच्या आदिलशहापैकी कित्येकांना विजयनगरच्या कत्कति राजांना, भोजविक्रमादी मध्ययुगीन हिंदू राजांना व भरतखंडातील सामान्य संस्थानिकांना, इतकेच नव्हे तर मुरारपंतासारख्या मुत्सद्यांना व खेडेगावातील देशमुख-देशपांडे व पाटील-कुलकर्णी यांना देखील शाहीर कवी वगैरे गुणी जनांचा व विद्वानांचा परामर्श घेण्याचा नाद असलेले संस्कृत प्राकृत ग्रंथातून व तवारिखातून नमूद आहे. आदिलशाहाच्या दरबारात फारसी व उर्दू कवी प्राय: मुसलमान असत; एखाददुसरे हिंदूंचे नाव सापडते; परंतु भाषा सा-या कवींची फारसी किंवा उर्दू असे. मुसलमानी दरबारात मुसलमानांची चहा व्हावी यात वावगे असे काहीच नाही. त्याचप्रमाणे शहाजी महाराजांच्या दरबारात प्राय: हिंदू कवींचा बहुतेक भरणा असावा हे साहजिक आहे; अपवादाला अल्लीखान हे एक तेवढे नाव मुसलमान कवीचे दिसते; परंतु भाषा केवळ संस्कृत किंवा केवळ मराठी नसून, फारसी, उर्दू, ब्रज, गुजराथी, बागलाणी, पंजाबी व कर्नाटकी अशा हिंदुस्थानातील बहुतेक प्रमुख भाषा आहेत; पश्चिमेकडील सिंधी, पूर्वेकडील बंगला व दक्षिणेकडील तेलगू, तामिळ व मल्याळम या पाच भाषा तेवढ्या नाहीत. तत्रापि, सुलुनेरी नडनेरी, तिरुमुरू, रठिमुरू नोद्र, नीव्हैल, गुंड इत्यादी तेलगू किंवा तामिळ शब्द या चंपूत आले आहेत. त्यावरून अस्पष्ट अनुमान होते की, तेलगू, तामीळ व मल्याळम विद्वान व कवी शहाजीच्या दर्शनार्थ येत नसतील असे म्हणणे संकटप्राय होईल. सिंध व बंगाल हे प्रांत त्याकाळी फार मागासलेले असावेत व तेथील भाषा व लोक प्रौढत्वाप्रत पोहोचलेले नसावेत, सबब, शहाजीच्या दरबारातील जयराम कवीच्या कक्षेत ह्या भाषा आल्या नाहीत. नाहीतर जयरामासारख्या अनेकभाषाकोविदाच्या झपाट्यात त्या आल्याशिवाय राहात्या ना. जयरामाला आपल्या अनेकभाषाज्ञातृत्वाचा इतका काही जबर अभिमान होता की त्याला सिंधी, बंगला, मल्याळम वगैरे भाषांचे ज्ञान जर असते तर त्याने ह्या चंपूत खचित प्रगट केलेच असते. कदाचित श्रोत्यांच्याही ग्राहकशक्तीने जयरामाच्या अनेकभाषाज्ञानाचा संकोच झाल्या असण्याचा संभव आहे. श्रोत्यांना सहज परिचित अशाच तेवढ्या भाषा जयरामाने योजिल्या असण्याचा संभव विशेष दिसतो. सध्या जशी इंग्रजी भाषा उच्च व मध्यम वर्गातील बहुतेक इसमांना कळते त्याचप्रमाणे शहाजीच्या अमदानीत फारसी व उर्दू या भाषा यवनांच्या राशियतीत कळत. करता जयरामाने फारसी व उर्दू ऊर्फ दाक्षिणात्य यावनी भाषा योजिल्या ते रास्तच आहे. कानडी देशावर राज्य करणा-या शहाजीच्या दरबारात कानडी भाषा बहुतेक सर्वांनाच अवगत असे. गुजराथी वाण्यांचा व्याप त्याही काळी सार्वत्रिक पडल्यामुळे त्यांची उपेक्षा जयरामाला करणे शक्य नव्हते.